परिचय
जंववरी रे तंववरी (Javavari Re Tavavari) हा संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेला अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या इतर साहित्याप्रमाणे हा अभंग देखील अर्थपूर्ण आणि मार्मिक आहे.
जंववरी रे तंववरी (Javavari Re Tavavari) या अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांची भाषेवरील पकड आणि भाषाशैलीचे दर्शन होते. या अभंगातील कोल्हा आणि सिंह (कडवे क्रमांक १), अगस्ती ऋषी आणि समुद्र (कडवे क्रमांक ५) ही उदाहरणे विठ्ठलाचे श्रेष्ठत्व सांगणारी आहेत.
वैराग्याच्या गोष्टी करणारे लोक आणि सुंदर स्त्री (कडवे क्रमांक २), मित्रत्वाच्या गोष्टी आणि अर्थसंबंध (कडवे क्रमांक ३), आणि वीर पुरुषाशी सामना होत नाही तोपर्यंत युद्धाच्या फुशारक्या मारणारे लोक (कडवे क्रमांक ४) अशा दृष्टान्तातून मानवी स्वभावाचे वर्णन केलेलं आहे.
या सर्व उदाहरणातून आणि दृष्टान्तातून ज्ञानेश्वर महाराजांचे लोकव्यवहार ज्ञान आणि मानवी स्वभावाचे अचूक आकलन किती सूक्ष्म होते हे दिसते.
जंववरी रे तंववरी (Javavari Re Tavavari) या अभंगातील सगळी उदाहरणे आणि दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांची भाषाशैली आणि लोकव्यवहार ज्ञान, किंवा मानवी स्वभावाची सूक्ष्म जाणीव हे सांगण्यासाठी नसून, विठ्ठलाचे दर्शन होताच संसारातील दुःख आणि मोह सगळे निघून जातात हे सांगण्यासाठी आहेत.
Javavari Re Tavavari | जंववरी रे तंववरी
जंववरी तंववरी जंबूक करी गर्जना ।
जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥
जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी ।
जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ॥२॥
जंववरी तंववरी मैत्रत्व-संवाद ।
जंव अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप ॥३॥
जंववरी तंववरी युद्धाची मात ।
जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ॥४॥
जंववरी तंववरी समुद्र करी गर्जना ।
जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाहीं बाप ॥५॥
जंववरी तंववरी बाधी हा संसार ।
जंव रखुमादेवि वर देखिला नाहीं बाप ॥६॥
(PDF) Download Javavari Re Tavavari | जंववरी रे तंववरी
Javavari Re Tavavari | जंववरी रे तंववरी अभंगाचा अर्थ:
जंबूक (कोल्हा) कितीही गर्जना करू दे,
ते फक्त समोर पंचानन (सिंह) दिसेपर्यंत.॥१॥
बरेच लोक संन्यास किंवा वैराग्याच्या गोष्टी करत असतात,
पण हे फक्त सुंदर स्त्री दिसेपर्यंत चालते. ॥२॥
काही लोक मैत्रीच्या गोष्टी करतात,
पण मैत्रीमध्ये अर्थ संबंध आला की मैत्रीच्या गोष्टी मागे पडतात.॥३॥
जो पर्यंत युद्ध परिस्थिती उद्भवत नाही, शत्रू दिसत नाही, शूरवीरांचा सामना करावा लागत नाही,
तोपर्यंत युद्धाच्या गोष्टी करणारे, फुशारक्या मारणारे पुष्कळ लोक सापडतात. ॥४॥
समुद्राला कितीही गर्जना करू देत,
पण अगस्ती ऋषींसमोर त्याला नमते घ्यावेच लागते. ॥५॥
(याचा संदर्भ महाभारतातील एका कथेशी आहे. जेव्हा देव आणि दानवांचे युद्ध चालू असते. तेव्हा कालकेय नावाचा राक्षस समुद्राच्या तळाशी जाऊन लपतो. तेव्हा अगस्ती ऋषी संपूर्ण समुद्र पिऊन कालकेय ला ठार मारतात आणि देवांना कालकेयाच्या संकटातून मुक्त करतात.)
माणूस संसाराच्या मोहात कितीही अडकला, तरी ते फक्त विठ्ठलाचे दर्शन होईपर्यंत.
एकदा विठ्ठलाला पहिले की सगळा मोह कुठल्याकुठे पळून जातो. ॥६॥
पसायदान वाचण्यासाठी Pasaydan येथे क्लिक करा.
कालभैरवाष्टक वाचण्यासाठी Kalbhairavashtak येथे क्लिक करा.
देवीसूक्तम् वाचण्यासाठी Devisuktam येथे क्लिक करा.