Shree Maruti Stotra – श्री मारुती स्तोत्र : समर्थ रामदास स्वामी हे १७ व्या शतकातील एक महान संत होते, त्यांनी मारुतीची (हनुमान) स्तुती करणारी ११ स्तोत्रे लिहिली आहेत. या स्तोत्रांमधे मारुतीच्या पराक्रमाचे आणि चरित्राचे वर्णन केले आहे.
या ११ मारुती स्तोत्रांपैकी, खालील स्तोत्र हे जास्त परिचयाचे असून घरोघरी म्हटले जाते. याची सुरुवात “भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती” अशी होते.
या (Shree Maruti Stotra) श्री मारुती स्तोत्रामध्ये समर्थ रामदास स्वामी मारुती चे वर्णन करतात आणि विविध श्लोकांमध्ये मारुतीचे कौतुक करतात.
पहिल्या १३ श्लोकांमध्ये मारुतीचे वर्णन आहे आणि नंतरच्या ०४ श्लोकांमध्ये फलश्रुती म्हणजे या स्तोत्र पठणातून काय फायदे होतील, हे सांगितले आहे.
Shree Maruti Stotra | श्री मारुती स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें ।
सौख्यकारी दु:खहारी, धूर्त वैष्णवगायका ॥२॥
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ॥४॥
ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं ।
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ॥७॥
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती ।
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ॥११॥
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें ।
तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
धन धान्य, पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥
भूतप्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तहीं ।
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ॥१५॥
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ॥१६॥
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ॥१७॥
॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
(PDF) Download Shree Maruti Stotra | डाउनलोड श्री मारुती स्तोत्र
करुणाष्टके वाचण्यासाठी Karunashtake | करुणाष्टके येथे क्लिक करा.