श्री गुरूचरित्र – अध्याय दुसरा

कथासार

।। अध्याय दुसरा ।।

।। संदीपकाची गुरुभक्ती ।।

श्रीगणेशाय नमः ।। हरिनाम घेणारा एक शिष्य श्रीगुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने कोठेतरी जात होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. भस्म, व्याघ्रचर्म आणि पीतांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला. त्याने नामधारकरच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले. नामधारकाला एकदम जाग आली. त्याने भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही. तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला, “हे योगीश्वर! या भक्तावर कृपा करणाच्या स्वामिराया! आपण कोण? कोठून आलात? आपण कोठे राहता?”

योगी म्हणाला, “माझे नाव सिद्ध. गाणगापूरचे नृसिंहसरस्वती हे माझे गुरु.” नामधारक म्हणाला, “मीही नित्य श्रीगुरूंचे ध्यान करतो, मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का?” योगी म्हणाला, “नामधारका, तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर. मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला तोच मी तुला सांगतो ऐक – सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. त्याला चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले. चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. मग त्याने काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले.  त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापारयुगाने आपल्या स्वभावधर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले, “हे विधि! मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, धर्माचरणी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार?” ब्रह्मदेव म्हणाला, “काळजी करू नकोस. तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पापप्रवृत्त होतील, त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरू, गायी व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधुजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे.”

कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरूचे स्वरूप व माहात्म्य विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, “गुरू हा शब्दच चारी मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हाच ब्रह्मा-विष्णू-महेश. देव कोपले तर गुरु रक्षण करील, पण गुरू कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरुभक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते. भक्ती, वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थांचे व्यवस्थित आकलन होते. गुरूच्या सेवेने कायिक, वाचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. त्याविषयीची एक कथा सांगतो ऐक.

पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैलऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करवून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, “माझे पूर्वजन्मींचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीस जाणार आहे. तेथे मला कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईन. मला एकवीस वर्षे सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्या वेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते सांगा.” ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने ‘मी तुमची सेवा करीन, तुम्ही अनुमती दिली तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगीन’ असे सांगितले. वेदधर्मांना परत संतोष वाटला.

काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले. तेथे त्यांना कुष्टरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्वस्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अनंत हालअपेष्टा सोसून सदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला. संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले, पण त्याने काहीच मागितले नाही. मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा संदीपकाने ‘माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होवो’ असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले – “शिष्योत्तमा, तू काशीक्षेत्री चिरकाल वास करशील, तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख, दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल.” वेदधर्मांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच कुरुप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही झाले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले. सिद्ध म्हणाला, “नामधारका, गुरु माहात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढभावाने सेवाभक्ती करावी. गुरुभक्तांवर शंकर नेहमीच प्रसन्न असतो,”

श्री गुरूचरित्र – अध्याय दुसरा

।। श्री गणेशाय नमः ।।

त्रैमूर्तिराजा गुरु तूचि माझा । कृष्णातिरी वास करोनि वोजा ।
सुभक्त तेथे करिती आनंदा । ते सुर स्वर्गी पहाती विनोदा ॥१॥

ऐसे श्रीगुरुचरण ध्यात । जातां विष्णुनामांकित ।
अति श्रमला चालत । राहिला एका वृक्षातळी ॥२॥

क्षण एक निद्रिस्त । मनी श्रीगुरु चिंतित ।
कृपानिधि अनंत । दिसे स्वप्नी परियेसा ॥३॥

रूप दिसे सुषुप्तीत । जटाधारी भस्मांकित ।
व्याघ्रचर्म परिधानित । पीतांबर कासे देखा ॥४॥

येऊनि योगीश्वर जवळी । भस्म लाविले कपाळी ।
आश्वासूनि तया वेळी । अभयकर देतसे ॥५॥

इतुके देखोनि सुषुप्तीत । चेतन झाला नामांकित ।
चारी दिशा अवलोकित । विस्मय करी तया वेळी ॥६॥

मूर्ति देखिली सुषुप्तीत । तेचि ध्यातसे मनात ।
पुढे निघाला मार्ग क्रमित । प्रत्यक्ष देखे तैसाचि ॥७॥

देखोनिया योगीशाते । करिता झाला दंडवते ।
कृपा भाकी करुणवक्त्रे । माता पिता तू म्हणतसे ॥८॥

जय जयाजी योगाधीशा । अज्ञानतमविनाशा ।
तू ज्योतिःप्रकाशा । कृपानिधि सिद्धमुनी ॥९॥

तुझे दर्शने निःशेष । गेले माझे दुरितदोष ।
तू तारक आम्हास । म्हणोनि आलासि स्वामिया ॥१०॥

कृपेने भक्तालागुनी । येणे झाले कोठोनि ।
तुमचे नाम कवण मुनि । कवणे स्थानी वास तुम्हा ॥११॥

सिद्ध म्हणे आपण योगी । हिंडो तीर्थ भूमीस्वर्गी ।
प्रसिद्ध आमुचा गुरु जनी । नृसिंहसरस्वती विख्यात ॥१२॥

त्यांचे स्थान गाणगापूर । अमरजासंगम भीमातीर ।
त्रयमूर्तीचा अवतार । श्रीनृसिंहसरस्वती ॥१३॥

भक्त तारावयालागी । अवतार त्रयमूर्ति जगी ।
सदा ध्याती अभ्यासयोगी । भवसागर तरावया ॥१४॥

ऐसा श्रीगुरु कृपासिंधु । भक्तजना सदा वरदु ।
अखिल सौख्य श्रियानंदु । देता होय शिष्यवर्गा ॥१५॥

त्याचे भक्ता कैचे दैन्य । अखंड लक्ष्मी परिपूर्ण ।
धनधान्यादि गोधन । अष्टैश्वर्ये नांदती ॥१६॥

ऐसे म्हणे सिद्ध मुनि । ऐकोनि विनवी नामकरणी ।
आम्ही असती सदा ध्यानी । तया श्रीगुरुयतीचे ॥१७॥

ऐशी कीर्ति ब्रीद ख्याति । सांगतसे सिद्ध यति ।
वंशोवंशी करितो भक्ति । कष्ट आम्हा केवी पाहे ॥१८॥

तू तारक आम्हांसी । म्हणोनि माते भेटलासी ।
संहार करोनि संशयासी । निरोपावे स्वामिया ॥१९॥

सिद्ध म्हणे तये वेळी । ऐक शिष्या स्तोममौळी ।
गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी । भक्तवत्सल परियेसा ॥२०॥

गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य दिसे कैचे त्यासी ।
समस्त देव त्याचे वंशी । कळिकाळासी जिंके नर ॥२१॥

ऐसी वस्तु पूजूनी । दैन्यवृत्ति सांगसी झणी ।
नसेल तुजे निश्चय मनी । म्हणोनि कष्ट भोगितोसी ॥२२॥

त्रयमूर्ति श्रीगुरु । म्हणोनि जाणिजे निर्धारू ।
देऊ शकेल अखिल वरू । एका भावे भजावे ॥२३॥

एखादे समयी श्रीहरि । अथवा कोपे त्रिपुरारि ।
रक्षील श्रीगुरु निर्धारी । आपुले भक्तजनांसी ॥२४॥

आपण कोपे एखाद्यासी । रक्षू न शके व्योमकेशी ।
अथवा विष्णु परियेसी । रक्षू न शके अवधारी ॥२५॥

ऐसे ऐकोनि नामकरणी । लागे सिद्धाचिया चरणी ।
विनवीतसे कर जोडुनी । भक्तिभावे करोनिया ॥२६॥

स्वामी ऐसा निरोप देती । संदेह होता माझे चित्ती ।
गुरु केवी झाले त्रिमूर्ति । ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥२७॥

आणीक तुम्ही निरोपिलेती । विष्णु रुद्र जरी कोपती ।
राखो शके गुरु निश्चिती । गुरु कोपलिया न रक्षी कोणी ॥२८॥

हा बोल असे कवणाचा । कवण शास्त्रपुराणींचा ।
संदेह फेडी गा मनाचा । जेणे मन दृढ होय ॥२९॥

येणेपरी नामकरणी । सिद्धांसी पुसे वंदोनि ।
कृपानिधि संतोषोनि । सांगतसे परियेसा ॥३०॥

सिद्ध म्हणे शिष्यासी ।
तुवा पुसिले आम्हांसी वेदवाक्य साक्षीसी । सांगेन ऐका एकचित्ते ॥३१॥

वेद चारी उत्पन्न । झाले ब्रह्मयाचे मुखेकरून ।
त्यापासाव पुराण । अष्टादश विख्यात ॥३२॥

तया अष्टादशांत । ब्रह्मवाक्य असे ख्यात ।
पुराण ब्रह्मवैवर्त । प्रख्यात असे त्रिभुवनी ॥३३॥

नारायण विष्णुमूर्ति । व्यास झाला द्वापारांती ।
प्रकाश केला या क्षिती । ब्रह्मवाक्यविस्तारे ॥३४॥

तया व्यासापासुनी । ऐकिले समस्त ऋषिजनी ।
तेचि कथा विस्तारोनि । सांगेन ऐका एकचित्ती ॥३५॥

चतुर्मुख ब्रह्मयासी । कलियुग पुसे हर्षी ।
गुरुमहिमा विनवीतसे करद्वय जोडोनि । भावभक्ति करोनिया ॥३७॥

म्हणे सिद्धा योगीश्वरा । अज्ञानतिमिरभास्करा ।
तू तारक भवसागरा । भेटलासी कृपासिंधु ॥३८॥

ब्रह्मदेवे कलियुगासी । सांगितले केवी कार्यासी ।
आद्यंत विस्तारेसी । निरोपिजे स्वामिया ॥३९॥

ऐक शिष्या एकचित्ता । जधी प्रळय झाला होता ।
आदिमूति निश्चिता । होते वटपत्रशयनी ॥४०॥

अव्यक्तमूर्ति नारायण । होते वटपत्री शयन ।
बुद्धि संभवे चेतन । आणिक सृष्टि रचावया ॥४१॥

प्रपंच म्हणजे सृष्टिरचना । करणे म्हणोनि आले मना ।
जागृत होय या कारणा । आदिपुरुष तये वेळी ॥४२॥

जागृत होवोनि नारायण । बुद्धि संभवे चेतन ।
कमळ उपजवी नाभीहून । त्रैलोक्याचे रचनाघर ॥४३॥

तया कमळामधून । उदय झाला ब्रह्मा आपण ।
चारी दिशा पाहोन । चतुर्मुख झाला देखा ॥४४॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय एकावन्नावा

म्हणे ब्रह्मा तये वेळी । समस्ताहुनी आपण बळी ।
मजहून आणिक बळी । कवण नाही म्हणतसे ॥४५॥

हासोनिया नारायणु । बोले वाचे शब्दवचनु ।
आपण असे महाविष्णु । भजा म्हणे तया वेळी ॥४६॥

देखोनिया श्रीविष्णुसी । नमस्कारी ब्रह्मा हर्षी ।
स्तुति केली बहुवसी । अनेक काळ परियेसा ॥४७॥

संतोषोनि नारायण । निरोप दिधला अतिगहन ।
सृष्टि रची गा म्हणून । आज्ञा दिधली तये वेळी ॥४८॥

ब्रह्मा म्हणे विष्णुसी । नेणे सृष्टि रचावयासी ।
देखिली नाही कैसी । केवी रचू म्हणतसे ॥४९॥

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । निरोपि त्यासी महाविष्णु आपण ।
वेद असती हे घे म्हणोन । देता झाला तये वेळी ॥५०॥

सृष्टि रचावयाचा विचार । असे वेदांत सविस्तार ।
तेणेचि परी रचुनी स्थिर । प्रकाश करी म्हणितले ॥५१॥

अनादि वेद असती जाण । असे सृष्टीचे लक्षण ।
जैसा आरसा असे खूण । सृष्टि रचावी तयापरी ॥५२॥

या वेदमार्गे सृष्टीसी । रची गा ब्रह्मया अहर्निशी ।
म्हणोनि सांगे ह्रषीकेशी । ब्रह्मा रची सृष्टिते ॥५३॥

सृजी प्रजा अनुक्रमे । विविध स्थावरजंगमे ।
स्वेदज अंडज नामे । जारज उद्‍भिजे उपजविले ॥५४॥

श्रीविष्णुचे निरोपाने । त्रिजग रचिले ब्रह्मयाने ।
ज्यापरी सृष्टिक्रमणे । व्यासे ऐसी कथियेली ॥५५॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । नारायण वेदव्यास ऋषि ।
विस्तार केला पुराणांसी । अष्टादश विख्यात ॥५६॥

तया अष्टादशांत । पुराण ब्रह्मवैवर्त ।
ऋषेश्वरासी सांगे सूत । तेचि परी सांगतसे ॥५७॥

सनकादिकांते उपजवोनि । ब्रह्मनिष्ठ निर्गुणी ।
मरीचादि ब्रह्म सगुणी । उपजवी ब्रह्मा तये वेळी ॥५८॥

तेथोनि देवदैत्यांसी । उपजवी ब्रह्मा परियेसी ।
सांगतो कथा विस्तारेसी । ऐक आता शिष्योत्तमा ॥५९॥

कृत त्रेता द्वापार युग । उपजवी मग कलियुग ।
एकेकाते निरोपी मग । भूमीवरी प्रवर्तावया ॥६०॥

बोलावूनि कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी ।
तुवा जावोनि भूमीसी । प्रकाश करी आपणाते ॥६१॥

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कृतयुग आले संतोषोन ।
सांगेन त्याचे लक्षण । ऐका श्रोते एकचित्ते ॥६२॥

असत्य नेणे कधी वाचे । वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे ।
यज्ञोपवीत आरंभण त्याचे । रुद्राक्षमाळा करी कंकणे ॥६३॥

येणे रूपे युग कृत । ब्रह्मयासी असे विनवित ।
माते तुम्ही निरोप देत । केवी जाऊ भूमीवरी ॥६४॥

भूमीवरी मनुष्य लोक । असत्य निंदा अपवादक ।
माते न साहवे ते ऐक । कवणे परी वर्तावे ॥६५॥

ऐकोनि सत्ययुगाचे वचन । निरोपीतो ब्रह्मा आपण ।
तुवा वर्तावे सत्त्वगुण । क्वचित्त्‌काळ येणेपरी ॥६६॥

न करी जड तूते जाण । आणिक युग पाठवीन ।
तुवा रहावे सावध होऊन । म्हणूनि पाठवी भूमीवरी ॥६७॥

वर्तता येणेपरी ऐका । झाली अवधि सत्याधिका ।
बोलावूनि त्रेतायुगा देखा । निरोपी ब्रह्मा परियेसा ॥६८॥

त्रेतायुगाचे लक्षण । ऐक शिष्या सांगेन ।
असे त्याची स्थूल तन । हाती असे यज्ञसामग्री ॥६९॥

त्रेतायुगाचे कारण । यज्ञ करिती सकळ जन ।
धर्मशास्त्रप्रवर्तन । कर्ममार्ग ब्राह्मणांसी ॥७०॥

हाती असे कुश समिधा ऐसे । धर्मप्रवर्तक सदा वसे ।
ऐसे युग गेले हर्षे । निरोप घेऊनि भूमिवरी ॥७१॥

बोलावूनि ब्रह्मा हर्षी । निरोप देत द्वापारासी ।
सांगेन तयाचे रूपासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥७२॥

खड्गे खट्वांग धरोनि हाती । धनुष्य बाण एके हाती ।
लक्षण उग्र असे शांति । निष्ठुर दया दोनी असे ॥७३॥

पुण्य पाप समान देखा । स्वरूपे द्वापार असे निका ।
निरोप घेऊनि कौतुका । आला आपण भूमीवरी ॥७४॥

त्याचे दिवस पुरल्यावरी । कलियुगाते पाचारी ।
जावे त्वरित भूमीवरी । म्हणोनि सांगे ब्रह्मा देखा ॥७५॥

ऐसे कलियुग देखा । सांगेन लक्षणे ऐका ।
ब्रह्मयाचे सन्मुखा । केवी गेले परियेसा ॥७६॥

विचारहीन अंतःकरण । पिशाचासारखे वदन ।
तोंड खालते करुन । ठायी ठायी पडतसे ॥७७॥

वृद्ध आपण विरागहीन । कलह द्वेष संगे घेऊन ।
वाम हाती धरोनि शिश्न । येत ब्रह्मयासन्मुख ॥७८॥

जिव्हा धरोनि उजवे हाती । नाचे केली अतिप्रीती ।
दोषोत्तरे करी स्तुति । पुण्यपापसंमिश्र ॥७९॥

हासे रडे वाकुल्या दावी । वाकुडे तोंड मुखी शिवी ।
ब्रह्मयापुढे उभा राही । काय निरोप म्हणोनिया ॥८०॥

देखोनि तयाचे लक्षण । ब्रह्मा हासे अतिगहन ।
पुसतसे अतिविनयाने । लिंग जिव्हा का धरिली ॥८१॥

कलियुग म्हणे ब्रह्मयासी । जिंकीन समस्त लोकांसी ।
लिंग जिव्हा रक्षणारांसी । हारी असे आपणाते ॥८२॥

याकारणे लिंग जिव्हा । धरोनि नाचे ब्रह्मदेवा ।
जेथे मी जाईन स्वभावा । आपण न भिये कवणाते ॥८३॥

ऐकोनि कलीचे वचन । निरोप देत ब्रह्मा आपण ।
भूमीवरी जाऊन । प्रकाश करी आपुले गुणे ॥८४॥

कलि म्हणे ब्रह्मयासी । मज पाठविता भूमीसी ।
आपुले गुण तुम्हांसी । सांगेन ऐका स्वामिया ॥८५॥

उच्छेद करीन धर्मासी । आपण असे निरंकुशी ।
निरानंद परियेसी । निंदा कलह माझेनी ॥८६॥

परद्रव्यहारक परस्त्रीरत । हे दोघे माझे भ्रात ।
प्रपंच मत्सर दंभक । प्राणसखे माझे असती ॥८७॥

बकासारिखे संन्यासी । तेचि माझे प्राण परियेसी ।
छळण करोनि उदरासी । मिळविती पोषणार्थ ॥८८॥

तेचि माझे सखे जाण । आणीक असतील पुण्यजन ।
तेचि माझे वैरी जाण । म्हणोनि विनवी ब्रह्मयासी ॥८९॥

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । सांगे तुज उपदेशी ।
कलियुगी आयुष्य नरासी । स्वल्प असे एक शत ॥९०॥

पूर्व युगांतरी देखा । आयुष्य बहु मनुष्यलोका ।
तप अनुष्ठान ऐका । करिती अनेक दिवसवरी ॥९१॥

मग होय तयांसी गती । आयुष्य असे अखंडिती ।
याकारणे क्षिती कष्टती । बहु दिवसपर्यंत ॥९२॥

तैसे नव्हेचि कलियुग जाण । स्वल्प आयुष्य मनुष्यपण ।
करिती तप अनुष्ठान । शीघ्र पावती परमार्था ॥९३॥

जे जन असती ब्रह्मज्ञानि । पुण्य करितील जाणोनि ।
त्यास तुवा साह्य होऊनि । वर्तत असे म्हणे ब्रह्मा ॥९४॥

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कली म्हणतसे नमोन ।
स्वामींनी निरोपिले जे जन । तेचि माझे वैरी असती ॥९५॥

ऐसे वैरी जेथे असती । केवी जाऊ तया क्षिती ।
ऐकता होय मज भीति । केवी पाहू तयासी ॥९६॥

पंचशत भूमंडळात । भरतखंडी पुण्य बहुत ।
मज मारितील देखत । कैसा जाऊ म्हणतसे ॥९७॥

ऐकोनि कलीचे वचन । ब्रह्मा निरोपी हासोन ।
काळात्म्याते मिळोन । तुवा जावे भूमीसी ॥९८॥

काळात्म्याचे ऐसे गुण । धर्मवासना करिल छेदन ।
पुण्यात्म्याचे अंतःकरण । उपजेल बुद्धि पापाविषयी ॥९९॥

कली म्हणे ब्रह्मयासी । वैरी माझे परियेसी ।
वसतात भूमंडळासी । सांगेन स्वामी ऐकावे ॥१००॥

उपद्रविती माते बहुत । कृपा न ये मज देखत ।
जे जन शिवहरी ध्यात । धर्मरत मनुष्य देखा ॥१॥

आणिक असती माझे वैरी । वास करिती गंगातीरी ।
आणिक वाराणशीपुरी । जाऊनि धर्म करिती देखा ॥२॥

तीर्थे हिंडती जे चरणे । आणिक ऐकती पुराणे ।
जे जन करिती सदा दाने । तेचि माझे वैरी जाण ॥३॥

ज्यांचे मनी वसे शांति । तेचि माझे वैरी ख्याति ।
अदांभिकपणे पुण्य करिती । त्यांसी देखता भीतसे ॥४॥

नासाग्री दृष्टि ठेवुनी । जप करिती अनुष्ठानी ।
त्यासि देखताचि नयनी । प्राण माझा जातसे ॥५॥

स्त्रियांपुत्रांवरी प्रीति । मायबापा अव्हेरिती ।
त्यावरी माझी बहु प्रीति । परम इष्ट माझे जाणा ॥६॥

वेदशास्त्रांते निंदिती । हरिहरांते भेद पाहती ।
अथवा शिव विष्णु दूषिती । ते परम आप्त माझे जाणा ॥७॥

जितेंद्रिय जे असती नर । सदा भजती हरिहर ।
रागद्वेषविवर्जित धीर । देखोनि मज भय ॥८॥

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । तुझा प्रकाश बहुवसी ।
तुवा जाताचि भूमीसी । तुझे इच्छे रहाटतील ॥९॥

एखादा विरळागत । होईल नर पुण्यवंत ।
त्याते तुवा साह्य होत । वर्तावे म्हणे ब्रह्मा ॥११०॥

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कलियुग करीतसे नमन ।
करसंपुट जोडोन । विनवितसे परियेसा ॥११॥

माझ्या दुष्ट स्वभावासी । केवी साह्य व्हावे धर्मासी ।
सांगा स्वामी उपायासी । कवणेपरी रहाटावे ॥१२॥

कलीचे वचन ऐकोनि । ब्रह्मा हसे अतिगहनि ।
सांगतसे विस्तारोनि । उपाय कलीसी रहाटावया ॥१३॥

काळ वेळ असती दोनी । तुज साह्य होउनी ।
येत असती निर्गुणी । तेचि दाविती तुज मार्ग ॥१४॥

निर्मळ असती जे जन । तेचि तुझे वैरी जाण ।
मळमूत्रे जयासी वेष्टन । ते तुझे इष्ट परियेसी ॥१५॥

याचि कारणे पापपुण्यासी । विरोध असे परियेसी ।
जे अधिक पुण्यराशी । तेचि जिंकिती तुज ॥१६॥

या कारणे विरळागत । होतील नर पुण्यवंत ।
तेचि जिंकिती निश्चित । बहुतेक तुज वश्य होती ॥१७॥

एखादा विवेकी जाण । राहे तुझे उपद्रव साहोन ।
जे न साहती तुझे दारुण । तेचि होती वश्य तुज ॥१८॥

या कारणे कलियुगाभीतरी । जन्म होतील येणेपरी ।
जे जन तुझेचि परी । न होय त्या ईश्वरप्राप्ति ॥१९॥

ऐकोनि ब्रह्मदेवाचे वचन । कलियुग करितसे प्रश्न ।
कैसे साधूचे अंतःकरण । कवण असे निरोपावे ॥१२०॥

ब्रह्मा म्हणे तये वेळी । एकचित्ते ऐक कली ।
सांगेन ऐका श्रोते सकळी । सिद्ध म्हणे शिष्यासी ॥२१॥

धैर्य धरोनि अंतःकरण । शुद्ध बुद्ध वर्तती जन ।
दोष न लागती कधी जाण । लोभवर्जित नरांसी ॥२२॥

जे नर भजनी हरिहरांसी । अथवा असती काशीनिवासी ।
गुरु सेविती निरंतरेसी । त्यासी तुझा न लगे दोष ॥२३॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय आठवा

मातापिता सेवकासी । अथवा सेवी ब्राह्मणासी ।
गायत्री कपिला धेनूसी । भजणारांसी न लगे दोष ॥२४॥

वैष्णव अथवा शैवासी । जे सेविती नित्य तुळसीसी ।
आज्ञा माझी आहे ऐसी । तयासी बाधू नको ॥२५॥

गुरुसेवक असती नर । पुराण श्रवण करणार ।
सर्वसाधनधर्मपर । त्याते तुवा न बाधावे ॥२६॥

सुकृती शास्त्रपरायणासी । गुरूते सेवित वंशोवंशी ।
विवेके धर्म करणारासी । त्याते तुवा न बाधावे ॥२७॥

कलि म्हणे ब्रह्मयासी । गुरुमहिमा आहे कैशी ।
कवण गुरुस्वरूपे कैसी । विस्तारावे मजप्रति ॥२८॥

ऐकोनि कलीचे वचन । ब्रह्मा सांगतसे आपण ।
गकार म्हणजे सिद्ध जाण । रेफः पापस्य दाहकः ॥२९॥

उकार विष्णुरव्यक्त । त्रितयात्मा श्रीगुरु सत्य ।
परब्रह्म गुरु निश्चित । म्हणोनि सांगे कलीसी ॥१३०॥

श्लोक ॥ गणेशो वाऽग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः ॥३१॥

टीका ॥ गणेशाते म्हणती गुरु । तैसाचि असे वैश्वानरू ।
ऐसाचि जाण शार्ङ्गधरू । गुरुशब्द वर्ते इतुके ठायी ॥३२॥

श्लोक ॥ गुरुः पिता गुरुर्माता । गुरुरेव परः शिवः ।
शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन ॥३३॥

टीका ॥ गुरु आपला मातापिता । गुरु शंकरु निश्चिता ।
ईश्वरु होय जरि कोपता । गुरु रक्षील परियेसा ॥३३॥

गुरु कोपेल एखाद्यासी । ईश्वर न राखे परियेसी ।
ईश्वरू कोपेल ज्या नरासी । श्रीगुरु रक्षी निश्चये ॥३५॥

श्लोक ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेकः परं ब्रह्म तस्मातगुरुमुपाश्रयेत ॥३६॥

टीका ॥ गुरु ब्रह्मा सत्य जाण । तोचि रुद्र नारायण ।
गुरुचि ब्रह्म कारण । म्हणोनि गुरु आश्रावा ॥३७॥

श्लोक ॥ हरौ प्रसन्नेऽपि च वैष्णवा जनाः संप्रार्थयन्ते गुरुअक्तिमव्ययाम् ।
गुरौ प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिदः ॥३८॥

टीका ॥ ईश्वर जरी प्रसन्न होता । त्यासी गुरु होय ओळखविता ।
गुरु आपण प्रसन्न होता । ईश्वर होय आधीन आपुल्या ॥३९॥

श्लोक ॥ गुरुः सदा दर्शयिता प्रवृत्ति तीर्थं व्रतं योगतपादिधर्मान् ।
आचारवर्णादिविवेकयज्ञान् ज्ञानं परं भक्तिविवेकयुक्तम् ॥१४०॥

टीका ॥ गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनि । तीर्थव्रतयोगतपादि मुनी ।
आचारवर्णादि ज्ञानी । ज्ञान परम भक्तिविवेकयुक्त ॥४१॥

या कारणे श्रीगुरुसी । भजावे शास्त्रमार्गेसी ।
तीर्थव्रतयागतपासी । ज्योतिःस्वरूप असे जाणा ॥४२॥

आचारधर्मावर्णाश्रमांसी । विवेकधर्ममार्गासी भक्तिवैराग्ययुक्तांसी ।
गुरुचि मार्ग दाविणार ॥४३॥

इतुके ऐकोनि कलि आपण । विनवीतसे कर जोडून ।
गुरु सर्व देवासमान । केवी झाला सांगा मज ॥४४॥

ब्रह्मा म्हणे कलीसी । सांगेन तुज विस्तारेसी ।
एकचित्ते परियेसी । गुरुवीण पार नाही ॥४५॥

श्लोक ॥ गुरु विना न श्रवेण भवेत् कस्यापि कस्यचित् ।
विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत् ॥४६॥

टीका । गुरुवीण समस्तांसी । श्रवण कैचे परियेसी ।
श्रवण होता मनुष्यांसी । समस्त शास्त्रे ऐकती ॥

शास्त्र ऐकता परियेसी । तरतील संसारासी ।
या कारणे गुरुचि प्रकाशी । ज्योतःस्वरूप जाणावा ॥४८॥

गुरु सेविता सर्व सिद्धि । होती परियेसा त्रिशुद्धि ।
कथा वर्तली अनादि । अपूर्व तुज सांगेन ॥४९॥

पूर्वी गोदावरीचे तीरी । अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी ।
वृक्ष असती नानापरी । पुण्यनामे मृग वसती ॥५०॥

ब्रह्मऋषि आदिकरोनि । तप करिती तया स्थानी ।
तयांत वेदधर्म म्हणोनि । पैलपुत्र होता द्विज ॥५१॥

तया शिष्य बहु असती । वेदशास्त्र अभ्यासिती ।
त्यात दीपक म्हणोनि ख्याति । शिष्य होता परियेसा ॥५२॥

होता शिष्य गुरुपरायण । केला अभ्यास शास्त्रपुराण ।
झाला असे अतिनिपुण । सेवा करिता श्रीगुरुची ॥५३॥

वेदधर्म एके दिनी । समस्त शिष्यांसी बोलावूनी ।
पुसतसे संतोषोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५४॥

बोलावुनि शिष्यांसी । बोले गुरु परियेसी ।
प्रीति असेल आम्हांसी । तरी माझे वाक्य परियेसा ॥५५॥

शिष्य म्हणती गुरूसी । जे जे स्वामी निरोपिसी ।
तू तारक आम्हांसी । अंगिकारू हा भरवसा ॥५६॥

गुरूचे वाक्य जो न करी । तोचि पडे रौरव घोरी ।
अविद्या मायासागरी । बुडोन जाय तो नर ॥५७॥

मग तया कैची गति । नरकी पडे तो सतती ।
गुरु तारक हे ख्याति । वेदपुराणे बोलती ॥५८॥

ऐकोनि शिष्यांची वाणी । तोषला वेदधर्म मुनी ।
संदीपकाते बोलावुनी । सांगतसे परियेसा ॥५९॥

ऐका शिष्य सकळीक । आमचे पूर्वार्जित असे एक ।
जन्मांतरी सहस्त्राधिक । केली होती महापातके ॥१६०॥

आमचे अनुष्ठान करिता । बहुत गेले प्रक्षाळिता ।
काही शेष असे आता । भोगिल्यावाचून न सुटे जाणा ॥६१॥

तप सामर्थ्ये उपेक्षा करितो । पापमोक्षा आड रिघतो ।
याचि कारणे निष्कृति करितो । तया पाप घोरासी ॥६२॥

न भोगिता आपुले देही । आपले पापा निष्कृति नाही ।
हा निश्चय जाणोनि पाही । भोगावे आम्ही परियेसा ॥६३॥

या पापाचे निष्कृतीसी । जावे आम्ही वाराणशीसी ।
जाईल पाप शीघ्रेसी । प्रख्यात असे अखिल शास्त्री ॥६४॥

या कारणे आम्हांसी । न्यावे पुरी वाराणशीसी ।
पाप भोगीन स्वदेहासी । माते तुम्ही सांभाळावे ॥६५॥

या समस्त शिष्यांत । कवण असे सामर्थ्यवंत ।
अंगिकारावे त्वरित । म्हणोनि पुसे शिष्यांसी ॥६६॥

तया शिष्यांमध्ये एक । नाम असे संदीपक ।
बोलतसे अतिविवेक । तया गुरूप्रति देखा ॥६७॥

दीपक म्हणे गुरुस । पाप करितां देहनाश ।
न करावा संग्रहो दुःखास । शीघ्र करा प्रतिकारू ॥६८॥

वेदधर्म म्हणे तयासी । दृढ देह असता मनुष्यासी ।
क्षालन करावे पापासी । पुढती वाढे विषापरी ॥६९॥

अथवा तीर्थे प्रायश्चित्ते । आपुले देही भोगोनि त्वरिते ।
पापावेगळे न होता निरुते । मुक्ति नव्हे आपणांसी ॥१७०॥

देव अथवा ऋषेश्वरांसी । मनुष्यादि ज्ञानवंतासी ।
क्षालन न होय पापासी । आपुले आपण न भोगिता ॥७१॥

दीपक म्हणे गुरूसी । स्वामी निरोपावे आपणासी ।
सेवा करीन स्वशक्तीसी । न करिता अनुमान सांगिजे ॥७२॥

ऐकोनि दीपकाचे वचन । वेदधर्म म्हणे आपण ।
कुष्ठे होईल अंग हीन । अंधक पांगूळ परियेसा ॥७३॥

संवत्सर एकविशंत । माते सांभाळावे बहुत ।
जरी असेल दृढ व्रत । अंगिकारावी तुम्ही सेवा ॥७४॥

दीपक म्हणे गुरूसी । कुष्ठी होईन आपण हर्षी ।
अंध होईन एकवीस वर्षी । पापनिष्कृति करीन ॥७५॥

तुमचे पापाचे निष्कृति । मी करीन निश्चिती ।
स्वामी निरोपावे त्वरिती । म्हणोनि चरणांसी लागला ॥७६॥

ऐकोनि शिष्याची वाणी । संतोषला वेदधर्म मुनी ।
सांगतसे विस्तारोनि । तया पाप-लक्षणे ॥७७॥

आपुले पाप आपणासी । ग्राह्य नव्हे पुत्रशिष्यांसी ।
न भोगितां स्वदेहासी । न वेचे पाप परियेसा ॥७८॥

याकारणे आपण देखा । भोगीन आपुले पापदुःखा ।
सांभाळी मज तू संदीपका । एकवीस वर्षेपर्यंत ॥७९॥

जे पीडिती रोगे देखा । प्रतिपाळणारासी कष्ट अधिका ।
मजहूनि संदीपका । तूते कष्ट अधिक जाण ॥१८०॥

या कारणे आपुले देही । भोगीन पाप निश्चयी ।
तुवा प्रतिपाळावे पाही । काशीपूरा नेऊनिया ॥८१॥

तया काशीपुरी जाण । पापावेगळा होईन ।
आपण शाश्वतपद पावेन । तुजकरिता शिष्योत्तमा ॥८२॥

दीपक म्हणे गुरूसी । अवश्य नेईन पुरी काशी।
सेवा करीन एकवीस वर्षी । विश्वनाथासम तुमची ॥८३॥

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । कैसा होता शिष्य त्यासी ।
कुष्ठ होतांची गुरूसी । नेले काशीपुरा ॥८४॥

मणिकर्णिका उत्तरदेशी । कंबळेश्वर सन्निधेसी ।
राहिले तेथे परियेसी । गुरू शिष्य दोघेजण ॥८५॥

स्नान करूनि मणिकर्णिकेसी । पूजा करिती विश्वनाथासी ।
प्रारब्धभोग त्या गुरूसी । भोगीत होता तया स्थानी ॥८६॥

कुष्ठरोग झाला बहुत । अक्षहीन अतिदुःखित ।
संदीपक सेवा करित । अतिभक्ती करूनिया ॥८७॥

व्यापिला देह कुष्ठे बहुत । पू कृमि पडे रक्त ।
दुःखे व्यापला अत्यंत । अपस्मारी झाला जाण ॥८८॥

भिक्षा मागोनि संदीपक । गुरूसी आणोनि देत नित्यक ।
करी पूजा भावे एक । विश्वनाथस्वरूप म्हणतसे ॥८९॥

रोगे करूनि पीडितां नरू । साधुजन होती क्रूरू ।
तोचि देखा द्विजवरू । होय क्रूर एखादे वेळी ॥१९०॥

भिक्षा आणितां एखादे दिवशी । न जेवे श्रीगुरु कोपेसी ।
स्वल्प आणिले म्हणोनि क्लेशी । सांडोनि देत भूमीवरी ॥९१॥

येरे दिवशि जाऊनि शिष्य । आणि अन्ने बहुवस ।
मिष्टान्ने न आणी म्हणोनि क्लेश । करिता झाल परियेसा ॥९२॥

परोपरीचे पक्वान्न । का नाणिशी म्हणे जाण ।
कोपे मारू येत आपण । शाका परोपरी मागतसे ॥९३॥

जितुके आणि मागोनिया । सर्वस्वे करीतसे वाया ।
कोपे देत शिविया । परोपरी परियेसा ॥९४॥

एखादे समयि शिष्यासी । म्हणे ताता ज्ञानराशी ।
मजनिमित्त कष्टलासी । शिष्यराया शिखामणी ॥९५॥

सवेचि म्हणत वचने क्रूर । माते गांजिले अपार ।
तू आमुचे विष्ठामूत्र । क्षणाक्षणा धूत नाही ॥९६॥

खाताती मज मक्षिका । कां न निवारिसी संदीपका ।
सेवा करितां म्हणे ऐका । भिक्षा नाणिशी म्हणतसे ॥९७॥

या कारणे पापगुण । ऐसेची असती जाण ।
वोखट वाक्य निर्गुण । पाप म्हणोनि जाणावे ॥९८॥

पाप असे जेथे बहुत । दैन्य मत्सर वसे तेथ ।
शुभाशुभ नेणे क्वचित । पापरूपे जाणावे ॥९९॥

एखादे दैन्यकासी । दुःखे प्राप्त होती कैसी ।
अपस्मार होय जयासी । पाअरूप तोचि जाणा ॥२००॥

समस्त रोग असती देखा ।
कुष्ठ सोळा भाग नव्हे निका । वेदधर्म द्विज ऐका कष्टतसे येणेपरी ॥१॥

ऐसे गुरूचे गुणदोष । मनांत न आणी तोचि शिष्य।
सेवा करी एकमानस । तोचि ईश्वर मानोनि ॥२॥

जैसे जैसे मागे अन्न । आणूनि देतसे परिपूर्ण ।
जैसा विश्वेश्वर नारायण । तैसा गुरु म्हणतसे ॥३॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय त्रेचाळीसावा

काशीक्षेत्र थोर असतां । न करी सदा तीर्थयात्रा ।
न जाय देवदर्शना सर्वथा । गुरुसेवेवांचूनि ॥॥

श्लोक ॥ न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा ।
अहर्निश ब्रह्म हरिः सुबुद्धो गुरुः प्रसेव्यो न हि सेव्यमन्यत्‍ ॥५॥

टीका ॥ आपुले देहसंरक्षण । कधी न करी शिष्य जाण ।
लय लावूनि श्रीगुरुचरण । कवणासवे न बोलेची ॥६॥

अहोरात्र येणेपरी । ब्रह्मा शिव म्हणे हरी ।
गुरुचि होय निर्धारी । म्हणोनि सेवा करीतसे ॥७॥

गुरु बोले निष्ठुरेसी । आपण मनी संतोषी ।
जे जे त्याचे मानसी । पाहिजे तैसे वर्ततसे ॥८॥

वर्तता येनेपरी देख । प्रसन्न होवोनि पिनाक ।
उभा येऊनि सन्मुख । वर माग म्हणतसे ॥९॥

अहो गुरुभक्त दीपका । महाज्ञानी कुलदीपका ।
तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका । प्रसन्न झालो माग आता ॥२१०॥

दीपक म्हणे ईश्वरासी । हे मृत्युंजय व्योमकेशी ।
न पुसतां आम्ही गुरुसी । वर न घे सर्वथा ॥११॥

म्हणोनि गेला गुरुपासी । विनवीतसे तयासी ।
विश्वनाथ आम्हांसी । प्रसन्न होवोनि आलासे ॥१२॥

निरोप झालिया स्वामीचा । मागेन उपशर्म व्याधीचा ।
वर होता सदाशिवाचा । बरवे होईल म्हणतसे ॥१३॥

ऐकोनिया शिष्याचे वचन । बोले गुरु कोपायमान ।
माझे व्याधिनिमित्त जाण । नको प्रार्थू ईश्वरासी ॥१४॥

भोगिल्यावाचोनि पातकासी । निवृत्ति नव्हे गा परियेसी ।
जन्मांतरी बाधिती निश्चयेसी । धर्मशास्त्री असे जाण ॥१५॥

मुक्ति अपेक्षा ज्याचे मनी । तेणे करावी पापधुणी ।
शेष राहतां निर्गुणी । विघ्न करितील मोक्षासी ॥१६॥

ऐशियापरी शिष्यासी । गुरु सांगे परियेसी ।
निरोप मागोनि श्रीगुरुसी । गेला ईश्वरासन्मुख ॥१७॥

जाऊनि सांगे ईश्वरासी । नलगे वर आपणासी ।
नये गुरुचे मानसी । केवी घेऊ म्हणतसे ॥१८॥

विस्मय करोनि व्योमकेशी । गेला निर्वाणमंडपासी ।
बोलावून समस्त देवांसी । सांगे वृत्तान्त विष्णूपुढे ॥१९॥

श्रीविष्णु म्हणे शंकरास । कैसा गुरु कैसा शिष्य ।
कोठे त्यांचा रहिवास । सांगावे मज निर्धारे ॥२२०॥

सांगे ईश्वर विष्णुसी । आश्चर्य देखिले परियेसी ।
दीपक शिष्य निश्चयेसी । गुरुभक्त असे जाणा ॥२१॥

गोदावरीतीरवासी । वेदधर्म म्हणिजे तापसी ।
त्याची सेवा अहर्निशी । करितो भावे एकचित्ते ॥२२॥

नाही त्रिलोकी देखिला कोणी । गुरुभक्ति करणार निर्गुणी ।
त्याते देखोनि माझे मनी । अतिप्रीति वर्ततसे ॥२३॥

वर देईन म्हणोनि आपण । गेलो होतो तयाजवळी जाण ।
गुरूचा निरोप नाही म्हणोन । न घे वर परियेसा ॥२४॥

अनेक दिव्यसहस्त्रवर्षी । तप करिती महाऋषि ।
वर मागती अहर्निशी । नाना कष्ट करोनिया ॥२५॥

तैसा तापसी योगी यांसी । नव्हे मज वर द्यावयासी ।
बलात्कारे देता तयासी । वर न घे तो दीपक ॥२६॥

तनमन अर्पूनि श्रीगुरूसी । सेवा करितो संतोषी ।
त्रयमूर्ति म्हणोनि गुरूसी । निश्चये भजतसे ॥२७॥

समस्त देव मातापिता । गुरुचि असे तत्त्वतां ।
निश्चय केला असे चित्ता । गुरु परमात्मा म्हणोनि ॥२८॥

किती म्हणोनि वर्णू त्यासी । अविद्या-अंधकारासी ।
छेदिता दीपक परियेसी । कुलदीपक नाम सत्य ॥२९॥

धर्म ज्ञान सर्व एक । गुरुचि म्हणे कुलदीपक ।
चरणसेवा मनःपूर्वक । करितो गुरूची भक्तीने ॥२३०॥

इतुके ऐकोनि शार्ङ्गधरू । पहावया गेला शिष्यगुरु ।
त्यांचा भक्तिप्रकारू । पाहे तये वेळी ॥३१॥

सांगितले विश्वनाथे । त्याहून दिसे आणिक तेथे ।
संतोषोनि दीपकाते । म्हणे विष्णु परियेसा ॥३२॥

दीपक म्हणे विष्णूसी । काय भक्ति देखोनि आम्हांसी ।
वर देतोसी परियेसी । कवण कार्या सांग मज ॥३४॥

लक्ष कोटी सहस्त्र वरुषी । तप करिती अरण्यावासी ।
त्यांसी करितोसी उदासी । वर न देसी नारायण ॥३५॥

मी तरी तुज भजत नाही । तुझे नाम स्मरत नाही ।
बलात्कारे येवोनि पाही । केवी देशी वर मज ॥३६॥

ऐकोनि दीपकाचे वचन । संतोषला नारायण ।
सांगतसे विस्तारोन । तया दीपकाप्रती देखा ॥३७॥

गुरुभक्ति करिसी निर्वाणेसी । म्हणोनि आम्ही जाहलो संतोषी ।
जे भक्ति केली त्वां गुरूसी । तेचि आम्हांसी पावली ॥३८॥

जो नर असेल गुरुभक्त जाण । तोचि माझा जीवप्राण ।
त्यासी वश्य झालो आपण । जे मागेल ते देतो तया ॥३९॥

सेवा करी माता पिता । ती पावे मज तत्त्वतां ।
पतिसेवा स्त्रिया करिता । तेही मज पावतसे ॥२४०॥

एखाद्या भल्या ब्राह्मणासी । यती योगेश्वर तापसी ।
करिती नमन भक्तीसी । तेचि मज पावे जाणा ॥४१॥

ऐसे ऐकोनि दीपक । नमिता झाला आणिक ।
विनवीतसे देख । म्हणे सिद्ध नामधारका ॥४२॥

ऐक विष्णु ह्रषीकेशी । निश्चय असो माझे मानसी ।
वेदशास्त्र मीमांसादिकांसी । गुरु आम्हांसी देणार ॥४३॥

गुरूपासोनि सर्व ज्ञान । त्रयमूर्ति होती आम्हां आधीन ।
आमुचा गुरुचि देव जाण । अन्यथा नाही जाण पा ॥४४॥

सर्व देव सर्व तीर्थ । गुरूचि आम्हा असे सत्य ।
गुरूवांचूनि आम्हां परमार्थ । काय दूर असे सांगा ॥४५॥

समस्त योगी सिद्धजन । गुरूवांचूनि न होती सज्ञान ।
ज्ञान होता ईश्वर आपण । केवी दूर असे सांगा ॥४६॥

जो वर द्याल तुम्ही मज । श्रीगुरु देतो काय चोज ।
याकारणे श्रीगुरुराज । भजतसे परियेसा ॥४७॥

संतोषोनि नारायण । म्हणे धन्य धन्य माझा प्राण ।
तू शिष्य-शिरोरत्‍न । बाळक तूचि आमुचा ॥४८॥

काही तरी माग आता । वर देईन तत्त्वतां ।
विश्वनाथ आला होता । दुसरेन वर द्यावयासी मी आलो ॥४९॥

आमचेनि मन संतोषी । वर माग जो तुझे मानसी ।
तुज वश्य झालो निर्धारेसी । जे पाहिजे ते देईन आता ॥२५०॥

दीपक म्हणे विष्णुसी । जरी वर आम्हां देसी ।
गुरुभक्ति होय अधिक मानसी । ऐसे मज ज्ञान द्यावे ॥५१॥

गुरूचे रूप आपण ओळखे । ऐसे ज्ञान देई सुखे ।
यापरते न मागे निके । म्हणोनि चरणी लागला ॥५२॥

दिधला वर शार्ङ्गपाणी । संतोषोनि बोले वाणी ।
अरे दीपका शिरोमणी । तू माझा प्राणसखा होशी ॥५३॥

तुवा ओळखिले गुरूसी । देखिले दृष्टी परब्रह्मासी ।
आणीक जरी आम्हां पुससी । सांगेन एक एकचित्ते ॥५४॥

लौकिक सुबुद्धि होय जैशी । धर्माधर्मसुमने तैशी ।
उत्कृष्टाहूनि उत्कृष्टेसी । स्तुति करि गा अहर्निशी ॥५५॥

जे जे समयी श्रीगुरूसी । तू भक्तीने स्तुति करिसी । तेणे ।
होऊ आम्ही संतोषी । तेचि आमुची स्तुति जाण ॥५६॥

वेद वाचिती सांगेसी । वेदान्त भाष्य अहर्निषी ।
वाचिती जन उत्कृष्टेसी । आम्हा पावे निर्धारी ॥५७॥

बोलती वेद सिद्धान्त । गुरुचि ब्रह्म असे म्हणत ।
याचि कारणे गुरु भजता सत्य । सर्व देवता तुज वश्य ॥५८॥

गुरु म्हणजे अक्षर दोन । अमृताचा समुद्र जाण ।
तयामध्ये बुडता क्षण । केवी होय परियेसा ॥५९॥

जयाचे ह्रदयी गुरुस्मरण । तोचि त्रिलोकी पूज्य जाण ।
अमृतपान सदा सगुण । तोचि शिष्य अमर होय ॥२६०॥

श्लोक ॥ यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि ।
अनुग्रहो भवेन्नृणां सेव्यते सद्‍गुरुस्तदा ॥६१॥

टीका ॥ आपण अथवा ईश्वरु । ब्रह्मा जरी देता वरु ।
तद्वत्‍ फलदाता गुरु । गुरु त्रैमूर्ति याचि कारणे ॥६२॥

ऐसा वर दीपकासी । दिधला विष्णूने परियेसी ।
ब्रह्मा सांगे कलीसी । एकचित्ते परियेसा ॥६३॥

वर लाधोनि दीपक । गेला गुरूचे सन्मुख ।
पुसतसे गुरु ऐक । तया शिष्या दीपकासी ॥६४॥

ऐक शिष्या कुळदीपका । काय दिधले वैकुंठनायका ।
विस्तारोनि सांगे निका । माझे मन स्थिर होय ॥६५॥

दीपक म्हणे गुरुसी । वर दिधला ह्रषीकेशी ।
म्या मागितले तयासी । गुरुभक्ति व्हावी म्हणोनिया ॥६६॥

गुरुची सेवा तत्परेसी । अंतःकरण दृढेसी ।
वर दिधला संतोषी । दृढभक्ति माझी तुमचे चरणी ॥६७॥

संतोषोनि श्रीगुरु । प्रसन्न झाला साक्षात्कारू ।
जीवित्वे होय तू स्थिरू । काशीपुरी वास करी ॥६८॥

तुझे वाक्य सर्वसिद्धि । तुझे घरी नवनिधि ।
विश्वनाथ तुझे स्वाधी । म्हणे गुरु संतोषोनि ॥६९॥

तुझे स्मरण जे करिती । त्यांचे कष्ट निवारण होती ।
श्रियायुक्त नांदती । तुझे स्मरणमात्रेसी ॥२७०॥

येणेपरी शिष्यासी । प्रसन्न झाला परियेसी ।
दिव्यदेह झाला तत्क्षणेसी । झाला गुरु वेदधर्म ॥७१॥

शिष्याचा भाव पहावयास । कुष्ठी झाला महाक्लेश ।
तो तापसी अतिविशेष । त्यासी कैचे पाप राहे ॥७२॥

लोकानुग्रह करावयासी । गेला होता पुरी काशी ।
काशीक्षेत्रमहिमा ऐसी । पाप जाय सहस्त्र जन्मीचे ॥७३॥

तया काशीनगरात । धर्म अथवा अधर्म-रत ।
वास करिती क्वचित । त्यांसि पुनर्जन्म नाही जाणा ॥७४॥

सूत म्हणे ऋषीश्वरासी । येणे प्रकारे कलीसी ।
सांगे ब्रह्मा परियेसी । शिष्यदीपक आख्यान ॥७५॥

सिद्ध म्हणे नामकरणी । दृढ मन असावे याचि गुणी ।
तरीच तरेल भवार्णी । गुरुभक्ति असे येणेविधी ॥७६॥

श्लोक ॥ यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मनः ।
तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति ॥७७॥

टीका । जरी भक्ति असे दृढेसी । त्रिकरणसह मानसी ।
तोचि लाधे ईश्वरासी । ईश्वर होय तया वश्य ॥७८॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥

श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु ।

॥ ओवीसंख्या ॥२७९॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय दुसरा
Gurucharitra Adhyay 2 (गुरुचरित्र अध्याय २) with Marathi Subtitles

श्री गुरूचरित्र – अध्याय तिसरा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link