श्री गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा

कथासार

॥ अध्याय बेचाळिसावा ॥

॥ विश्वकर्मा – आख्यान, सायंदेवाला वरदान ॥

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरू सायंदेवाला त्वष्टापुत्राची कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, “साधूने त्वष्टाकुमारास काशीक्षेत्रातील पंचक्रोशीत वसलेल्या देवतांचे व लिंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्रप्रदक्षिणा पूर्ण होते ते नीट समजावून सांगितले. तो पुढे म्हणाला, “अशा प्रकारे क्षेत्रप्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे. तेथे देवासन्मुख उभे राहून पुढील मंत्र म्हणावा – ‘जय विश्वेश विश्वात्म काशीनाथ जगत्पते । त्वत्प्रसादान्महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा ॥अनेकजन्मपापानि कृतानि मम शंकर । गतानि पंचक्रोशात्म कृता लिंगप्रदक्षिणा ॥’ त्यानंतर मुक्तिमंडप, स्वर्गमंडप, ऐश्वर्यमंडप, ज्ञानमंडप, मोक्षलक्ष्मीविलास मंडप, आनंदमंडप आणि वैराग्यमंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे.” साधूने त्वष्टाकुमारास नित्ययात्रेचा विधी सांगितला. साधू त्वष्टाकुमारास म्हणाला, “बाळा, मी सांगितल्याप्रमाणे काशीयात्रा पूर्ण कर, नित्य गुरुदेवांचे स्मरण करीत राहा. भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील.” बोलणे पूर्ण होताच साधू अदृश्य झाला. तेव्हा त्वष्टाकुमार स्वतःशीच विचार करू लागला “गुरुभक्तीने सकल अभीष्ट साध्य होते हे खरे आहे. गुरुप्रसादामुळे भेट झाली. त्यांच्या रूपाने स्वतः विशेश्वरच मार्गदर्शन करून गेले.” त्याने साधूला कृतज्ञतेने नमस्कार केला. त्याने सांगितल्याप्रमाणे काशीक्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले, त्वष्टाकुमाराने त्याला सर्व वृत्तान्त सांगितला. तेव्हा विश्वनाथाने “तुझ्या गुरुभक्तीने मी तृप्त झालो आहे” असे प्रशंसोद्वार काढून त्याला ‘विश्वकर्मा’ असे नाव दिले. त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टिरचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले. त्वष्ट्याच्या त्या पुत्राने काशीमध्ये स्वतःच्या नावाने ‘विश्वकर्मश्वर लिंग’ स्थापन केले. तेथून तो गुरुगृही आला. गुरूसाठी घर, गुरुपत्नीसाठी चोळी, गुरुपुत्रासाठी पादुका व गुरु कन्येसाठी घरकुल, स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू देऊन गुरूला व त्याच्या परिवाराला संतुष्ट केले. त्या सर्वांना वंदन केले. तेव्हा गुरूने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले “बाळा, तू चिरंजीव होशील. तुझी कीर्ती अखंड राहील. तुला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील. तुला कधीही चिंता व कष्ट होणार नाहीत. तू त्रैलोक्यात अद्भुत सृष्टिरचना करशील.”

श्रीगुरूंनी सायंदेवाला गुरुभक्तीचा महिमा सांगितला. हे विश्वकर्म्याचे आख्यान संपूर्ण होताच सूर्योदय झाला. सायंदेवाने श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाला, “गुरुदेव, आपण काशीयात्रेत माझ्याबरोबर हिंडत आहात असे मला स्पष्ट जाणवत होते. हे स्वप्न होते की सत्य? मला काहीच माहीत नाही. आपली लीला मला कशी कळणार? आपण खूप थोर आहात.” ते ऐकून श्रीगुरूंनी मंद स्मित केले. त्याने तिथल्या तिथे श्रीगुरुवंदनात्मक संस्कृत कवन रवून श्रीगुरूंना ऐकविले आणि “तुम्हीच काशीविश्वनाथ आहात” असे म्हणून त्यांना वारंवार साष्टांग प्रणिपात केला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, “वत्सा, तू माझा निस्सीम भक्त आहेस म्हणून मी तुला काशीयात्रा घडविली. तुझ्या एकवीस पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल. आता यांची चाकरी करू नकोस. कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा. यापुढे तू माझीच सेवा कर.” ते ऐकून सायंदेवाला परम धन्यता वाटली.

मठात गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला. सायंदेव आनंदाने आपल्या गावी गेला. आपल्या पत्नीला व मुलांना गाणगापुरातील समग्र वृत्त सांगितले. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला तो परिवारासह श्रीगुरुंच्या दर्शनास आला. आपल्या चार मुलांना श्रीगुरुंच्या चरणांवर घातले. श्रीगुरूंसाठी स्तुतिपर प्रासादिक कवन कानडी भाषेत म्हटले. श्रीगुरूंनी त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि सायंदेवाला म्हणाले, “तुझा ज्येष्ठ पुत्र नागनाथ हा माझा परमभक्त होईल. हा आयुष्यमान होईल. याला यश, ऐश्वर्य, कीर्ती, संतती, संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होतील. तुला आणखी एक पत्नी असेल. तिला चार पुत्र होतील. तेही सुखात नांदतील. तुझ्यासाठी ‘यवनांची सेवा करायची नाही’ हीच मुख्य आज्ञा आहे. यवनाला नमस्कार जरी केलास तरी तुला मृत्यू येईल. आता संगमावर जाऊन स्नान करून ये.”

श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार सायंदेव परिवारासह संगमावर गेला. तेथे स्नान केले. अश्वत्थाची विधिपूर्वक पूजा करून ते सर्व मठात परतले. तेव्हा श्रीगुरू सर्वांना उद्देशून म्हणाले, “आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे. या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते. पूर्वी कौंडिण्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरिले होते. या व्रताचा विधी काय आहे? हे व्रत केल्याने काय पुण्यलाभ होतो? हे मी तुम्हांला सविस्तर सांगतो ऐका.”

सिद्ध म्हणाला, “नामधारका, श्रीगुरुंनी उपस्थित विप्रवर्गाला अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती त्यांच्याच शब्दांत सांगतो.”

श्री गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

संकल्प करोनिया मनीं । जावें स्वर्गद्वाराभुवनीं ।
गंगाकेशव पूजोनि । हरिश्चंद्र मंडपा जावें ॥१॥

स्वर्गद्वार असे जाण । मणिकर्णिकातीर्थ विस्तीर्ण ।
तुवां तेथें जावोन । संकल्पावें विधीनें ॥२॥

हविष्यान्न पूर्व दिवशीं । करोनि असावें शुचीसी ।
प्रातःकाळीं गंगेसी । स्नान आपण करावें ॥३॥

धुंडिराजातें प्रार्थोनि । मागावें करुणावचनीं ।
पुनर्दर्शन दे म्हणोनि । विनवावें परियेसा ॥४॥

मग गंगेतें नमोनि । जावें विश्वनाथभुवनीं ।
मग तयाते पूजोनि । भवानीशंकर पूजावा ॥५॥

मग जावें मुक्तिमंडपासीं । नमोनि निघावें संतोषीं ।
धुंडिराजाचे पूजेसी । पुनरपि जावें परियेसा ॥६॥

मागुती यावें महाद्वारा । विश्वेश्वर-पूजा करा ।
मोदादि पंच विघ्नेश्वरा । नमन करावें दंडपाणीसी ॥७॥

पूजा आनंदभैरवासी । मागुतीं यावें मणिकर्णिकेसी ।
पूजोनिया ईश्वरासी । सिद्धिविनायक पूजावा ॥८॥

गंगाकेशव पूजोनि । ललितादेवीसी नमोनि ।
राजसिद्धेश्वर आणा ध्यानीं । दुर्लभेश्वर पूजावा ॥९॥

सोमनाथ पूजा करीं । पुढें शूलटंकेश्वरी ।
मग पूजा वाराहेश्वरी । द्शाश्वमेध पूजा मग ॥१०॥

बंदी देवीतें पूजोनि । सर्वेश्वरातें नमोनि ।
केदारेश्वर धरा ध्यानीं । हनुमंतेश्वर पूजावा ॥११॥

मग पूजावा संगमेश्वरी । लोलार्कातें अवधारीं ।
अर्कविनायका पूजा करीं । दुर्गाकुंडीं स्नान मग ॥१२॥

आर्यादुर्गां देवी पूजोनि । दुर्गा गणेश ध्याऊनि ।
पुनर्दर्शन दे म्हणोनि । प्रार्थावें तयासी ॥१३॥

विश्वकूपेंत ईश्वरासी । कर्दमतीर्थी स्नान हर्षी ।
कर्दमेश्वरपूजेसी । तुवां जावें बाळका ॥१४॥

जावें कर्दमकूपासी । पूजा मग सोमनाथासी ।
मग विरुपालिंगासी । पूजा करीं ब्रह्मचारी ॥१५॥

पुढें जावें नीलकंठासी । पूजा करीं गा भावेंसी ।
कर जोडोनि भक्तींसी । कर्दमेश्वर पूजावा ॥१६॥

पुनर्दर्शन आम्हांसी । दे म्हणावें भक्तींसी ।
मग निघावें वेगेंसी । नागनाथाचे पूजेतें ॥१७॥

पुढें पूजीं चामुंडेसी । मोक्षेश्वरा परियेसीं ।
वरुणेश्वर भक्तींसी । पूजा करीं गा बाळका ॥१८॥

वीरभद्रपूजेसी । जावोनि द्वितीय दुर्गेसी ।
अर्चावें विकटाक्षा देवीसी । पूजा करीं मनोभावें ॥१९॥

पूजीं भैरव उन्मत्त । विमळार्जुन प्रख्यात ।
काळकूटदेवाप्रत । पूजा करीं गा बाळका ॥२०॥

पूजा करीं महादेवासी । नंदिकेश्वर भैरवासी ।
भृंगेश्वर विशेषीं । पूजा करीं मनोहर ॥२१॥

गणप्रियासी पूजोनि । विरुपाक्षातें नमोनि ।
यक्षेश्वर अर्चोनि । विमलेश्वर पूजीं मग ॥२२॥

भीमचंडीं शक्तीसी । पूजीं चंडीविनायकासी ।
रविरक्ताक्ष गंधर्वासी । पूजा करीं मनोभावें ॥२३॥

ज्ञानेश्वर असे थोर । पूजा पुढें अमृतेश्वर ।
गंधर्वसागर मनोहर । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४॥

नरकार्णव तरावयासी । पूजीं भीमचंडीसी ।
विनवावें तुम्हीं त्यासी । पुनर्दर्शन दे म्हणावें ॥२५॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय सातवा

एकपादविनायकासी । पुढें पूजीं भैरवासी ।
संगमेश्वरा भरंवसीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥२६॥

भूतनाथ सोमनाथ । कालनाथ असे विख्यात ।
पूजा करीं गा त्वरित । कपर्दिकेश्वरलिंगाची ॥२७॥

नागेश्वर कामेश्वर । पुढें पूजीं गणेश्वर ।
पूजा करीं विश्वेश्वर । चतुर्मुख विनायका ॥२८॥

पूजीं देहलीविनायकासी । पूजीं गणेश षोडशीं ।
उदंडगणेश षोडशीं । पूजा करीं मनोहर ॥२९॥

उत्कलेश्वर महाथोर । असे लिंग मनोहर ।
पुढें एकादश रुद्र । तयांचें पूजन करावें ॥३०॥

जावें तपोभूमीसी । पूजा करीं गा भक्तींसी ।
रामेश्वर महाहर्षीं । पूजीं मग सोमनाथ ॥३१॥

भरतेश्वर असे थोर । लक्ष्मणेश्वर मनोहर ।
पूजीं मग शत्रुघ्नेश्वर । भूमिदेवी अर्चीं मग ॥३२॥

नकुळेश्वर पूजोन । करीं रामेश्वरध्यान ।
पुनर्दर्शन दे म्हणोन । विनवावें परियेसा ॥३३॥

असंख्यात तीर्थ वरुण । तेथें करा तुम्हीं नमन ।
असंख्यात लिंगें जाण । पूजा करावी भक्तींसी ॥३४॥

पुढें असे लिंग थोर । नामें देव सिद्धेश्वर ।
पूजा करीं गा मनोहर । पशुपाणि विनायक ॥३५॥

याची पूजा करोनि । पृथ्वीश्वरातें नमोनि ।
शरयूकूपीं स्नान करोनि । कपिलधारा स्नान करीं ॥३६॥

वृषभध्वजा पूजोनि । ज्वालानृसिंहाचे वंदी चरणीं ।
वरुणासंगमीं स्नान करोनि । श्राद्धादि कर्मे करावीं ॥३७॥

संगमेश्वर पूजावा । सर्वविनायक बरवा ।
पुढें पूजीं तूं केशवा । भावें करुनि ब्रह्मचारी ॥३८॥

पूजा प्रर्‍हादेश्वरासी । स्नान कपिलातीर्थासी ।
त्रिलोचनेश्वरासी । पूजा करीं गा भक्तीनें ॥३९॥

पुढें असे महादेव । पंचगंगातीर ठाव ।
पूजा करीं गा भक्तिभावें । तया बिंदुमाधवासी ॥४०॥

पूजीं मंगळागौरीसी । गभस्तेश्वरा परियेसीं ।
वसिष्‍ठ वामदेवासी । पर्वतेश्वर पूजावा ॥४१॥

महेश्वराचे पूजेसी । पुढें सिद्धिविनायकासी ।
पूजा सप्तवर्णेश्वरासी । सर्वगणेश पूजावा ॥४२॥

मग जावें मणिकर्णिके । स्नान करावें विवेकें ।
विश्वेश्वरातें स्मरोनि निकें । महादेव पूजावा ॥४३॥

मग जावें मुक्तिमंडपासी । नमन करावे विष्णूसी ।
पूजीं दंडपाणीसी । धुंडिराज अर्चावा ॥४४॥

आनंदभैरव पूजोनि । आदित्येशा नमोनि ।
पूजा करीं गा भक्तींसी । मोदादि पंचविनायका ॥४५॥

पूजा करीं गा विश्वेश्वरासी । मोक्षलक्ष्मीविलासासी ।
नमोनि देवा संमुखेसी । मंत्र म्हणावा येणेंपरी ॥४६॥

श्लोक ॥ जय विश्वेश विश्वात्मन्‌ काशीनाथ जगत्पते ।
त्वत्प्रसादान्महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा ॥४७॥

अनेकजन्मपापानि कृतानि मम शंकर ।
गतानि पंचक्रोशात्मा कृता लिंगप्रदक्षिणा ॥४८॥

ऐसा मंत्र जपोन । पुढें करावें शिवध्यान ।
मुक्तिमंडपा येवोन । आठां ठायीं वंदावें ॥४९॥

प्रथम मुक्तिमंडपासी । नमन करावें परियेसीं ।
वंदोनि स्वर्गमंडपासी । जावें ऐश्वर्यमंडपा ॥५०॥

ज्ञानमंडपा नमोनि । मोक्षलक्ष्मीविलासस्थानीं ।
मुक्तिमंडपा वंदोनि । आनंदमंडपा जावें तुवा ॥५१॥

पुढें वैराग्यमंडपासी । तुवां जावें भक्तींसी ।
येणेंपरी यात्रेसी । करीं गा बाळा ब्रह्मचारी ॥५२॥

आणिक एक प्रकार । सांगेन ऐक विचार ।
नित्ययात्रा मनोहर । ऐक बाळका गुरुदासा ॥५३॥

सचैल शुचि होवोनि । चक्रपुष्करणीं स्नान करोनि ।
देवपितर तर्पोनि । ब्राह्मणपूजा करावी ॥५४॥

मग निघावें तेथोनि । पदादित्येश्वर पूजोनि ।
दंपत्येश्वर नमोनि । श्रीविष्णूतें पूजावें ॥५५॥

मग नमावा दंडपाणि । महेश्वरातें पूजोनि ।
मग निघावें तेथोनि । धुंडिराज अर्चिजे ॥५६॥

ज्ञानवापीं करी स्नान । नंदिकेश्वर अर्चोन ।
तारकेश्वर पूजोन । पुढें जावें मग तुवां ॥५७॥

महाकाळेश्वर देखा । पूजा करीं भावें एका ।
दंडपाणि विनायका । पूजा करीं मनोहर ॥५८॥

मग यात्रा विश्वेश्वर । करीं गा बाळका मनोहर ।
लिंग असे ओंकारेश्वर । प्रतिपदेसी पूजावा ॥५९॥

मत्स्योदरी तीर्थासी । स्नान करावें प्रतिपदेसी ।
त्रिलोचन महादेवासी । दोन्ही लिंगे असतीं जाण ॥६०॥

तेथें बीजतिजेसी । जावें तुवां यात्रेसी ।
यात्रा जाण चतुर्थीसी । कांचीवास लिंग जाणा ॥६१॥

रत्‍नेश्वर पंचमीसी । चंद्रेश्वरपूजेसी ।
षष्ठीसी जावें परियेसीं । ऐक शिष्या एकचित्तें ॥६२॥

सप्तमीसी केदारेश्वर । अष्टमीसी लिंग धूमेश्वर ।
विश्वेश्वर लिंग थोर । नवमी यात्रा महापुण्य ॥६३॥

कामेश्वर दशमीसी । एकादशीसी विश्वेश्वरासी ।
द्वादशीसी मणिकर्णिकेसी । मणिकेश्वर पूजावा ॥६४॥

त्रयोदशी प्रदोषेसी । पूजा अविमुक्तेश्वरासी ।
चतुर्दशीसी विशेषीं । विश्वेश्वर पूजावा ॥६५॥

जे कोणी काशीवासी । असती नर परियेसीं ।
त्यांणीं करावी यात्रा ऐसी । नाहीं तरी विघ्न घडे ॥६६॥

शुक्लपक्षीं येणेंपरी । यात्रा करीं मनोहरी ।
कृष्णपक्ष आलियावरी । यात्रा करा सांगेन ॥६७॥

चतुर्दशी धरोनि । यात्रा करा प्रतिदिनीं ।
सांगेन ऐका विधानीं । एकचित्तें परियेसा ॥६८॥

वरुणानदीं करा स्नान । करा शैल्येश्वरदर्शन ।
संगमेश्वर पूजोन । संगमीं स्नान तये दिनीं ॥६९॥

स्वर्गतीर्थस्नानेंसी । स्वर्गेश्वर पूजा हर्षी ।
मंदाकिनी येरे दिवसीं । मध्यमेश्वर पूजावा ॥७०॥

मणिकर्णिका स्नानेंसी । पूजा ईशानेश्वरासी ।
हिरण्यगर्भ परियेसीं । दोनी लिंगें पूजिजे ॥७१॥

स्नान धर्मकूपेसी । करीं पूजा गोपद्मेश्वरासी ।
पूजा करा तया दिवसीं । एकचित्तें परियेसा ॥७२॥

कपिलधारा तीर्थासी । स्नान करा भक्तींसी ।
वृषभध्वज लिंगासी । सप्तमीचे दिवसीं पूजीं पै ॥७३॥

उपाशांतिकूपेसी । स्नान करा भक्तींसी ।
उपशांतेश्वरासी । पूजा करीं तया दिनीं ॥७४॥

पंचचूडडोहांत । स्नान करा शिव ध्यात ।
ज्येष्ठेश्वरा त्वरित । पूजावें तया दिनीं ॥७५॥

चतुःसमुद्रकूपासी । स्नान करीं भावेंसी ।
समुद्रेश्वर हर्षी । पूजा करीं तया दिनीं ॥७६॥

देवापुढें कूप असे । स्नान करावें संतोषें ।
शुक्रेश्वर पूजा हर्षें । पूजा करीं तया दिनीं ॥७७॥

दंडखात तीर्थेंसी । स्नान करोनि देवासी ।
व्याघ्रेश्वरपूजेसी । तुंवा जावें तया दिनीं ॥७८॥

शौनकेश्वरतीर्थेसी । स्नान तुम्ही करा हर्षीं ।
तीर्थनामें लिंगासी । पूजा करा मनोहर ॥७९॥

जंबुतीर्थ मनोहर । स्नान करा शुभाचार ।
पूजावा भावें जंबुकेश्वर । चतुर्दश लिंगें येणेंपरी ॥८०॥

शुक्लपक्षकृष्णेसी । अष्‍टमी तिथि विशेषीं ।
पूजावें तुम्हीं लिंगासी । सांगेन ऐका महापुण्य ॥८१॥

मोक्षेश्वर पर्वतेश्वर । तिसरा पशुपतेश्वर ।
गंगेश्वर नर्मदेश्वर । पूजा करीं मनोभावें ॥८२॥

आणिक भक्तेश्वर गभस्तीश्वर । मध्यमेश्वर असे थोर ।
तारकेश्वरनामें निर्धार । नव लिंगें पूजावीं ॥८३॥

आणिक लिंगें एकादश । नित्ययात्रा विशेष ।
लिंग असे अग्निध्रुवेश । यात्रा तुम्हीं करावी ॥८४॥

दुसरा असे उर्वशीश्वर । नकुलेश्वर मनोहर ।
चौथा असे आषाढेश्वर । भारभूतेश्वर पंचम ॥८५॥

लांगूलेश्वरीं करा पूजा । करा त्रिपुरांतका ओजा ।
मनःप्रकामेश्वरकाजा । तुम्हीं जावें परियेसा ॥८६॥

प्रीतेश्वर असे देखा । मंदालिकेश्वर ऐका ।
तिलपर्णेश्वर निका । पूजा करीं भावेंसी ॥८७॥

आतां शक्तियात्रेसी । सांगेन ऐका विधीसी ।
शुक्लपक्षतृतीयेसी । आठ यात्रा कराव्या ॥८८॥

गोप्रेक्षतीर्थ देखा । स्नान करोनि ऐका ।
पूजा मुख्य भाळनेत्रिका । भक्तिभावेंकरोनिया ॥८९॥

ज्येष्‍ठवापीं स्नानेंसी । ज्येष्‍ठागौरी पूजा हर्षीं ।
स्नान पान करा वापीसी । शृंगार सौभाग्य गौरीपूजा ॥९०॥

विशाळगंगास्नानासी । पूजा विशाळगौरीसी ।
ललितातीर्थस्नानेसी । ललिता देवी पूजावी ॥९१॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा

स्नान भवानीतीर्थेसी । पूजा करा भवानीसी ।
बिंदुतीर्थ स्नानासी । मंगळागौरी पूजावी ॥९२॥

पूजा इतुके शक्तींसी । मग पूजिजे लक्ष्मीसी ।
येणें विधी भक्तींसी । यात्रा करीं मनोहर ॥९३॥

यात्रातीर्थ चतुर्थीसी । पूजा सर्व गणेशासी ।
मोदक द्यावे गौरीपुत्रासी । विघ्न न करीं तीर्थवासियांतें ॥९४॥

मंगळ अथवा रविवारेंसी । यात्रा करीं भैरवासी ।
षष्‍ठी तिथि परियेसीं । जावें तुम्हीं मनोहर ॥९५॥

रविवारीं सप्तमीसी । यात्रा रविदेवासी ।
नवमी अष्‍टमी चंडीसी । यात्रा तुम्हीं करावी ॥९६॥

अंतर्गृहयात्रेसी । करावी तुम्हीं प्रतिदिवसीं ।
विस्तारकाशीखंडासी । ऐक शिष्या ब्रह्मचारी ॥९७॥

ऐशी काशीविश्वेश्वर । यात्रा करावी तुम्हीं परिकर ।
आपुल्या नामीं सोमेश्वर । लिंगप्रतिष्ठा करावी ॥९८॥

इतुकें ब्रह्मचारियासी । यात्रा सांगितली परियेसीं ।
आचरण करीं येणें विधींसी । तुझी वासना पुरेल ॥९९॥

तुझे चित्तीं असे गुरु । प्रसन्न होईल शंकरु ।
मनीं धरीं गा निर्धारु । गुरुस्मरण करीं निरंतर ॥१००॥

इतकें सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं ।
ब्रह्मचारी म्हणे हर्षीं । हाचि माझा गुरु सत्य ॥१॥

अथवा होईल ईश्वर । मज कृपाळू झाला सत्वर ।
कार्यं लाधेल निर्धार । म्हणोनि मनीं धरियेलें ॥२॥

न आराधितां आपोआप । भेटला मातें मायबाप ।
गुरुभक्तीनें अमूप । सकाळाभीष्‍टें पाविजे ॥३॥

समस्त देवा ऐशी गति । दिल्यावांचोन न देती ।
ईश्वर भोळा चक्रवर्ती । गुरुप्रसादें भेटला ॥४॥

यज्ञ दान तप सायास । कांहीं न करितां सायास ।
भेटला मज विशेष । गुरुकृपेंकरोनिया ॥५॥

ऐसें गुरुस्मरण करीत । ब्रह्मचारी जाय त्वरित ।
विधिपूर्वक आचरत । यात्रा केली भक्तीनें ॥६॥

यात्रा करितां भक्तींसी । प्रसन्न झाला व्योमकेशी ।
निजस्वरुपें संमुखेसी । उभा राहिला शंकर ॥७॥

प्रसन्न होवोनि शंकर । म्हणे दिधला माग वर ।
संतोषोनि त्वष्‍ट्रकुमार । निवेदिता झाला वृत्तान्त ॥८॥

जें जें मागितलें गुरुवर्यें । आणिक त्याचे कन्याकुमारें ।
सांगता झाला विस्तारें । शंकराजवळी देखा ॥९॥

संतोषोनि ईश्वर । देता झाला अखिल वर ।
म्हणे बाळा माझा कुमार । सकळ विद्याकुशल होसी ॥११०॥

तुवां केली गुरुभक्ति । तेणें झाली आपणा तृप्ति ।
अखिल विद्या तुज होती । विश्वकर्मा तूंचि होसी ॥११॥

चतुर्विध पुरुषार्थ । लाधला तुज परमार्थ ।
सृष्‍टि रचावया समर्थ । होसी जाण त्वष्‍ट्रपुत्रा ॥१२॥

ऐसा वर लाधोन । त्वष्‍टा ब्रह्मानंदन ।
केलें लिंग स्थापन । आपुले नामीं परियेसा ॥१३॥

मग निघाला तेथोनि । केली आयती तत्क्षणीं ।
प्रसन्न होतां शूलपाणि । काय नोहे तयासी ॥१४॥

जें जें मागितलें श्रीगुरुवरें । सकळ वस्तु केल्या चतुरें ।
घेऊनिया सत्वरें । आला श्रीगुरुसंमुख ॥१५॥

सकळ वस्तु देऊनि । लागतसे श्रीगुरुचरणीं ।
अनुक्रमें गुरुरमणि । पुत्र-कन्येंसी वंदिलें ॥१६॥

उल्हास झाला श्रीगुरुसी । आलिंगितसे महाहर्षीं ।
शिष्य ताता ज्ञानराशि । तुष्‍टलों तुझे भक्तीनें ॥१७॥

सकल विद्याकुशल होसी । अष्टैश्वर्ये नांदसी ।
त्रैमूर्ति तुझिया वंशीं । होतील ऐक शिष्योत्तमा ॥१८॥

घर केलें तुवां आम्हांसी । आणिक वस्तु विचित्रेंसी ।
चिरंजीव तूंचि होसी । आचंद्रार्क तुझें नाम ॥१९॥

स्वर्गमृत्युपाताळासी । पसरवीं तुझे चातुर्यासी ।
रचिसी तूंचि सृष्‍टीसी । विद्या चौसष्‍टी तूंचि ज्ञाता ॥१२०॥

तुज वश्य अष्‍ट सिद्धि । होतील जाण नव निधि ।
चिंता कष्‍ट न होती कधीं । म्हणोनि वर देतसे ॥२१॥

ऐसा वर लाधोनि । गेला शिष्य महाज्ञानी ।
येणेंपरी विस्तारोनि । सांगे ईश्वर पार्वतीसी ॥२२॥

ईश्वर म्हणे गिरिजेसी । गुरुभक्ति आहे ऐसी ।
एकभाव असे ज्यासी । सकळाभीष्‍टें पावती ॥२३॥

भव म्हणिजे सागर । उतरावया पैल पार ।
समर्थ असे एक गुरुवर । त्रैमूर्तीचा अवतार ॥२४॥

या कारणें त्रैमूर्ति । गुरुचरणीं भजती ।
वेदशास्त्रें बोलती । गुरुविणें सिद्धि नाहीं ॥२५॥

श्लोक ॥ यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ ।
तस्यैते कथिता ह्यर्था : प्रकाशन्ते महात्मनः ॥२६॥

ऐसें ईश्वर पार्वतीसी । सांगता झाला विस्तारेंसी ।
म्हणोनि श्रीगुरु प्रीतीसी । निरोपिलें द्विजातें ॥२७॥

इतुकें होतां रजनीसी । उदय झाला दिनकरासी ।
चिंता अंधकारासी । गुरुकृपा ज्योती जाणा ॥२८॥

संतोषोनि द्विजवर । करिता झाला नमस्कार ।
ऐसी बुद्धि देणार । तूंचि स्वामी कृपानिधि ॥२९॥

नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे भावेंसी ।
स्वामी कथा निरोपिलीसी । अपूर्व मातें वाटलें ॥१३०॥

काशीयात्राविधान । निरोपिलें मज विस्तारोन ।
तया वेळीं होतों आपण । तुम्हांसहित तेथेंचि ॥३१॥

पाहिलें आपण दृष्‍टान्तीं । स्वामी काशीपुरीं असती ।
जागृतीं कीं सुषुप्तीं । नकळे मातें स्वामिया ॥३२॥

म्हणोनि विप्र तये वेळीं । वंदी श्रीगुरुचरणकमळीं ।
विनवीतसे करुणा बहाळी । भक्तिभावेंकरोनिया ॥३३॥

जय जया परमपुरुषा । परात्परा परमहंसा ।
भक्तजनमानसहंसा । श्रीनृसिंहसरस्वती ॥३४॥

ऐसें तया अवसरीं । पूर्वज तुझा स्तोत्र करी ।
सांगेन तुज अवधारीं । एकचित्तें करुनिया ॥३५॥

श्लोक ॥ आदौ ब्रह्मत्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं ।
पश्चात्‌ क्षोणिजडा विनाश-दितिजां कृत्वाऽवतारं प्रभो ।
हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं, भूत्वाऽत्मजोऽत्रेर्गृहे ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥३६॥

भूदेवाखिलमानुषं विदुजना बाधायमानं कलिं ।
वेदादुश्यमनेकवर्णमनुजा, भेदादि-भूतोन्नतम्‌ ।
छेदः कर्मतमांधकारहरणं श्रीपादसूर्योदयं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥३७॥

धातस्त्वं हरिशंकरप्रतिगुरो, जाताग्रजन्मं विभो ।
हेतुः सर्वविदोजनाय तरणं, ज्योतिःस्वरुपं जगत्‌ ।
चातुर्थाश्रमस्थापितं क्षितितले, पातुः सदा सेव्ययं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥३८॥

चरितं चित्रमनेककीर्तिमतुलं, परिभूतभूमंडले ।
मूकं वाक्यदिवांधकस्य नयनं, वंध्यां च पुत्रं ददौ ।
सौभाग्यं विधवां च दायकश्रियं, दत्त्वा च भक्तं जनं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥३९॥

दुरितं, घोरदरिद्रदावतिमिरं, हरणं जगज्जोतिष ।
स्वर्धेंनुं सुरपादपूजितजना, करुणाब्धिभक्तार्तितः ।
नरसिंहेंद्रसरस्वतीश्वर विभो, शरणागतं रक्षकं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥१४०॥

गुरुमूर्तिश्चरणारविंदयुगलं, स्मरणं कृतं नित्यसौ ।
चरितं क्षेत्रमनेकतीर्थसफलं सरितादि-भागीरथी ।
तुरगामेधसहस्त्रगोविदुजनाः स्मयक्‌ ददंस्तत्फलं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥४१॥

