श्री गुरूचरित्र – अध्याय पाचवा

कथासार

॥ अध्याय पाचवा ॥

॥ श्रीपादश्रीवल्लभांची जन्मकथा ॥

श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणाला, “नामधारका, कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले तेव्हा श्रीगुरू दत्तात्रेयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले. पीठापूर येथे आपळराज नावाचा आपस्तंब शाखेचा एक ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होती. ती विष्णुदत्ताची भावभक्तीने आराधना करायची. एकदा अमावस्येस आपळराजाच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते. तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथीरूपाने तिच्या द्वारी आले. सुमतीने ब्राह्मणभोजनापूर्वीच भिक्षा घातली. ही तिची सेवातत्परता पाहून दत्तात्रेयांनी तिला तीन मुखे व सहा हात या मूळ दत्तस्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. सुमतीने श्रीगुरूंची स्तुती केली व म्हणाली, “गुरुदेव, आपण मला अतिथीरूपात ‘माते’ अशी हाक मारलीत ते वचन खरे होवो! मला अनेक अपत्ये झाली. ती जन्मतःच मेली. जे दोन पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा! असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगदवंद्य, देवांसारखा आणि परम पुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण करा.”

दत्तात्रेय म्हणाले, “माते, तुला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल. तो तुझ्या कुळाचा उद्धार करील. त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडलात तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही.” सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वृत्त तिने पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले. तो सुमतीला म्हणाला, “दत्तात्रेयांनी तुला ‘माते’ अशी हाक मारली त्याअर्थी तेच पुत्ररूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले.” त्या वेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती. ती पतीला म्हणाली, “नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली यात माझे काही चुकले का?” आपळराज म्हणाला, “अगं, तू योग्य तेच केलेस. साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुला दर्शन दिले, वरदान दिले. आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले. आता ते स्वर्गलोकी जातील.”

त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली. तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले – “हा पुत्र तपस्वी होईल, विश्वाला मार्गदर्शन करील. याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल.” ते ऐकून आपळराज व सुमतीला धन्य वाटले. त्यांनी पुत्राचे ‘श्रीपाद’ नाव ठेवले.

श्रीपाद सात वर्षांचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली. मौजीबंधन होताच तो चारही वेद घडाघड म्हणू लागला. त्याने मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शन शास्त्रेही तत्काळ प्रकट केली. लोक त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले. त्याने आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्ते, वेदांचा अर्थ, वेदान्ताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले.

श्रीपाद सोळा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या मातापित्यांनी त्याला विवाहाबद्दल विचारले. तो म्हणाला, “मी  तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी श्री हीच माझी पत्नी! म्हणून मी ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे.” ते ऐकून आपळराज व सुमतीला वाईट वाटले. दत्तात्रेयांचे वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही. ती दोघे म्हणाली, “बाळा, तू आमची म्हातारपणीची काठी आहेस. तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे? तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे?”

श्रीपादाने त्या दोघांचे सांत्वन केले. तो म्हणाला, “आई बाबा, एवढेच ना! मी आत्ताच तुमचे दुःख घालवितो.” मग त्याने आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य! ते दोघेही अव्यंग, सुंदर व सुदृढ झाले. त्यांनी श्रीपादाचे कृतज्ञतेने पाय धरले. श्रीपाद म्हणाला, “तुम्ही मातापित्याची सेवा कराल तर इहलोकी पुत्रपौत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल.” ते सर्व पाहून आपळराज व सुमतीला आनंदाश्रू आवरत नव्हते. श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिले – “हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील, यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठाप्राप्त होतील. मला साधुजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे. अनुज्ञा असावी.”

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय अठरावा

मातापित्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला. तो गुप्तरूपाने काशीस आला. तेथून बद्रिकाश्रमास गेला. तेथे नारायणाची भेट घेतली. त्याला ‘मी कार्यासाठी मनुष्यरूपाने अवतार घेतला आहे’ असे सांगितले. मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्णक्षेत्री आला.

श्री गुरूचरित्र – अध्याय पाचवा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी ।
अवतार झाला मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥

ऐक भक्ता नामधारका । अंबरीषाकारणे विष्णु देखा ।
अंगकारिले अवतार ऐका । मानुषी नाना रूप घेतसे ॥२॥

मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह सिंहाचे मुख ।
वामनरूप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी ॥३॥

दशरथाचे कुळी जन्म । प्रख्यात अवतार श्रीराम ।
राजा होऊनि मागुती जन्म । गौळियाघरी गुरे राखी ॥४॥

वस्त्रे फेडूनि झाला नग्न । बौद्धरूपी झाला आपण ।
होऊनि कलंकी अवतार जाण । तुरुंगारूढ काय आवडी ॥५॥

नाना प्रकार नाना वेष । अवतार धरी ह्रषीकेश ।
तारावया भक्तजनास । दुष्टहनन करावया ॥६॥

द्वापारांती झाला कली । अज्ञान लोक ब्राह्मणकुळी ।
आचारहीन होऊनि प्रबळी । वर्तती महिमा कलियुगी ॥७॥

भक्तजनतारणार्थ । अवतार धरी श्रीगुरुनाथ ।
सगराकारणे भगीरथ । आणी गंगा भूमंडळी ॥८॥

तैसे एक विप्रवनिता । आराधी श्रीविष्णु दत्ता ।
तिचे उदरी अवतार धरिता । आश्चर्य झाले परियेसा ॥९॥

पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी ।
आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥

तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता ।
अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥

ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी ।
अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥

वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी ।
श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥

न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी ।
दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥

त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी ।
पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥

दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी ।
जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६॥

ऐकोनि स्वामींचे वचन । विप्रवनिता करी चिंतन ।
विनवीतसे करद्वय जोडून । नानापरी स्तवोनिया ॥१७॥

म्हणे जय जय जगन्नाथा । तू तारक भवासी तत्त्वता ।
माझे मनी असे जे आर्ता । पुरवावी ते देवराया ॥१८॥

तू कृपाळु सर्वा भूती । वेदपुराणे वाखाणिती ।
केवी वर्णावी तुझी कीर्ती । भक्तवत्सला कृपानिधि ॥१९॥

मिथ्या नोहे तुझा बोल । जे का ध्रुवासी दिधले पद अढळ ।
बिभीषणासी लंकास्थळ । देऊनि राज्य समर्पिले ॥२०॥

भक्तजना तू आधार । तयालागी धरिसी अवतार ।
ब्रीद असे चराचर । चौदा भुवनामाझारी ॥२१॥

आता माते वर देसी । वासना असे माझे मानसी ।
न व्हावे अन्यथा बोलासी । कृपानिधि देवराया ॥२२॥

माझे मनीची वासना । पुरवावी जगज्जीवना ।
अनाथरक्षका नारायणा । म्हणोनि चरणा लागतसे ॥२३॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय सतरावा

ऐकोनि तियेचे करुणावचन । संतोषला त्रयमूर्ति आपण ।
कर धरिला आश्वासोन । सांग जननी म्हणतसे ॥२४॥

तव बोलिली पतिव्रता । स्वामी जे निरोपिले आता ।
जननी नाम मज ठेविता । करा निर्धार याच बोला ॥२५॥

मज पुत्र झाले बहुत । नव्हेत स्थिर उपजतमृत ।
जे वाचले आता असत । अक्षहीन पादहीन ॥२६॥

योग्य झाले नाही कोणी । काय करावे मूर्ख प्राणी ।
असोनि नसती येणे गुणी । पुत्रावीण काय जन्म ॥२७॥

व्हावा पुत्र मज ऐसा । ज्ञानवंत पुराणपुरुषा ।
जगद्वंद्य वेदसदृशा । तुम्हांसारिका दातारा ॥२८॥

ऐकोनि तियेचे वचन । प्रसन्न झाला दत्त आपण ।
पुढे असे कार्यकारण । दीक्षार्थ भक्तजनांसी ॥२९॥

तापसी म्हणे तियेसी । पुत्र होईल परियेसी ।
उद्धरिल तुझे वंशासी । ख्यातिवंत कलियुगी ॥३०॥

असावे तुम्ही त्याचे बोली । येर्‍हवी न राहे तुम्हांजवळी ।
ज्ञानमार्गी अतुर्बळी । तुमचे दैन्य हरील ॥३१॥

इतुके सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसी ।
विस्मय करितसे मानसी । विप्रवनिता तयेवेळी ॥३२॥

विस्मय करोनि मनात । पतीसी सांगे वृत्तान्त ।
दोघे हर्षे निर्भर होत । म्हणती दत्तात्रेय होईल ॥३३॥

माध्यान्हसमयी अतिथिकाळी । दत्त येताती तये वेळी ।
विमुख न होता तये काळी । भिक्षा मात्र घालिजे ॥३४॥

दत्तात्रेयाचे स्थान । माहूर करवीर क्षेत्र खूण ।
तयाचा वास सदा जाण । पांचाळेश्वर नगरात ॥३५॥

नाना वेष भिक्षुकरूप । दत्तात्रेय येती साक्षेप ।
न पुसतां मज निरोप । भिक्षा घाली म्हणतसे ॥३६॥

विप्रस्त्री म्हणे पतीसी । आजि अवज्ञा केली तुम्हांसी ।
ब्राह्मण न जेवता आपण त्यासी । भिक्षा घातली म्हणतसे ॥३७॥

ऐकोनी सतीच्या बोला । विप्र मनी संतोषला ।
म्हणे पतिव्रते लाभ झाला । पितर माझे तृप्त झाले ॥३८॥

करावे कर्म पितरांच्या नामी । सर्मपावे विष्णुसी आम्ही ।
साक्षात्कारे येऊनि स्वामी । भिक्षा केली आम्हा घरी ॥३९॥

कृतार्थ झाले पितृगण समस्त । निर्धारे झाले स्वर्गस्थ ।
साक्षात्‍ विष्णु भेटले दत्त । त्रैमूर्तिअवतार ॥४०॥

धन्य तुझी मातापिता । जे वर लाधलीस मुख्य आता ।
पुत्र होईल निभ्रांता । न धरी चिंता मानसी ॥४१॥

हर्षे निर्भर होवोनि । राहिली दोघे निश्चित मनी ।
होती जाहली गर्भिणी । विप्रस्त्री परियेसा ॥४२॥

ऐसे नव मास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनी ।
विप्रे स्नान करूनि । केले जातककर्म तये वेळी ॥४३॥

मिळोनि समस्त विप्रकुळी । जातक वर्तविती तये वेळी ।
म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्‍गुरू ॥४४॥

ऐकोनि म्हणती मातापिता । हो कां आमुचा कुळउद्धरिता ।
आम्हा वर दिधला दत्ता । म्हणोनि ठेविती तया नाव ॥४५॥

श्रीपाद म्हणोनि या कारण । नाम ठेवी तो ब्राह्मण ।
अवतार केला त्रैमूर्ति आपण । भक्तजन तारावया ॥४६॥

वर्तत असता त्याचे घरी । झाली सात वर्षे पुरी ।
मौजीबधन ते अवसरी । करिता झाला द्विजोत्तम ॥४७॥

बांधिता मौजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी ।
मीमांसा तर्क अतिविस्तारी । म्हणो लागला तये वेळी ॥४८॥

ऐकोनि समस्त नगरलोक। विस्मय करिती सकळिक ।
होईल अवतार कारणिक । म्हणोन बोलती आपणात ॥४९॥

आचार व्यवहार प्रायश्चित्त । समस्तांसी आपण बोलत ।
वेदान्तभाष्य वेदार्थ । सांगतसे द्विजवरांसी ॥५०॥

वर्तता ऐसे तयासी । झाली वर्षे षोडशी ।
विवाह करू म्हणती पुत्रासी । मातापिता अवधारा ॥५१॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय अकरावा

विचार करिती पुत्रासवे । बा रे लग्न तुवा करावे ।
श्रीपाद म्हणे ऐका भावे । माझी वांछा सांगेन ॥५२॥

कराल विवाह माझा तुम्ही । सांगो ऐका विचार आम्ही ।
वैराग्यस्त्रीसंगे असेन मी । काम्य आमुचे तियेजवळी ॥५३॥

ते स्त्रियेवाचूनि आणीक नारी । समस्त जाणा मातेसरी ।
जरी आणाल ते सुंदरी । वरीन म्हणे तये वेळी ॥५४॥

आपण तापसी ब्रह्मचारी । योगस्त्रियेवांचोनि नारी ।
बोल धरा निर्धारी । श्रीवल्लभ नाम माझे ॥५५॥

श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे । झाले त्रिमूर्ति कैसे ।
पितयाते म्हणतसे । जाउ उत्तरपंथासी ॥५६॥

ऐकोनि पुत्राचे वचन । आठविले पूर्वसूचन ।
भिक्षुके सांगितली जे खूण । सत्य झाली म्हणतसे ॥५७॥

आताच या बोलासी । मोडा घालिता परियेसी ।
विघ्न होईल त्वरितेसी । म्हणोनि विचारिती तये वेळी ॥५८॥

न म्हणावे पुत्र यासी । अवतारपुरुष तापसी ।
जैसे याचे वसे मानसी । तैसे करावे म्हणती दोघे ॥५९॥

निश्चय करूनि आपुले मनी । पुत्राभिमुख जनकजननी ।
होती आशा आम्हांलागुनी । प्रतिपाळिसी म्हणोनिया ॥६०॥

ऐशी मनी व्याकुळित । डोळा निघती अश्रुपात ।
माता पडली मूर्च्छागत । पुत्रस्नेहे करोनिया ॥६१॥

देखोनि मातेचे दुःख । संबोखित परमपुरुष ।
उठवूनि स्वहस्ते देख । अश्रुपात पुशितसे ॥६२॥

न करी चिंता अहो माते । जे मागसी ते देईन तूते ।
दृढ करूनि चित्ताते । रहा सुके म्हणतसे ॥६३॥

बा रे तुजकरिता आपण । दुःख विसरले संपूर्ण ।
रक्षिसी आम्हा वृद्धांलागून । दैन्यावेगळे करोनि ॥६४॥

पुत्र असती आपणा दोन । पाय पांगुळ अक्षहीन ।
त्याते पोशील आता कोण । आम्हा कवण रक्षील ॥६५॥

ऐकोनि जननीचे वचन । अवलोकी अमृतदृष्टीकरून ।
पुत्र दोघेही झाले सगुण । आली दृष्टिचरणादिक ॥६६॥

वेदशास्त्रादि व्याकरण । सर्व म्हणती तत्क्षण ।
दोघे येऊनि धरिती चरण । कृतार्थ झालो म्हणोनिया ॥६७॥

आश्वासून तया वेळी । दिधला वर तत्काळी ।
पुत्रपौत्री नांदा प्रबळी । श्रियायुक्त सनातन ॥६९॥

सेवा करा जनकजननी । पावा सुख महाज्ञानी ।
इह सौख्य पावोनि । व्हाल मुक्त हे निश्चये ॥७०॥

ऐसे बोलोनि तयांसी । संबोधितसे मातेसी ।
पाहोनिया दोघा पुत्रांसी । राहता सुख पावाल ॥७१॥

पुत्र दोघे शतायुषी । निश्चय धरी वो मानसी ।
कन्या पुत्र होतील यांसी । तुम्ही नेत्री देखाल ॥७२॥

अखंड लक्ष्मी यांचे घरी । यांचे वंशपरंपरी ।
कीर्तिवंत सचराचरी । संपन्न होती वेदशास्त्रे ॥७३॥

आमची अवज्ञा न करिता । निरोप द्यावा आम्हा त्वरिता ।
जाणे असे उत्तरपंथा । दीक्षा द्यावया साधुजना ॥७४॥

सांगोनि मातापित्यासी । अदृश्य झाला परियेसी ।
पावला त्वरित पूरी काशी । गुप्तरूपे होता तेथे ॥७५॥

निघाला तेथूनि बदरीविना । भेटी घेऊनि नारायणा ।
अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेही ॥७६॥

दीक्षा करावया भक्तजना । तीर्थे हिंडणे आपणा ।
मनोवेगे मार्गक्रमणा । आले तीर्थ गोकर्णासी ॥७७॥

ऐकोनि सिद्ध मुनींचे वचन । विनवी नामधारक आपण ।
ते परिसा श्रोतेजन । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥७८॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेयावतारकथनं नाम पंचमेऽध्यायः ॥५॥

॥ श्रीपादश्रीवल्लभनृसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ ओवीसंख्या ॥७८॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय पाचवा
Gurucharitra Adhyay 5 (गुरुचरित्र अध्याय ५) with Marathi Subtitles
श्री गुरूचरित्र – अध्याय पाचवा

श्री गुरूचरित्र – अध्याय सहावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment