श्री गुरूचरित्र – अध्याय तेहेतिसावा

कथासार

॥ अध्याय तेहतिसावा ॥

॥ सधर्मा आणि तारक ॥

श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणाला, “नामधारका, आपल्या पतीला जिवंत केले म्हणून ब्राह्मणीच्या मुखावर श्रीगुरुंबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. ती म्हणाली, “गुरुदेव, माझ्या पतीचे निधन झाल्यावर एका साधूने माझे सांत्वन केले. सहगमन करण्यापूर्वी श्रीगुरुंचे दर्शन घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करावा असे सांगून तो गेला. त्याने माझ्यावर मोठे उपकार केले आहेत. मी त्याला कधीच विसरणार नाही.” तेव्हा श्रीगुरू म्हणाले, “मुली, आम्हीच त्या साधूचे रूप घेऊन आलो होतो. आम्हीच ती रुद्राक्षे दिली. रुद्राक्षांचा महिमा खूप मोठा आहे. रुद्राक्ष धारण केल्याने पापे नाहीशी होतात. रुद्राक्षाची पूजा केल्याने लिंगार्चनाचे पुण्य मिळते. ते धारण केल्याने चारी पुरुषार्थ साध्य होतात, शिवलोकी सद्गती मिळते. आता रुद्राक्षाचा प्रभाव स्पष्ट करणारी एक पुरातन कथा सांगतो, ऐक.

काश्मीर देशाच्या राजाचा सधर्म हा पुत्र. तारक हा त्याच्या प्रधानाचा पुत्र. सधर्म व तारक एकाच वयाचे होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. ते दिवसभर एकत्रच असायचे. ते दोघे शिवभजन करायचे. सर्वांगाला भस्म लावायचे, रुद्राक्षांच्या माळा घालायचे. त्यांना राजवैभव, उंची वस्त्रालंकार यांत जराही रुची नव्हती. मातापित्यांनी आग्रह करूनही ते ऐकत नसत. त्यामुळे राजा व प्रधान दोघेही चिंतामग्र होते.

एकदा त्रिकालज्ञानी पराशर ऋषी भद्रसेनाला भेटण्यासाठी आले असता राजाने त्यांना सधर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले. पराशरांनी त्या दोन्ही मुलांचे दिव्य दृष्टीने अवलोकन केले व म्हणाले, “राजा, या दोघांच्या वर्तणुकीचे रहस्य त्यांच्या पूर्वजन्माशी निगडित आहे. नंदी नगरात महानंदा नावाची एक धनाढ्य वेश्या राहत असे. ती शिवभक्त होती. अपार दानधर्म करायची. तिच्या स्वर्णमहालात एक नाट्यमंडप होता. ती तेथे सख्यांसहित नृत्य करायची. तिने मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पाळले होते. तिने त्यांच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार घातले होते. तिने त्यांनाही नृत्य शिकविले होते. महानंदा वेश्या असूनही पतिव्रतेसमान वागायची, जो मनुष्य तिच्या घरी यायची त्याची ती तीन दिवस पत्नीसमान एकनिष्ठेने सेवा करायची. त्याला शिवस्वरूप मानायची, सर्व प्रकारचे सौख्य देऊन त्याला संतुष्ट करायची. एकदा शंकरांनी तिची परीक्षा पाहण्याचे ठरविले, एका श्रीमंत वैश्याचे रूप घेऊन ते तिच्या महालात गेले. त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखचित शिवलिंग होते. ते पाहून महानंदा अक्षरशः मोहित झाली. तिच्या सख्यांनी त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. महानंदेने त्या वैश्याला “आपण हे शिवलिंग मला देणार असाल तर मी सूर्य आणि चंद्र यांना साक्षी ठेवून तीन दिवस तुमची पत्नी होण्याचे वचन देते.” असे सांगितले. त्याने ते शिवलिंग तिच्या हाती दिले व म्हणाला, “हे लिंग माझा प्राण आहे. ते जपून ठेव. त्याला हानी पोहोचली तर मी प्राणत्याग करीन.” ते मान्य करून महानंदेने ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मध्यरात्री महानंदा वैश्याशी प्रणयक्रीडेत रममाण असताना शिवसंकल्पाने त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली. वेश्येच्या सेवकांनी व लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. त्या अग्नीत वेश्येने पाळलेला कोंबडा, माकड आणि ते शिवलिंगही दग्ध झाले. त्यामुळे शोकग्रस्त वैश्याने चिता प्रदीप्त करून सर्वांसमक्ष प्राणत्याग केला.

शिवलिंग दग्ध झाले, पुरुषहत्येचे पातक घडले म्हणून महानंदेला खूपच दुःख झाले. पतिव्रताधर्मानुसार तिने सहगमन करण्याचे ठरविले. तिने सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपल्या मातेचा व बंधूचा निरोप घेतला. सेवकांना चिता प्रदीप्त करावयास सांगितली आणि शिवनामाचा घोष करून त्या धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश केला. तर काय आश्चर्य! त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी तिला वरचेवर झेलले. त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला. शंकरांनी तिला खाली ठेवले व म्हणाले, “महानंदे, मी तुझ्या धैर्यावर आणि भक्तीवर प्रसन्न आहे. वरप्रसाद मागून घे.” महानंदेने शंकरांचे पाय धरले व म्हणाली, “हे प्रभो, आता जन्ममरणच नको. मला, माझ्या आप्तांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान द्या.” शंकरांनी महानंदेला स्वर्गमार्गे शिवलोकी नेले. तिला, दासदासी व परिवारासह मुक्ती दिली.” पराशर पुढे म्हणाले, “राजा भद्रसेना, त्या वेश्येच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड व कोंबडा यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन अत्युत्तम असा मनुष्यजन्म लाभला आहे.

त्यांच्यापैकी एक आहे सधर्मा आणि दुसरा आहे तारक. पूर्वजन्माच्या संस्कारांमुळे ते शिवभक्ती करतात, भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात. त्यांचे पुण्य अगाध आहे.” ते ऐकून राजा व प्रधान दोघेही थक्क झाले.

श्री गुरूचरित्र – अध्याय तेहेतिसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा ।
विनवीतसे भाकूनि करुणा । भक्तिभावेकरोनि ॥१॥

म्हणे स्वामी सिद्धमुनि । पूर्वकथानुसंधानी ।
पतीसह सुवासिनी । आली श्रीगुरुसमागमे ॥२॥

श्रीगुरु आले मठासी । पुढे कथा वर्तली कैसी ।
विस्तारोनि कृपेसी । निरोपावी स्वामिया ॥३॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । दुजे दिनी प्रातःकाळी ।
दंपत्ये दोघे गुरूजवळी । येवोन बैसती वंदोन ॥४॥

विनविताती कर जोडोनि । आम्हा शोक घडल्या दिनी ।
एके यतीने येवोनि । बुद्धिवाद सांगितला ॥५॥

रुद्राक्ष चारी आम्हासी । देता बोलिला परियेसी ।
कानी बांधोनि प्रेतासी । दहन करा म्हणितले ॥६॥

READ  Shri Gurucharitra | श्री गुरुचरित्र संपूर्ण माहिती

आणिक एक बोलिले । रुद्रसूक्त असे भले ।
अभिषेकिती विप्रकुळे । ते तीर्थ आणावे ॥७॥

आणोनिया प्रेतावरी । प्रोक्षा तुम्ही भावे करी ।
दर्शना जावे सत्वरी । श्रीनृसिंहसरस्वती स्वामीचे ॥८॥

ऐसे सांगोनि आम्हांसी । आपण गेला परियेसी ।
रुद्राक्ष राहिले मजपासी । पतिश्रवणी स्वामिया ॥९॥

ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरु सांगती हासोन ।
रुद्राक्ष दिल्हे आम्ही जाण । तव भक्ति देखोनिया ॥१०॥

भक्ति अथवा अभक्तीसी । रुद्राक्ष धारण करणारासी ।
पापे न लागती परियेसी । उंच अथवा नीचाते ॥११॥

रुद्राक्षांचा महिमा । सांगितला अनुपमा ।
सांगेन विस्तारून तुम्हा । एकचित्ते परियेसा ॥१२॥

रुद्राक्षधारणे पुण्य । मिति नाही अगण्य ।
आणिक नाही देवास मान्य । श्रुतिसंमत परियेसा ॥१३॥

