गणपती उत्सवासाठी आरत्या, श्लोक व मंत्रांचा संपूर्ण संग्रह

गणपतीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या लोकप्रिय आरत्या, भक्तीमय श्लोक आणि मंत्रांचा हा एकत्रित संग्रह आहे. या वाचनांनी गणेशपूजेचा अनुभव अधिक पवित्र आणि भावपूर्ण होतो. दररोजच्या पूजेसाठी किंवा गणेशोत्सवातील खास दिवशी हा आरती-संग्रह सहज उपयोगात आणता येईल.

॥ गणपतीची आरती ॥

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी, पुरवी प्रेम, कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥ १ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ.॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुम केशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ २॥

लंबोदर पितांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ३ ॥

रचनाकार – समर्थ रामदास स्वामी

॥ श्री शंकराची आरती ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ॥ १॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा॥
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ॥ ध्रु.॥

कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २॥

देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।
त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें॥ ३॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी ॥ ४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा॥
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ॥ ध्रु.॥

रचनाकार – समर्थ रामदास स्वामी

॥ श्री देवीची आरती ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

रचनाकार – नरहर मालुकवी

॥ दशावताराची आरती ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥

अंबऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त तुझा लागतां शंखासुरा वर देसी ॥ १ ॥

रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेता वराह रुप होसी ।
प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥

पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥
सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥
पितृवचना लागीं रामें वनवास केला ।
मिळोनी वानर सेना राजाराम प्रगटला ॥ ५ ॥

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें ।
नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सोडूनी दिधला धर्म म्हणुनी ना दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवि द्यावी निजसुखाआनंद सेवा ॥ ७ ॥

रचनाकार – समर्थ रामदास स्वामी

॥ हनुमंताची / मारुतीची आरती ॥

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥

जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ॥ धृ० ॥

दुमदुमिले पाताळ उठला प्रतिशब्द ।
धगधगिला धरणीधर मानिला खेद ।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥

रचनाकार – समर्थ रामदास स्वामी

॥ ज्ञानदेवाची आरती ॥

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा । आरती ज्ञानराजा ॥ धृ० ॥

लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ॥ १ ॥

कनकाचे ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरही । साम गायन करी ॥ २ ॥

प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्याचे केलें ।
रामा जनार्दनी । पायीं मस्तक ठेविलें ॥ ३ ॥

रचनाकार – समर्थ रामदास स्वामी

॥ आरती विठ्ठलाची ॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥

रचनाकार – संत नामदेव महाराज

॥ श्री विठ्ठलाची आरती ॥

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ॥ १॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ. ॥

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ॥
जय देव ॥ २॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवळिती राजा विठोबा सावळा॥
जय देव ॥ ३॥

ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥
जय देव ॥ ४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती॥
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवळिती॥
जय देव जय देव ॥ ५॥

रचनाकार – संत नामदेव महाराज

॥ श्री गुरुदत्ताची आरती ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥
पराही परतली तेथे कैचा हा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

रचनाकार – संत एकनाथ महाराज

॥ घालिन लोटांगण ॥

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ॥ १ ॥

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ २ ॥

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा,
बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे,
नारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥

अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्र भजे ॥ ४ ॥

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

॥ श्लोक ॥

सदा सर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ॥
उपेक्षु नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हेचि आतां ॥

उपासनेला दृढ चालवावें।
भूदेव संताशी सदा नमावें ॥
सत्कर्म योगे वय घालवावें ।
सर्वामुखी मंगल बोलवावें ॥

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणिंद्र माथा मुकुटी झळाळी ॥
कारुण्य सिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

उडाला उडाला कपि तो उडाला ।
समुद्र उलटोनी लंकेशी गेला ॥
लंकेशी जाऊनी चमत्कार केला ।
नमस्कार माझा त्या मारूतीला ॥

मोरया मोरया मी बाळ तान्हें ।
तुझीच सेवा करु काय जाणे ॥
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ॥

ज्या ज्या ठिकांणी मन जाय माझे ।
त्या त्या ठिकांणी निजरूप तुझे ॥
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकांणी ।
तेथे तुझे सदगुरू पाय दोन्ही ॥

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र ।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥
तया आठविता महापुण्यराशी ।
नमस्कार माझा सदगुरू ज्ञानेश्वराशी ॥

॥ मंत्रपुष्पांजली ॥

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय।
महाराजाय नम: ।

ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥

ॐ तदप्येषः श्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥

॥ गणपती बाप्पा मोरया ॥ मंगलमूर्ती मोरया ॥

(PDF) Download गणपती आरती आणि श्लोक संग्रह

संपूर्ण आरती संग्रह आणि मंत्र | Sampurna Ganpati Aarti Sangrah | Audio Jukebox | घरचा गणपती
गणपती आरती आणि श्लोक संग्रह

संकट नाशन गणेश स्तोत्र वाचण्यासाठी Sankat Nashan Ganesh Stotra येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment