॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति ।
माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥ १॥
तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता ।
विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥ २॥
तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी ।
आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥ ३॥
माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता ।
लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥ ४॥
असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला ।
धन-कनक- संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥ ५॥
त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची ।
कर्णोपकर्णी ऐकली साची । तेणें साशंक जहाला ॥ ६॥
तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास ।
तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥ ७॥
येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी ।
कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥ ८॥
बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला ।
आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥ ९॥
ऐसें ऐकतां भाषण । समर्थेम तुकविली मान ।
जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥ १०॥
बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी ।
षोडशोपचारेम अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥ ११॥
प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून ।
मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥ १२॥
शालजोडी अंगावरी । बहुमोल घातली काश्मीरी ।
एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥ १३॥
गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत ।
कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥ १४॥
बहुमोल हिर्याची । वामकरीं घातिली पौची ।
रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥ १५॥
जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविले पुढे ।
त्रयोदश गुणी ठेविले विडे । एक्या लहान तबकांत ॥ १६॥
अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार ।
त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपानी शिंपडीलें ॥ १७॥
एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं ।
ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥ १८॥
बेरीज करतां दहा हजार । येईल ती साचार ।
ऐशी दक्षिणा होती थोर । किती करूं वर्णन तिचें ॥ १९॥
श्रीफल पुढें ठेवून । विनयें केलें भाषण ।
महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥ २०॥
या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी ।
मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥ २१॥
त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता ।
ऐसें म्हणून ठेविला माथा । अनन्य भावें पायांवरी ॥ २२॥
त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन ।
श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥ २३॥
असो आज तूं हें काय केलें? । मला पोळ्याचा बैल बनविलें ।
हे अलंकार घालून भले । याचें काय कारण? ॥ २४॥
मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्याचा ।
मला या दागदागिन्यांचा । काय सांग उपयोग? ॥ २५॥
अरे हें अवघें विष । मला नको त्याचा स्पर्श ।
या नसत्या उपाधीस । माझ्या मागें लावूं नको ॥ २६॥
अथवा तूं मोठा श्रीमान् । हें दाखवाया कारण ।
केलेंस कां हें प्रदर्शन । सांग मसी बच्चुलाला? ॥ २७॥
जें आवडतें जयासी । तेंच द्यावें तयासी ।
मी वेडापिसा संन्याशी । नागवा फिरतों गांवभर ॥ २८॥
हें अवघें तुझें तुला । लखलाभ असो बच्चुलाला ।
तुम्हां प्रापंचिकाला । या द्रव्याची जरूर ॥ २९॥
माझा यजमान भीमातटीं । उभा विटेसी जगजेठी ।
तो काय माझ्यासाठीं । हें वैभव द्याया तयार नसे? ॥ ३०॥
ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले ।
चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥ ३१॥
दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन ।
हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥ ३२॥
त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचे ।
ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥ ३३॥
त्यानें बच्चुलालापरी । पुजन केलें आपुल्या घरीं ।
परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥ ३४॥
वरघडीचें भाषण । केलें विनय दाखवून ।
ते कां समर्थाकारण । समजणें अशक्य आहे हो? ॥ ३५॥
जेवीं पूजा दांभिकांची । शब्दमयी असते साची ।
पूर्तता महावस्त्राची । होती त्यांची अक्षतेनें ॥ ३६॥
‘शर्कराखंडखाद्यानि’ । ऐसें म्हणोनिया वदनीं ।
कुचका दाणा आणोनी । ठेवी पुढें भुईमुगाचा! ॥ ३७॥
अशा दांभिक पूजनाचें । फलही त्याच स्वरूपाचें ।
वाटोळें लक्ष्मणाचें । याच कृतीनें झालें हो ॥ ३८॥
हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण ।
तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥ ३९॥
आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला ।
संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥ ४०॥
बच्चुलालांनीं तपास । केला अवघ्या अकोल्यास ।
परी न लागला थांग त्यास । समर्थांचा कोठेंही ॥ ४१॥
असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा ।
होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥ ४२॥
त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली ।
एके दिनीं ऐसी झाली । गोष्ट ऐका मठांत ॥ ४३॥
फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर ।
तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥ ४४॥
अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर ।
ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या! ॥ ४५॥
नांव म्हणे सोनुबाई । हातीं कथलाचाही वाळा नाहीं ।
नांव पाहतां गंगाबाई । आणि तडफडे तहानेनें ॥ ४६॥
तशांतलाच प्रकार । आहे तुझा साचार ।
हें फाटकें धोतर । पोतेर्यांच्या उपयोगी ॥ ४७॥
तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी ।
हा घे दुपेटा देतों तुसी । नेसावयाकारणें ॥ ४८॥
तो न करितां अनमान । राहे बाळा नेसून ।
यासी नको सोडूं जाण । कोणी काहीं केलें तरी ॥ ४९॥
पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना ।
भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥ ५०॥
तो वेडावांकडा प्रकार । कशास बोलूं साचार ।
गटाराचें उघडितां द्वार । घाण मात्र सुटते हो ॥ ५१॥
श्रीगजानन स्वामीप्रत । शिष्य होते असंख्यांत ।
परी अधिकारी तयांत । दोही हातांच्य बोटांइतके ॥ ५२॥
पाहा श्रोते कांतारीं । वृक्ष असती नानापरी ।
त्यांतून क्वचित् कोठें तरी । नजरेस पडती चंदनतरु ॥ ५३॥
त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळीतें ।
काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥ ५४॥
हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान ।
जें कां समर्थाकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥ ५५॥
तुझी भक्ति कळून आली । तूं खुशालचंद अससी मुळीं ।
तूं राहूं नको ये स्थळीं । अपमान करण्या सद्गुरुचा ॥ ५६॥
तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला ।
उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥ ५७॥
वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें ।
तेंच मीं हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा? ॥ ५८॥
ऐसी भक्ती न भक्ती झाली । शिष्यांत तेढ माजली ।
ती मिटवाया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥ ५९॥
पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर ।
जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥ ६०॥
माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी ।
जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥ ६१॥
डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन ।
मागें पाहे फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥ ६२॥
पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी ।
चिंतन चाललें मानसीं । निजगुरुचें सर्वदा ॥ ६३॥
तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर ।
जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥ ६४॥
अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी ।
लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥ ६५॥
परी निर्भय ऐसें सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा ।
हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥ ६६॥
ते म्हणाले आपसांत । हा माकडापरि कां रे फिरत? ।
ह्या वृक्षावरी सत्य । हें कांहीं कळेना ॥ ६७॥
लहान सान फांदीला । हा निर्भयपणें फिरून आला ।
परी नाहीं खालीं पडला । हेंच आहे आश्चर्य! ॥ ६८॥
दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं ।
श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसें सामर्थ्य असतें रे ॥ ६९॥
यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा ।
चला हा येथ आल्याचा । वृतान्त सांगूं गांवांत ॥ ७०॥
गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले ।
आम्रवृक्षापासीं भले । कोण आले तें पहावया ॥ ७१॥
म्हणाले पौरवासी नर । हा ढोंगी असावा साचार ।
बळेंच करितो वेडेचार । गजाननाच्या शिष्यापरी ॥ ७२॥
शिष्य गजानन महाराजांचा । भास्कर पाटील होता साचा ।
झाला नुकताच अंत त्याचा । अडगांव नामें ग्रामांत ॥ ७३॥
समर्थांचे शिष्य । येथें येतील कशास? ।
वळें करण्या उपवास । सोडून बर्फी पेढ्याला ॥ ७४॥
पुसून एकदां यास पहावें । तो काय म्हणतो तें ऐकावें ।
मग खरें खोटें ठरवावें । उगीच तर्क नाहीं बरा ॥ ७५॥
एक मनुष्य पुढें झाला । पितांबरासी पुसूं लागला ।
तूं कोण कोठील कशास आला? । गुरू तुझा कोण असे? ॥ ७६॥
पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा रहाणार ।
मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥ ७७॥
त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटण ।
म्हणून येथें येऊन । वृक्षापासी बैसलों ॥ ७८॥
तों आंब्याच्या मुळाशीं । मुंगळे होते बहुवसी ।
म्हणून बसलों फांदीसी । वृक्षावरी जाऊन ॥ ७९॥
ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण ।
अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥ ८०॥
काय म्हणे मी राजाची । राणी आवडती आहे साची ।
खळगी भरण्या पोटाची । आले मजूरी करावया ॥ ८१॥
देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा ।
तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥ ८२॥
स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान ।
त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥ ८३॥
अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली ।
ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्र-वृक्षाला ॥ ८४॥
त्यांनीं फळें आणवलीं । तूं नुसतीं पाने आण भलीं ।
नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल! ॥ ८५॥
हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा ।
तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥ ८६॥
ऐसें न जरी करशील । तरी मार खाशील ।
खरा असल्यास होशील । वंद्य आम्हांकारणें ॥ ८७॥
कां कीं शिष्य सद्गुरुचे । कांहीं अंशीं निघती साचे ।
बापा त्यांच्याच तोडीचे । हा आहे न्याय जगीं ॥ ८८॥
नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार ।
तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥ ८९॥
बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका ।
एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥ ९०॥
तैसाच मी गार परी । गजानन शिष्यांभितरीं ।
बोललों नाहीं वैखरी । यत्किंचित खोटें हो ॥ ९१॥
गारेवरून खाणीस । नाहीं येत जगीं दोष ।
मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें? ॥ ९२॥
शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर ।
संकट शिष्यांस पडतां थोर । ते धांवा करिती सद्गुरुंचा ॥ ९३॥
मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी ।
तरी सद्गुरूचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यांस ॥ ९४॥
ऐसी झाली आड-विहीर । पितांबरासी साचार ।
झाला बिचारा चिंतातुर । कांहीं न सुचे तयासी ॥ ९५॥
त्या वठलेल्या झाडापासी । मिळाले अवघे पौरवासी ।
काय होतें तें पहावयासी । मुलें बायकांसमवेत ॥ ९६॥
निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिलें कर ।
स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्गुरुरायाचें ॥ ९७॥
हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा ।
पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥ ९८॥
माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला ।
आपुल्या ब्रीदासाठीं पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥ ९९॥
माझी भिस्त तुझ्यावरी । पाव मातें लवकरी ।
नातरी आली पाळी खरी । मजला येथें मरण्याची ॥ १००॥
प्रल्हाद खरा करण्याला । स्तंभीं नरहरी प्रगटला ।
जनी चढवितां सुळाला । त्याचें पाणी जहालें ॥ १॥
जनीचा भार देवावर । माझा आहे तुजवर ।
संतदेवांत अंतर । मुळींच नाहीं राहिलें ॥ २॥
देव तेची असती संत । संत तेची देव साक्षात् ।
मला लोक म्हणतात । शिष्य गजाननाचा ॥ ३॥
माझें कांहीं महत्त्व नाहीं । तें अवघें तुझ्याठायीं ।
पुष्पामुळें किंमत येई । जगीं सूत्राकारणें ॥ ४॥
तूं पुष्प मी आहे सूत । तूं कस्तुरी मी माती सत्य ।
तुझ्यामुळें आलें येथ । संकट हें माझ्यावरी ॥ ५॥
आतां न माझा अंत पाही । गुरुराया! धांव घेई ।
या वठलेल्या वृक्षाठायीं । आणि पर्णे कोमल ॥ ६॥
लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्गुरूचा नामगजर ।
जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥ ७॥
लोक अवघे गजर करती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती ।
जन नयनीं पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥ ८॥
कोणी म्हणती असेल स्वप्न । तें जें पडलें आपणांलागून ।
पहा चिमटा घेऊन । आपुल्याला करांनीं ॥ ९॥
चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति ।
यावरी कोणी ऐसें म्हणती । ही नजरबंदी असेल! ॥ ११०॥
गारुड्याच्या खेळांत । वाद्या होती सर्प सत्य ।
खापर्या असून दृष्टीप्रत । त्याचे रुपये दिसती कीं ॥ ११॥
तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला ।
फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥ १२॥
मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली ।
श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥ १३॥
आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं ।
चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥ १४॥
याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन ।
येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जसी ॥ १५॥
तें अवघ्यांस मानवले । पितांबरासी मिरवीत नेलें ।
ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेव्हां भाव उदेला ॥ १६॥
जैसा समर्थांनीं आपुला । शिष्य डोमगांवीं पाठविला ।
कल्याण नामें करून भला । कल्याण करण्या जगाचें ॥ १७॥
तैसेंच केलें गुरुवरें । श्रीगजाननें साजिरें ।
उदेंलें हें भाग्य खरें । त्या कोंडोली गांवचें ॥ १८॥
श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत ।
इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥ १९॥
त्या पितांबराचे भजनीं । कोंडोली गांव लागला जाणी ।
जेथें जाईल हिरकणी । तेथें ती मोल पावे ॥ १२०॥
मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा ।
आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥ २१॥
आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत ।
एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥ २२॥
शिष्य त्याचें कारण । पुसूं लागले कर जोडून ।
महाराज आपुलें मन । कां हो अस्थिर जाहलें? ॥ २३॥
तैं महाराज वदले लोकांला । आमचा कृष्णा पाटील गेला ।
जो चिकणसुपारी आम्हांला । रोज आणून देत असे ॥ २४॥
त्याची झाली आठवण । राम त्याचा मुलगा लहान ।
आतां सुपारी चिकण । कोण देतो या ठायां? ॥ २५॥
राम थोर झाल्यावरी । करील माझी चाकरी ।
म्हणून मी या मठांतरीं । आतां ना तयार राहावया ॥ २६॥
ऐसें महाराज बोलतां । जनांलागीं लागली चिंता ।
महाराजांचा विचार आतां । दिसतो येथून जाण्याचा ॥ २७॥
म्हणून कसेंही करून । जाऊं न द्यावें त्याकारण ।
चला आपण धरूं चरण । महाराजांचे येवेळां ॥ २८॥
ऐसा विचार मिळून केला । मंडळी आली मठाला ।
श्रीपतराव बंकटलाला । ताराचंद मारुती ॥ २९॥
मंडळींनीं धरिलें चरण । महाराज आम्हां सोडून ।
तुम्ही आपुलें ठिकाण । राहण्याचें अन्य करूं नये ॥ १३०॥
तुमची इच्छा असेल जेथ । तेथेंच राहा शेगांवांत ।
परी सोडण्याचें मनांत । ग्राम हें आणूं नका ॥ ३१॥
तैं महाराजवाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी ।
मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥ ३२॥
जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल ।
तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥ ३३॥
ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली ।
समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥ ३४॥
कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत ।
सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी? ॥ ३५॥
भूषण आपल्या साधूचें । सरकारास नाहीं साचें ।
बंकटलाल बोलला वाचें । ऐसें संकट घालूं नका ॥ ३६॥
सरकार धार्मिक कृत्याला । जागा देईल हा न उरला ।
भरवंसा तो आम्हांला । हें राज्य परक्याचें ॥ ३७॥
म्हणून आम्हांपैकीं कोणाची । जागा घ्या मागून साची ।
आहे तयारी आमुची । ती तुम्हां द्यावयास ॥ ३८॥
समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान ।
जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥ ३९॥
राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी ।
जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ॥ १४०॥
व्यवहारदृष्ट्या मालकपण । येतें राजालागून ।
त्याचें नाहीं भूषण । तुम्ही प्रयत्न करा जा ॥ ४१॥
जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां ।
हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥ ४२॥
हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली ।
त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥ ४३॥
बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ‘करी’ ।
त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥ ४४॥
आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला ।
परी मी तुर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥ ४५॥
तुम्ही एक वर्षांत । जागा केल्या व्यवस्थित ।
तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥ ४६॥
तो ठराव सरकारचा । आहे दप्तरीं नमूद साचा ।
समर्थांच्या वाणीचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥ ४७॥
मग हरी पाटील बंकटलाला । निघते झाले वर्गणीला ।
द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥ ४८॥
यापुढील अवघें वृत्त । येईल पुढल्या अध्यायांत ।
सत्पुरुषाचा पुरविण्या हेत । देव राहे तत्पर सदा ॥ ४९॥
विठू पाटील डोंगरगांवचा । लक्ष्मण पाटील वाडेगांवचा ।
जगु आबा शेगांवचा । हे पुढारी वर्गणीचे ॥ १५०॥
श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
ऐका श्रोते सावचित्त । निजकल्याण व्हावया ॥ १५१॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥
(PDF) Download श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय बारावा
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय तेरावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.