सहस्त्रसंख्या जो नर । रुद्राक्षमाळा करी हार ।
स्वरूपे होय तोचि रुद्र । समस्त देव वंदिती ॥१४॥

सहस्त्र जरी न साधती । दोही बाही षोडशती ।
शिखेसी एक ख्याति । चतुर्विशति दोही करी ॥१५॥

कंठी बांधा बत्तीस । मस्तकी बांधा चत्वारिंश ।
श्रवणद्वयी द्वादश । धारण करावे परियेसा ॥१६॥

कंठी अष्टोत्तरशत एक । माळा करा सुरेख ।
रुद्रपुत्रसमान ऐक । येणे विधी धारण केलिया ॥१७॥

मोती पोवळी स्फटिकेसी । रौप्य वैडूर्य सुवर्णेसी ।
मिळोनि रुद्राक्षमाळेसी । करावे धारण परियेसा ॥१८॥

याचे फळ असे अपार । रुद्राक्षमाला अति थोर ।
जे मिळती समयानुसार । रुद्राक्ष धारण करावे ॥१९॥

ज्याचे गळा रुद्राक्ष असती । त्यासी पापे नातळती ।
तया होय सद्गति । रुद्रलोकी अखंडित ॥२०॥

रुद्राक्षमाळा धरोनि । जप करिती अनुष्ठानी ।
अनंत फळ असे जाणी । एकचित्ते परियेसा ॥२१॥

रुद्राक्षाविणे जो नर । वृथा जन्म जाणा घोर ।
ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड्र । जन्म वाया परियेसा ॥२२॥

रुद्राक्ष बांधोनि मस्तकेसी । अथवा दोन्ही श्रवणांसी ।
स्नान करिता नरासी । गंगास्नानफळ असे ॥२३॥

रुद्राक्ष ठेवोनि पूजेसी । अभिषेक करावा श्रीरुद्रेसी ।
लिंगपूजा समानेसी । फळ असे निर्धारा ॥२४॥

एकमुख पंचमुख । एकादश असती मुख ।
चतुर्दशादि कौतुक । मुखे असती परियेसा ॥२५॥

हे उत्तम मिळती जरी । अथवा असती नानापरी ।
धारण करावे प्रीतिकरी । पावे चतुर्विध पुरुषार्थ ॥२६॥

यांचे पूर्वील आख्यान । विशेष असे अति गहन ।
ऐकता पापे पळोन । जाती त्वरित परियेसा ॥२७॥

राजा काश्मीरदेशासी । भद्रसेन नामे परियेसी ।
त्याचा पुत्र सुधर्म नामेसी । प्रख्यात असे अवधारा ॥२८॥

त्या राजाचा मंत्रीसुत । नाम तारक विख्यात ।
दोघे कुमार ज्ञानवंत । परमसखे असति देखा ॥२९॥

उभयता एके वयासी । एके स्थानी विद्याभ्यासी ।
क्रीडा विनोद अति प्रीतींसी । वर्तती देखा संतोषे ॥३०॥

क्रीडास्थानी सहभोजनी । असती दोघे संतोषोनि ।
ऐसे कुमार महाज्ञानी । शिवभजक परियेसा ॥३१॥

सर्वदेहा अलंकार । रुद्राक्षमाळा सुंदर ।
भस्मधारण त्रिपुंड्र । टिळा असे परियेसा ॥३२॥

रत्‍नाभरणे सुवर्ण । लेखिती लोहासमान ।
रुद्रमाळावाचून । न घेती देखा अलंकार ॥३३॥

मातापिता बंधुजन । आणोनि देती रत्‍नाभरण ।
टाकोनि देती कोपोन । लोह पाषाण म्हणती त्यांसी ॥३४॥

वर्तता ऐसे एके दिवशी । तया राजमंदिरासी ।
आला पराशर ऋषि । जो का त्रिकाळज्ञ असे देखा ॥३५॥

ऋषि आला देखोन । राजा संमुख जाऊन ।
साष्टांगी नमन करून । अभिवंदिला तये वेळी ॥३६॥

बैसवोनि सिंहासनी । अर्घ्य पाद्य देवोनि ।
पूजा केली विधानी । महानंदे तये वेळी ॥३७॥

