॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा ।
माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥ १॥
हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती ।
माझा अंत पहाशी किती? । हें कांहीं कळेना ॥ २॥
खर्या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता ।
याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥ ३॥
मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका ।
हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥ ४॥
महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ ।
जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥ ५॥
तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां ।
मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥ ६॥
माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्ताचीं लक्षणें ।
लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥ ७॥
माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण ।
आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥ ८॥
तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली ।
काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥ ९॥
जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।
या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥ १०॥
म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं ।
तारवाला शिपाई । वाट पहातो काय हें? ॥ ११॥
त्याचें गूध कळेना । पुसण्या छाती होईना ।
निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥ १२॥
तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही ।
तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥ १३॥
तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्रुर ।
मुनसफीच्या हुद्दयावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥ १४॥
तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला ।
त्या काशिनाथ पंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें? ॥ १५॥
असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी ।
गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥ १६॥
ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी ।
त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥ १७॥
स्वातंत्र्यरुपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला ।
परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥ १८॥
गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार ।
रस्त्यानें फिरे मोटार । अति जोरानें विबुध हो ॥ १९॥
असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा ।
वाडा गोपाळ बुटीचा । होता सिताबर्डीवर ॥ २०॥
त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्गुरुनाथ ।
जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥ २१॥
बुटीचा ऐसा विचार । या सिताबर्डीवर ।
महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥ २२॥
अक्रूरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला ।
तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें? ॥ २३॥
शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित ।
विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥ २४॥
कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागून? ।
तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पहा ॥ २५॥
तुम्ही गांवचे जमेदार । करा याचा विचार ।
बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥ २६॥
टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची ।
येथें आम्हांसम कोल्ह्याची । नाहीं मुळीं किंमत॥ २७॥
जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला ।
जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥ २८॥
तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें ।
आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥ २९॥
इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत ।
जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥ ३०॥
महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी ।
या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥ ३१॥
तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना ।
अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥ ३२॥
बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी ।
श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥ ३३॥
रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन ।
परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥ ३४॥
जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना ।
बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥ ३५॥
शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले ।
परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेच आले परत ॥ ३६॥
इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळी बरोबरी ।
घेऊन निघाला नागपुरीं । समर्थासी आणावया ॥ ३७॥
बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत ।
त्या गोपाळबुटीप्रत । येणें रीतीं तें ऐका ॥ ३८॥
अरे गोपाळा पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं ।
तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥ ३९॥
तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार ।
तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥ ४०॥
तुझ्या धनाच्या जोरावरी । उडया या जाण निर्धारी ।
तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥ ४१॥
हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला ।
परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥ ४२॥
गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी ।
पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥ ४३॥
ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास ।
होत्या पातळ पदार्थांस । वाटया जवळ चांदीच्या ॥ ४४॥
नानाविध पक्वान्नें । होतीं भोजनाकारणें ।
मध्यभागीं आसन त्यानें । मांडिलें समर्थ बसण्यास ॥ ४५॥
ऐशी बुटीची श्रीमंती । तिचें वर्णन करुं किती? ।
ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥ ४६॥
असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत ।
तो महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥ ४७॥
वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून ।
तैसें स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवले ॥ ४८॥
चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी ।
तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥ ४९॥
समर्थ जाऊं लागले । तें गोपाळानें पाहिलें ।
अनन्यभावें चरण धरिले । समर्थाचे येऊन ॥ ५०॥
विक्षेप माझा गुरुराया! । नका करुं या समया ।
दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥ ५१॥
तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेंसी ।
तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥ ५२॥
येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज ।
पंक्तींत माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥ ५३॥
आतांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी ।
आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥ ५४॥
भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ ।
शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥ ५५॥
भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी ।
दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाडयांत ॥ ५६॥
कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें ।
परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥ ५७॥
तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं ।
माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया! ॥ ५८॥
तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें ।
ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥ ५९॥
आणखी एक पुत्र तुला । परम सद्गुणी होईल भला ।
अंतीं जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे! तूं ॥ ६०॥
ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन ।
त्या सिताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥ ६१॥
हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी ।
ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥ ६२॥
त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें ।
शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्गुरुभक्तीचें राज्य घरा ॥ ६३॥
उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार ।
त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥ ६४॥
तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून ।
शेगांवच्या मठा जाण । हरीपाटलासमवेत ॥ ६५॥
धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत ।
होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥ ६६॥
अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं ।
त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥ ६७॥
श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति ।
कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥ ६८॥
ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।
बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥ ६९॥
अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक ।
मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥ ७०॥
तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं ।
चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥ ७१॥
चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी।
जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥ ७२॥
तो कर्हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न ।
हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥ ७३॥
ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी ।
तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥ ७४॥
एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां ।
हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥ ७५॥
एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर ।
एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥ ७६॥
एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती ।
एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥ ७७॥
स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले ।
आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥ ७८॥
स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली ।
तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥ ७९॥
फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान ।
स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥ ८०॥
बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां ।
संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥ ८१॥
त्याचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून ।
ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो? ॥ ८२॥
ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला ।
बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥ ८३॥
ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे ।
हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥ ८४॥
स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण ।
तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा! ॥ ८५॥
सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान ।
या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥ ८६॥
हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं ।
तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥ ८७॥
अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां ।
म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥ ८८॥
येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी ।
परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥ ८९॥
आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें ।
भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥ ९०॥
मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही ।
त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा! रे ॥ ९१॥
दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां ।
श्रवणीं-पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥ ९२॥
मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून ।
ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्ति-मार्गाला ॥ ९३॥
या अंगासह जो भक्त करी । त्यालाच भेटे श्रीहरी ।
भक्तिमार्गाची नये सरी । त्याचा विधि सोपा असे ॥ ९४॥
परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण ।
जेवीं गगनानें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥ ९५॥
आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा ।
या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥ ९६॥
परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं ।
योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥ ९७॥
जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत ।
त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥ ९८॥
आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख ।
धौती मुद्रात्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥ ९९॥
कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा ।
आधीं योग करणारांना । तरीच तो साधेल ॥ १००॥
या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें ।
परी तें ज्ञान प्रेमाचें । *वीण असतां कामा नये ॥ १॥
जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण ।
म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गांत ॥ २॥
काळा गोरा खुजा थोर । कुरुप आणि सुंदर ।
हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥ ३॥
आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक ।
शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥ ४॥
तीच या तिन्ही मार्गांची । स्थिति तंतोतंत साची ।
बाह्य स्वरुपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥ ५॥
मुक्कामास गेल्यावर । मार्गाचा न उरे विचार ।
जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥ ६॥
पंथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला ।
अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥ ७॥
या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत ।
मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥ ८॥
वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी ।
हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥ ९॥
व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर ।
उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥ ११०॥
श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर ।
हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥ ११॥
जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला ।
तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥ १२॥
तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं ।
कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥ १३॥
नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार ।
ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥ १४॥
नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार ।
दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥ १५॥
शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत ।
सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥ १६॥
तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत ।
मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥ १७॥
पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा ।
जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥ १८॥
खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई ।
गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥ १९॥
पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा ।
आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥ १२०॥
मुर्हा गांवचें संतरत्न । झिंगाजी तो होय जाण ।
तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥ २१॥
या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें ।
परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥ २२॥
मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं ।
जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥ २३॥
आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी ।
कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥ २४॥
जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल ।
आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥ २५॥
आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही ।
निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥ २६॥
ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल ।
त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥ २७॥
ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणें त्याला ।
उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करुं नये ॥ २८॥
कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत ।
तरीच भेटे जगन्नाथ । जगद्गुरु जगदात्मा ॥ २९॥
ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला ।
प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥ १३०॥
अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले ।
वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥ ३१॥
मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर ।
वर्हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥ ३२॥
साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची ।
ती होती महाराजांची । मनापासून भक्तीण ॥ ३३॥
तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी ।
डाळपीठ घेऊनी । स्वैंपाक करी अहोरात्र ॥ ३४॥
जे येतील तयांना । साळु घाल भोजना ।
येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥ ३५॥
ती साळुबाई मठांत । आहे अझूनपर्यंत ।
जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥ ३६॥
प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला ।
तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥ ३७॥
खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं ।
त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥ ३८॥
पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा ।
होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥ ३९॥
या धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी ।
तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥ १४०॥
प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न ।
गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥ ४१॥
श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी ।
शिकण्याऐवजीं परोपरी । करुं लागती चैन ते ॥ ४२॥
चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन? ।
बिरुड आंब्यालागून । लागतां नास रसाचा ॥ ४३॥
आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी ।
विद्या अवघी करुन पुरी । आला निजदेशातें ॥ ४४॥
स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी ।
हजिरी ती द्यावयासी । श्रीगजानन महाराजा ॥ ४५॥
तो वेद विद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता ।
आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥ ४६॥
त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती ।
आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥ ४७॥
ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान ।
न होय सराफावांचून । किंमत त्या हिर्याची ॥ ४८॥
शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी ।
मधु टाकूनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल? ॥ ४९॥
प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून ।
चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥ १५०॥
समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत ।
पूजा अर्चा करण्याप्रत । सद्गुरुच्या समाधीची ॥ ५१॥
मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली ।
शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥ ५२॥
इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर ।
येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥ ५३॥
भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला ।
तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥ ५४॥
स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर ।
निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥ ५५॥
ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण ।
ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥ ५६॥
मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा ।
तेथील मारुतीपंत पटवार्याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥ ५७॥
श्रोते! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत ।
पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजीनामें माळी होता ॥ ५८॥
तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं ।
गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥ ५९॥
उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर ।
खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांडयाच्या ॥ ६०॥
राखणदार झोंपीं गेला । गर्दभासी आनंद झाला ।
ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥ ६१॥
हा पांडया मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त ।
म्हणून सद्गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥ ६२॥
क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी ।
अरे! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥ ६३॥
ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन ।
महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥ ६४॥
तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां ।
म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥ ६५॥
पिकाचें रक्षण करण्यासाठी । त्यानें ठेविलें आहे मसी ।
विश्वासघात आज दिशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥ ६६॥
तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर ।
रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥ ६७॥
आतां समजूत मालकाची । कोण्या रीतीं घालूं साची ।
पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥ ६८॥
ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर ।
नफातोटयाची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥ ६९॥
तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता ।
म्हणे काय जाऊन सांगूं आतां । मी पांडयाकारणें ॥ १७०॥
कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची ।
उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥ ७१॥
ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण ।
तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥ ७२॥
महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी ।
दहावीस गांढवांनीं । येऊन रास खाल्ली कीं ॥ ७३॥
ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली ।
खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥ ७४॥
मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार ।
वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥ ७५॥
दर्शन घेऊन सद्गुरुचें । त्या गजानन महाराजांचें ।
उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥ ७६॥
ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला ।
दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥ ७७॥
महाराज होते असनावरी । जगू पाटील समोरी ।
बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥ ७८॥
मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्य वदन ।
तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥ ७९॥
तुम्ही माझे भक्त होतां । मला राबण्या लावितां ।
झोंपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥ १८०॥
मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोंपीं गेला ।
गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षूं लागले ॥ ८१॥
म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले ।
रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥ ८२॥
ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणी ।
मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥ ८३॥
आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार ।
लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥ ८४॥
आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुलें आई! ।
सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥ ८५॥
खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला ।
तिमाजी नोकर नांवाला । व्यवहारदृष्टीं आहे कीं ॥ ८६॥
ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून ।
लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥ ८७॥
मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें ।
खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥ ८८॥
ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर ।
आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥ ८९॥
ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती ।
आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥ १९०॥
छे! छे! वेडया! तिमाजीस । नको मुळींच काढूंस ।
नोकरीवरुन खास । त्याचें वर्म सांगतों तुला ॥ ९१॥
तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी ।
दुःखी झाला असें मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥ ९२॥
रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत ।
आला होता भीत भीत । सकाळीं ना तुजकडे ॥ ९३॥
तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला ।
उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनियां पाहीन ॥ ९४॥
ऐसें गुरुवचन ऐकिलें। मारुतीसी चोज जहालें ।
पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥ ९५॥
गाढवें खळ्यांत पडलेलीं । कोणीं न त्या सांगितलीं ।
तीं अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥ ९६॥
शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी ।
असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥ ९७॥
तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची ।
त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥ ९८॥
मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर ।
त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥ ९९॥
तो होता हमरस्ता । बाजार पेठेचा तत्त्वतां ।
त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥ २००॥
नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें ।
समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥ १॥
तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत ।
साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥ २॥
ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला ।
लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥ ३॥
हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ ।
ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥ ४॥
वळ पाठ पोटावरी । उठते झाले निर्धारी ।
परी ना हवालदार आवरी । मारतां हात आपुला ॥ ५॥
ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून ।
आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥ ६॥
तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर ।
उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥ ७॥
कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी ।
वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ॥ ८॥
या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत ।
आजारीच मोडितो पथ्य । मरावया कारणें ॥ ९॥
तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें ।
अजून तरी उघडी डोळे । माफी माग गुन्ह्याची ॥ २१०॥
हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें ।
कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील! ॥ ११॥
हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ ।
तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥ १२॥
ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे ।
तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥ १३॥
तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले ।
त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥ १४॥
एका पंधरवडयांत । हवालदाराचे अवघे आप्त ।
होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥ १५॥
म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी ।
वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥ १६॥
नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवदा नदीचे कांठावर ।
गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥ १७॥
अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा ।
तेथील हरी जाखडयाचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥ १८॥
हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण ।
गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥ १९॥
तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी ।
बसतां झाला पायापासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥ २२०॥
तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन ।
कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडिती ॥ २१॥
तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी ।
येऊनियां पायापासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥ २२॥
कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार।
निवळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी? ॥ २३॥
आज अन्न मिळालें । उद्यांचें कोणीं पाहिलें ।
ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥ २४॥
संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण ।
मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल? ॥ २५॥
हे स्वामी गजानना! । सच्चिदानंदा दयाघना! ।
संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥ २६॥
ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी ।
प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥ २७॥
ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त ।
थुंकते झाले सद्गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥ २८॥
या हरी जाखडयानें । बावंच्या मागला मजकारणें ।
म्हणून आले थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥ २९॥
संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया ।
यानें येथें येऊनियां । संसारसुख मागितलें ॥ २३०॥
पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।
सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥ ३१॥
ऐसें आपणासी बोलले । पुन्हां जाखडयासी पाहिलें ।
जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥ ३२॥
तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून ।
होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥ ३३॥
जा आतां परत घरा । सुखें करी संसारा ।
करीत असावा परमेश्वर । आठव वेडया! विसरुं नको ॥ ३४॥
ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन ।
दिलें हरी जाखडयाकारण । लग्न स्वतःचें करावया ॥ ३५॥
हरी जाखडया संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं ।
महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥ ३६॥
ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार ।
रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥ ३७॥
बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर ।
तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥ ३८॥
हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत ।
इगतपुरी तालुक्यांत । बुध हो! नासिक जिल्ह्याच्या ॥ ३९॥
वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती ।
हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥ २४०॥
फलभारें तरुवर । वांकले असती अपार ।
वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥ ४१॥
असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्यासी ।
एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥ ४२॥
तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास ।
लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥ ४३॥
असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी ।
योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥ ४४॥
तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन ।
गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥ ४५॥
नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र ।
तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥ ४६॥
काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां ।
कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥ ४७॥
तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी ।
ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥ ४८॥
उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त ।
त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥ ४९॥
बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी ।
अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥ २५०॥
पोटीं ना अन्न तिळभर । बिर्हाड राहिलें बहु दूर ।
कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥ ५१॥
तैं निमोणकर म्हणे समर्था! । अंत माझा किती पहातां ।
ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥ ५२॥
तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी ।
हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥ ५३॥
षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर ।
त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥ ५४॥
मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत ।
योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥ ५५॥
गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा! ।
सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥ ५६॥
नेटाचा केला यत्न । ब्रह्मचर्य संभाळून ।
येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥ ५७॥
जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला ।
ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥ ५८॥
तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी ।
तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥ ५९॥
त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार ।
शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥ २६०॥
महाराज माझा कंटाळा । कांहो! आपणच कां केला ।
आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥ ६१॥
महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण ।
तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥ ६२॥
नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती ।
तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥ ६३॥
म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला! ।
मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥ ६४॥
धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत ।
पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥ ६५॥
ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले ।
भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥ ६६॥
कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं ।
तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥ ६७॥
मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण ।
कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥ ६८॥
तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला ।
तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥ ६९॥
हे अवघ्या सामर्थ्याची । खाण निःसंशय आहेत साची ।
सार्वभौमपदाची । त्याच्या पुढें न किंमत ॥ २७०॥
जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी ।
करणें पूजा-अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥ ७१॥
योगाभ्यास ही समोरी । त्या खेडयाच्या आदरें करी ।
त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥ ७२॥
तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडा बहुत ।
आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥ ७३॥
एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसीं ।
त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥ ७४॥
म्हणून त्यानें समर्थाला । एकदां नवस ऐसा केला ।
जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥ ७५॥
तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करान अर्पण ।
मनोरथ त्याचे पूर्ण । केले गजाननस्वामीनें ॥ ७६॥
दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली ।
आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥ ७७॥
तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण ।
औषधोपचार केले जाण । परी न आला गुण कांहीं ॥ ७८॥
नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली ।
धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥ ७९॥
ती स्थिति पाहून । तुकारामा झाली आठवण ।
नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥ २८०॥
तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया ।
अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥ ८१॥
ऐसा वचनबद्ध होतांक्षणीं । नाडी आली ठिकाणीं ।
हळूहळू नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥ ८२॥
व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण-कुमार ।
आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥ ८३॥
तो नारायण अझूनी । आहे तया ठिकाणीं ।
बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥ ८४॥
हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत ।
शेगांवीं त्या मठांत । संत-चरित्र ना कादंबरी ॥ ८५॥
असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी ।
घेऊन हरीपाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥ ८६॥
जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा ।
जो कल्पतरु भक्तांचा । कमलनाभ सर्वेश्वर ॥ ८७॥
जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती ।
जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥ ८८॥
पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान ।
गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राउळीं ॥ ८९॥
हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था ।
हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥ २९०॥
तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर ।
जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥ ९१॥
आतां अवतार-कार्य संपलें । हें तूं जाणसी वहिलें ।
पुंडलीक वरदा विठठले । जाया आज्ञा असावी ॥ ९२॥
देवा, मी भाद्रपद मासीं । जावया इच्छितों वैकुंठासी ।
अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥ ९३॥
ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणी ।
अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥ ९४॥
हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता ।
अश्रु कां हो सद्गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां? ॥ ९५॥
किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा ।
म्हणून आपणां खेद झाला । तें सांगा लवलाही ॥ ९६॥
महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर ।
सांगितलें तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥ ९७॥
तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्याभीतरीं ।
इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥ ९८॥
चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला ।
तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥ ९९॥
पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजीं भलें ।
चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥ ३००॥
तो म्हणे मंडळीस । महाराज वदले पंढरीस ।
संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राउळीं ॥ १॥
पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला ।
पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥ २॥
गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी ।
आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥ ३॥
कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रथित ।
चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥ ४॥
त्याची पूजा-अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण ।
दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥ ५॥
तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला ।
या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥ ६॥
दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित ।
तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥ ७॥
हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी।
ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥ ८॥
जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले ।
शरीरवस्त्रासी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥ ९॥
चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास ।
बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥ ३१०॥
मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका ।
कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥ ११॥
ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण ।
दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥ १२॥
शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास ।
भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥ १३॥
प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला ।
सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥ १४॥
देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन ।
स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥ १५॥
पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ ।
ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥ १६॥
गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी ।
गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥ १७॥
गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा ।
विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्यानें ॥ १८॥
अहो गजाननस्वामी समर्था! । आतां आम्हांस कोण त्राता? ।
कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून? ॥ १९॥
मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा बंकटलाल ।
ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामीचा जो असे ॥ ३२०॥
श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी ।
विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतीं श्रोते हो ॥ २१॥
आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस ।
हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥ २२॥
आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती ।
अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पहा ॥ २३॥
ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल ।
नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥ २४॥
गोविंदशास्त्री डोणगांवचे। एक विद्वान् होते साचे।
ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतीं ॥ २५॥
त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी ।
तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥ २६॥
त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया ।
पहा लोणी ठेवोनियां। येधवां मस्तकीं स्वामीच्या ॥ २७॥
लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं ।
जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥ २८॥
तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलता ।
एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥ २९॥
निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित ।
आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥ ३३०॥
तें अवघ्यांस मानवलें । स्वामीपुढें आदरें भलें ।
भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥ ३१॥
दुरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत ।
आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥ ३२॥
तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला ।
लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामीचें ॥ ३३॥
रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार ।
सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥ ३४॥
रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी ।
दीपोत्सव झाला भारी । त्या शेगावग्रामाला ॥ ३५॥
मूर्ति ठेविली रथात । मिरवणूक निघाली आनंदात ।
रात्रभरी शेगावात । तो ना थाट वर्णाचे ॥ ३६॥
वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार ।
होऊं लागला भगनगजर । विठ्ठलाच्या नावाचा ॥ ३७॥
तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळू लागले ।
फूलांखाली झाकून गेले । श्री गजानन महाराज ॥ ३८॥
बर्फीपेढ्यांस नाही मिती । लोक वाटती खिरापती ।
कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥ ३९॥
ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगावी निघून अखेर ।
उदयास येता दिनकर । परत आली मठात ॥ ४०॥
समाधीच्या जागेवरी । मूर्ती नेऊनी ठेविली खरी ।
रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥ ४१॥
पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर ।
भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नावाचा ॥ ४२॥
जय जय अवलीया गजानना! । हे नरदेहधारी नारायणा ।
अविनाशरूपा आनंदघना । परात्परा जगत्पते ॥ ४३॥
ऐशा भजनाभीतरी । मूर्ति ठेविली आसनावरी ।
उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणे ॥ ४४॥
अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण ।
’जय स्वामी गजानन’ । औइसे मुखे बोलोनी ॥ ४५॥
मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार ।
शिळा लावूनी केले द्वार । बंद भक्तांनी शेवटी ॥ ४६॥
दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ ।
घेऊनी गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥ ४७॥
खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा ।
सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥ ४८॥
स्वस्ती श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामे ग्रंथ ।
भाविका दावो सत्पथ । भक्ती हरीची करावया ॥ ३४९॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥
(PDF) Download श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय एकोणिसावा
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय विसावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.