Sanskrit Subhashita | संस्कृत सुभाषित

संस्कृत सुभाषित (Sanskrit Subhashita) हा एक अद्वितीय साहित्य प्रकार आहे जो शतकानुशतके भारतीय संस्कृती आणि साहित्याचा अविभाज्य भाग आहे. हा संस्कृत भाषेत लिहिलेल्या श्लोकांचा, सुविचारांचा संग्रह आहे, जो कालातीत झाला आहे. सुभाषिते ही भारतातील विशाल सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेचे उदाहरण आहे. या श्लोकांमध्ये जीवनाच्या विविध पैलूंवर सल्ला आणि सूचना आहेत जसे की शिक्षण, नैतिकता, सामाजिक चालीरीती आणि परस्पर संबंध, इतर अनेक विषयांसह.

Sanskrit Subhashita With Meaning | संस्कृत सुभाषित (अर्थासहित)

अलसस्य कुतो विद्या,अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रम्,अमित्रस्य कुतः सुखम् ॥

अर्थ: आळशी माणसाला विद्या कशी मिळणार, ज्याच्याकडे विद्या नाही त्याला संपत्ती कशी मिळणार, ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याला मित्र कुठून आणि मित्र नसलेल्याला सुख कसे मिळणार? (थोडक्यात आळशी माणसाला सुख मिळणे अवघड आहे).

यथा खनन् खनित्रेण नरो वार्यधिगच्छति ।
तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति ॥

अर्थ: ज्याप्रमाणे सतत कुदळीने खणत राहणाऱ्या मनुष्याला विहिरीचे पाणी मिळते, त्याप्रमाणे गुरूंची निष्ठेने सेवा करणाऱ्या व त्यांच्याकडून विद्या मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला गुरुकडे असलेली विद्या मिळते.

परिचरितव्याः सन्तो यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम् ।
यास्तेषां स्वैरकथास्ता एव भवन्ति शास्त्राणि ॥

अर्थ: जरी सज्जनांनी आपल्याला उपदेश केला नाही तरी त्यांची सेवा करावी. कारण ते सहजच ज्या गप्पा मारतात ते सुद्धा शास्त्रीय वचनच (उपदेश) असते.

नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा ।
शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः ॥

अर्थ: मनुष्याचा जन्म मिळणे कठीण असते. त्यातही शिक्षण मिळण अजून अवघड असते, त्यातही चारित्र्य संपादन करणं अधिक कठीण, आणि एवढं असूनही नम्रपणा असणं फारच विरळ.