कर जोडोनि मुनिवरासी । विनवी राव भक्तीसी ।
पिसे लागले पुत्रांसी । काय करावे म्हणतसे ॥३८॥

रत्‍नाभरणे अलंकार । न घेती भुषण परिकर ।
रुद्राक्षमाळा कंठी हार । सर्वाभरणे तीच करिती ॥३९॥

शिकविल्या नायकती । कैचे यांचे मती ।
स्वामी त्याते बोधिती । तरीच ऐकती कुमार ॥४०॥

भूतभविष्यावर्तमानी । त्रिकाळज्ञ तुम्ही मुनि ।
यांचा अभिप्राय विस्तारोनि । निरोपावा दातार ॥४१॥

ऐकोनि रायाचे वचन । पराशरा हर्ष जाण ।
निरोपितसे हासोन । म्हणे विचित्र असे देखा ॥४२॥

तुझ्या आणि मंत्रिसुताचे । वृत्तान्त असती विस्मयाचे ।
सांगेन ऐक विचित्र साचे । म्हणोनि निरोपी तया वेळी ॥४३॥

पूर्वी नंदीनाम नगरी । अति लावण्य सुंदरी ।
होती एक वेश्या नारी । जैसे तेज चंद्रकांति ॥४४॥

जैसा चंद्र पौर्णिमेसी । तैसे छत्र असे तिसी ।
सुखासन सुवर्णैसी । शोभायमान असे देखा ॥४५॥

हिरण्यमय तिचे भुवन । पादुका सुवर्णाच्या जाण ।
नानापरी आभरणे । विचित्र असती परियेसा ॥४६॥

पर्यंक रत्‍नखचित देखा । वस्त्राभरणे अनेका ।
गोमहिषी दास्यादिका । बहुत असती परियेसा ॥४७॥

सर्वाभरणे तीस असती । जैसी दिसे मन्मथरति ।
नवयौवना सोमकांति । अतिसुंदर लावण्य ॥४८॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय पाचवा

गंध कुंकुम कस्तुरी । पुष्पे असती नानापरी ।
अखिल भोग तिच्या घरी । ख्याति असे तया ग्रामी ॥४९॥

धनधान्यादि संपत्ति । कोटिसंख्या नाही मिति ।
ऐशियापरी नांदती । वारवनिता तये नगरी ॥५०॥

असोनि वारवनिता । म्हणवी आपण पतिव्रता ।
धर्म करी असंख्याता । अन्नवस्त्रे ब्राह्मणांसी ॥५१॥

नाट्यमंडप तिचे द्वारी । रत्‍नखचित नानापरी ।
उभारिला अतिकुसरी । सदा नृत्य करी तेथे ॥५२॥

सखिवर्गासह नित्य । नृय करी मनोरथ ।
कुक्कुट मर्कट विनोदार्थ । बांधिले असती मंडप्पी ॥५३॥

तया मर्कटकुक्कुटांसी । नृत्य शिकवी विनोदेसी ।
रुद्राक्षमाळाभूषणेसी । गळा रुद्राक्ष बांधिले ॥५४॥

तया मर्कटकुक्कुटांसी । नामे ठेविली सदाशिव ऐसी ।
वर्तता एके दिवसी । अभिनव झाले परियेसा ॥५५॥

शिवव्रत म्हणजे एक । वैश्य झाला महाधनिक ।
रुद्राक्षमाळा-भस्मांकित । प्रवेशला तिचे घरी ॥५६॥

त्याचे सव्य करी देखा । रत्‍नखचित लिंग निका ।
तेजे फाके चंद्रार्का । विराजमान दिसतसे ॥५७॥

तया वैश्यासी देखोनि । नेले वेश्ये वंदूनि ।
नाट्यमंडपी बैसवोनि । उपचार केले नानापरी ॥५८॥

तया वैश्याचे करी । जे का होते लिंग भारी ।
रत्‍नखचित सूर्यापरी । दिसतसे तयाचे ॥५९॥

देखोनि लिंग रत्‍नखचित । वारवनिता विस्मय करीत ।
आपुल्या सखीस म्हणत । ऐसी वस्तु पाहिजे आम्हा ॥६०॥

पुसावे तया वैश्यासी । जरी देईल मौल्येसी ।
अथवा देईल रतीसी । होईन कुलस्त्री तीन दिवस ॥६१॥

ऐकोन तियेचे वचन । पुसती वैश्यासी सखी जाण ।
जरि का द्याल लिंगरत्‍न । देईल रति दिवस तीनी ॥६२॥

अथवा द्याल मौल्येसी । लक्षसंख्यादि द्रव्यासी ।
जे का वसे तुमचे मानसी । निरोपावे वेश्येप्रती ॥६३॥

ऐकोनि सखियांचे वचन । म्हणे वैश्य हासोन ।
देईन लिंग मोहन । रतिकांक्षा करुनी ॥६४॥

तुमची मुख्य वारवनिता । जरी होईल माझी कांता ।
दिवस तीन पतिव्रता । होवोनि असणे मनोभावे ॥६५॥

म्हणोनिया मुख्य वनितेसी । पुसतसे वैश्य तिसी ।
व्यभिचारिणी नाम तुजसी । काय सत्य तुझे बोल ॥६६॥

तुम्हा कैचे धर्म कर्म । बहु पुरुषांचा संगम ।
पतिव्रता कैचे नाम । तुज असे सांग मज ॥६७॥

प्रख्यात तुमचा कुळाचार । सदा करणे व्यभिचार ।
नव्हे तुमचे मन स्थिर । एका पुरुषासवे नित्य ॥६८॥

ऐकोनि वैश्याचे वचन । वारवनिता बोले आपण ।
दिनत्रय सत्य जाण । होईन तुमची कुलस्त्री ॥६९॥

द्यावे माते लिंगरत्‍न । रतिप्रसंगी तुमचे मन ।
संतोषवीन अतिगहन । तनमनधनेसी ॥७०॥

वैश्य म्हणे तियेसी । प्रमाण द्यावे आम्हांसी ।
दिनत्रय दिवानिशी । वागावे पत्‍नीधर्मकर्मे ॥७१॥

तये वेळी वारवनिता । लिंगावरी ठेवी हाता ।
चंद्र सूर्य साक्षी करिता । झाली पत्‍नी तयाची ॥७२॥

इतुकिया अवसरी । लिंग दिले तियेचे करी ।
संतोष जहाली ती नारी । करी कंकण बांधिले ॥७३॥

लिंग देवोनि वेश्येसी । बोले वैश्य परियेसी ।
माझ्या प्राणासमानेसी । लिंग असे जाण तुवा ॥७४॥

या कारणे लिंगासी । जतन करणे परियेसी ।
हानि होता यासी । प्राण आपुला देईन ॥७५॥

ऐसे वैश्याचे वचन ऐकोन । अंगिकारिले आपण ।
म्हणे लिंग करीन जतन । प्राणापरी परियेसा ॥७६॥

ऐसी दोघे संतोषित । बैसले होते मंडपात ।
दिवस जाता अस्तंगत । म्हणती जाऊ मंदिरा ॥७७॥

संभोगसमयी लिंगासी । न ठेवावे जवळिकेसी ।
म्हणे वैश्य तियेसी । तये वेळी परियेसा ॥७८॥

ऐकोनि वैश्याचे वचन । मंडपी ठेविले लिंगरत्‍न ।
मध्यस्तंभी बैसवोन । गेली अंतर्गृहात ॥७९॥

क्रीडा करिती दोघेजण । होते ऐका एक क्षण ।
उठिला अग्नि दारुण । तया नाट्यमंडपी ॥८०॥

अग्नि लागता मंडप । भस्म झाला जैसा धूप ।
वैश्य करितसे प्रलाप । देखोनि तये वेळी ॥८१॥

म्हणे हा हा काय झाले । माझे प्राणलिंग गेले ।
विझविताती अतिप्रबळे । नगरलोक मिळोनि ॥८२॥

विझवूनिया पहाती लिंगासी । दग्ध झाले परियेसी ।
अग्नी कुक्कुटमर्कटांसी । दहन जहाले परियेसा ॥८३॥

वैश्य देखोनि तये वेळी । दुःख करी अतिप्रबळी ।
प्राणलिंग गेले जळोनि । आता प्राण त्यजीन म्हणे ॥८४॥

म्हणोनिया निघाला बाहेरी । आयती केली ते अवसरी ।
काष्ठे मिळवोन अपारी । अग्नि केला परियेसा ॥८५॥

लिंग दग्ध झाले म्हणत । अग्निप्रवेश केला त्वरित ।
नगरलोक विस्मय करीत । वेश्या दुःख करीतसे ॥८६॥

म्हणे हा हा काय झाले । पुरुषहत्यापाप घडले ।
लिंग मंडपी ठेविले । दग्ध जहाले परियेसा ॥८७॥

वैश्य माझा प्राणेश्वर । तया हानि जहाली निर्धार ।
पतिव्रताधर्मे सत्वर । प्राण त्यजीन म्हणतसे ॥८८॥

बोलाविले विप्रांसी । संकल्पिले संपदेसी ।
सहगमन करावयासी । दानधर्म करीतसे ॥८९॥

वस्त्रे भूषणे भांडारा । देती झाली विप्रवरा ।
चंदनकाष्ठभारा । चेतविले अग्नीसी ॥९०॥

आपुल्या बंधुवर्गासी । नमोनि पुसे तयासी ।
निरोप द्यावा आपणासी । पतीसवे जातसे ॥९१॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय तिसरा

ऐकोनि तियेचे वचन । दुःख पावले बंधुजन ।
म्हणती तुझी बुद्धि हीन । काय धर्म करीतसे ॥९२॥

वेश्येच्या मंदिरासी । येती पुरुष रतीसी ।
मिती नाही तयांसी । केवी जहाला तुझा पुरुष ॥९३॥

कैचा वैश्य कैचे लिंग । वाया जाळिसी आपुले अंग ।
वारवनिता धर्म चांग । नूतन पुरुष नित्य घ्यावा ॥९४॥

ऐसे वैश्य किती येती । त्यांची कैशी होसी सती ।
हासती नगरलोक ख्याति । काय तुझी बुद्धि सांगे ॥९५॥

येणेपरी सकळ जन । वारिताती बंधुजन ।
काय केलिया नायके जाण । कवणाचेही ते काळी ॥९६॥

वेश्या म्हणे तये वेळी । आपुला पति वैश्य अढळी ।
प्रमाण केले तयाजवळी । चंद्र सूर्य साक्षी असे ॥९७॥

साक्षी केली म्या हो क्षिति । दिवस तीन अहोरात्री ।
धर्मकर्म त्याची पत्‍नी । जाहले आपण परियेसा ॥९८॥

माझा पति जाहला मृत । आपण विनवीतसे सत्य ।
पतिव्रता धर्म ख्यात । वेदशास्त्र परियेसा ॥९९॥

पतीसवे जे नारी । सहगमन हाय प्रीतिकरी ।
एकेक पाउली भूमीवरी । अश्वमेधफळ असे ॥१००॥

आपुले माता पिता उद्धरती । एकवीस कुळे पवित्र होती ।
पतीची जाण तेच रीती । एकवीस कुळे परियेसा ॥१॥

इतुके जरी न करिता । पातिव्रत्यपणा वृथा ।
केवी पाविजे पंथा । स्वर्गाचिया निश्चये ॥२॥

ऐसे पुण्य जोडिती । काय वाचूनि राहणे क्षिती ।
दुःख संसारसागर ख्याति । मरणे सत्य कधी तरी ॥३॥

म्हणोनि विनवी सकळांसी । निघाली बाहेर संतोषी ।
आली अग्निकुंडापासी । नमन करी तये वेळी ॥४॥

स्मरोनिया सर्वेश्वर । केला सूर्यासी नमस्कार ।
प्रदक्षिणे उल्हास थोर । करिती झाली तये वेळी ॥५॥

नमुनी समस्त द्विजांसी । उभी ठेली अग्निकुंडासी ।
उडी घातली वेगेसी । अभिनव जहाले तये वेळी ॥६॥

सदाशिव पंचवक्त्र । दशभुजा नागसूत्र ।
हाती आयुधे विचित्र । त्रिशूळ डमरू जाण पा ॥७॥

भस्मांकित जटाधारी । बैसला असे नंदीवरी ।
धरिता झाला वरचेवरी । वेश्येशी तये वेळी ॥८॥

तया अग्निकुंडात । न दिसे अग्नि असे शांत ।
भक्तवत्सल जगन्नाथ । प्रसन्न झाला तये वेळी ॥९॥

हाती धरुनी तियेसी । कडे काढी व्योमकेशी ।
प्रसन्न होउनी परियेसी । वर माग म्हणतसे ॥११०॥

ईश्वर म्हणे तियेसी । आलो तुझे परीक्षेसी ।
धर्मधैर्य पाहावयासी । येणे घडले परियेसा ॥११॥

झालो वैश्य आपणची । रत्‍नलिंग स्वयंभूची ।
मायाअग्नि केला म्यांची । नाट्यमंडप दग्ध केला ॥१२॥

तुझे मन पहावयासी । जहालो अग्निप्रवेशी ।
तूची पतिव्रता सत्य होशी । सत्य केले व्रत आपुले ॥१३॥

संतोषलो तुझे भक्तीसी । देईन वर जो मागसी ।
आयुरारोग्यश्रियेसी । जे इच्छिसी ते देईन ॥१४॥

म्हणे वेश्या तये वेळी । नलगे वर चंद्रमौळी ।
स्वर्ग भूमि पाताळी । न घे भोग ऐश्वर्य ॥१५॥

तुझे चरणकमळी भृंग । होवोनि राहीन महाभाग्य ।
माझे इष्ट बंधुवर्ग । सकळ तुझे सन्निधेसी ॥१६॥

दासदासी माझे असती । सकळा न्यावे स्वर्गाप्रति ।
तव सन्निध पशुपति । सर्वदा राहो सर्वेश्वरा ॥१७॥

न व्हावी पुनरावृत्ती । न लागे संसार यातायाती ।
विमोचावे स्वामी त्वरिती । म्हणोनि चरणी लागली ॥१८॥

ऐकोनि तियेचे वचन । प्रसन्न झाला गौरीरमण ।
सकळा विमानी बैसवोन । घेऊन गेला स्वर्गाप्रती ॥१९॥

तिचे नाट्यमंडपात । जो का झाला मर्कटघात ।
कुक्कुटसमवेत । दग्ध जहाले परियेसा ॥१२०॥

म्हणोनि पराशर ऋषि । सांगतसे रायासी ।
मर्कटजन्म त्यजूनि हर्षी । तुझे उदरी जन्मला ॥२१॥

तुझे मंत्रियाचे कुशी । कुक्कुट जन्मला परियेसी ।
रुद्राक्षधारणफळे ऐसी । राजकुमार होऊन आले ॥२२॥

पूर्वसंस्काराकरिता । रुद्राक्षधारण केले नित्या ।
इतके पुण्य घडले म्हणता । जहाले तुझे कुमार हे ॥२४॥

आता तरी ज्ञानवंती । रुद्राक्ष धारण करिताती ।
त्याच्या पुण्या नाही मिती । म्हणोनि सांगे पराशरऋषि ॥२५॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी । येणेपरी रायासी ।
सांगता झाला महाऋषि । पराशर विस्तारे ॥२६॥

ऐकोनि ऋषीचे वचन । राजा विनवी कर जोडून ।
प्रश्न केला अतिगहन । सांगेन ऐका एकचित्ते ॥२७॥

म्हणोनि सिद्ध विस्तारेसी । सांगे नामधारकासी ।
अपूर्व जहाले परियेसी । पुढील कथा असे ऐका ॥२८॥

गंगाधराचा नंदनु । सांगे श्रीगुरुचरित्रकामधेनु ।
ऐका श्रोते सावधानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥२९॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । रुद्राक्षमहिमा येथ ।
सांगितले निभ्रांत । पुण्यात्मक पावन जे ॥१३०॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रुद्राक्षमाहात्म्य नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३३॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥         ॥ ओवीसंख्या १३० ॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय तेहेतिसावा
श्री गुरुचरित्र सप्ताह वाचन - अध्याय ३३ | Gurucharitra Adhyay 33 । Saptah Vachan
श्री गुरूचरित्र – अध्याय तेहेतिसावा

श्री गुरूचरित्र – अध्याय चौतिसावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment