समर्थ रामदास हे सतराव्या शतकातील एक संत आणि अध्यात्मिक कवी होते. त्यांनी दासबोध ग्रंथ लिहिला.
मन हे नेहमी सुखाच्या शोधात असतं. या सुखातून बरेचदा दुःख निर्माण होतं. चंचल व दुःखी मन सतत भटकत असतं. या मनाची भटकंती थांबवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मनाला उपदेश देणारे श्री मनाचे श्लोक (Shree Manache Shlok) लिहिले आहेत.
मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी मनावर कसे व कोणते संस्कार करावे हे सांगितले आहे. आपण मनांचे श्लोक अध्यात्मिक किंवा तत्वज्ञानिक दृष्टीने पाहू शकतो.
Shree Manache Shlok | श्री मनाचे श्लोक : १ ते २०
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥
सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥
मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥
मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥
जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥
मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥
मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥
बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥
(PDF) Download Shree Manache Shlok। डाउनलोड श्री मनांचे श्लोक
करुणाष्टके वाचण्यासाठी Karunashtake | करुणाष्टके येथे क्लिक करा.
जय जय रघुवीर समर्थ
जर समर्थ वांगमय मिळाले अजून तर खुप बरे होईल.
धन्यवाद. लवकरच प्रकाशित करू.