नो शक्यं तव नाममंगल-स्तुवं, वेदागमागोचरं ।
पादद्वं ह्रदयाब्जमंतरजलं निर्धारमीमांसतं ।
भूयो भूयः स्मरन्नमामि मनसा, श्रीमद्‌गुरुं पाहि मां ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥४२॥

भक्तानां तरणार्थ सर्वजगतां, दीक्षां ददन्योगिनां ।
सुक्षेत्रं पुरगाणगस्थित प्रभो, दत्त्वा चतुष्कामदं ।
स्तुत्वा भक्तसरस्वतीगुरुपदं, जित्वाऽद्यदोषादिकं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥४३॥

एवं श्रीगुरुनाथमष्‍टकमिदं स्तोत्रं पठेन्नित्यसौ ।
तेजोवर्चबलोन्नतं श्रियकरं आनंदवर्धं वपुः ।
पुत्रापत्यमनेकसंपदशुभा दीर्घायुरारोग्यतां ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥४४॥

येणेंपरी स्तोत्र करीत । मागुती करी दंडवत ।
सद्‌गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठियेले ॥४५॥

म्हणे त्रैमूर्ति अवतारु । तूंचि देवा जगद्गुरु ।
आम्हां दिसतोसी नरु । कृपानिधि स्वामिया ॥४६॥

मज दाविला परमार्थ । लाधलों चारी पुरुषार्थ ।
तूंचि सत्य विश्‍वनाथ । काशीपुर तुजपाशीं ॥४७॥

ऐसेंपरी श्रीगुरुसी । विनवीतसे परियेसीं ।
संतोषोनि महाहर्षीं । निरोप देती तये वेळीं ॥४८॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । दाखविली तुज काशी ।
पुढें तुझ्या वंशीं एकविसांसी । यात्राफळ तयां असे ॥४९॥

तूंचि आमुचा निजभक्त । दाखविला तुज दृष्‍टान्त ।
आम्हांपासीं सेवा करीत । राहें भक्ता म्हणती तया ॥१५०॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय चव्वेचाळीसावा

जरी राहसी आम्हांपासी । तरी त्वां न वंदिजे म्लेंच्छासी ।
आणोनिया स्त्रीपुत्रांसी । भेटी करीं आम्हांतें ॥५१॥

निरोप देऊनि द्विजासी । गेले गुरु मठासी ।
आनंद झाला मनासी । श्रीगुरुदर्शनीं भक्तजना ॥५२॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां ।
विनवीतसे कर जोडोनि जाणा । भक्तिभावेंकरोनिया ॥५३॥

मागें कथानक निरोपिलें । सायंदेव शिष्य श्रीगुरुंनीं त्यातें निरोपिलें ।
कलत्रपुत्र आणीं म्हणत ॥५४॥

पुढें तया काय झालें । विस्तारोनि सांगा वहिलें ।
पाहिजे आतां अनुग्रहिलें । म्हणोनि चरणीं लागला ॥५५॥

संतोषोनि सिद्ध मुनि । सांगतसे विस्तारोनि ।
सायंदेव महाज्ञानी । गेला श्रीगुरुनिरोपें ॥५६॥

जाऊनि आपुले स्त्रियेसी । सांगता झाला पुत्रासी ।
आमुचा गुरु परियेसीं । असे गाणगापुरांत ॥५७॥

आम्हीं जावें भेटीसी । समस्त कन्यापुत्रांसी ।
म्हणोनि निघाला वेगेंसी । महानंदेंकरोनिया ॥५८॥

पावला गाणगापुरासी । भेटी जहाली श्रीगुरुसी ।
नमन करी भक्तींसी । साष्‍टांगीं तये वेळीं ॥५९॥

कर जोडुनी तये वेळीं । स्तोत्र करी वेळोवेळीं ।
ओंनमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥१६०॥

तूं त्रैमूर्तिचा अवतार । अज्ञानदृष्‍टीं दिससी नर ।
वर्णावया न दिसे पार । तुझा महिमा स्वामिया ॥६१॥

तुझा महिमा वर्णावयासी । शक्ति कैची आम्हांसी ।
आदिपुरुष भेटलासी । कृपानिधि स्वामिया ॥६२॥

जैसा चंद्र चकोरासी । उदय होतां संतोष त्यासी ।
तैसा आनंद आम्हांसी । तुझे चरण लक्षितां ॥६३॥

पूर्वजन्मीं पापराशि । केल्या होत्या बहुवशी ।
श्रीगुरुचे दर्शनेसी । पुनीत झालों म्हणतसे ॥६४॥

जैसा चिंतामणि स्पर्शीं । हेमत्व होय लोहासी ।
मृत्तिका पडतां जंबूनदीसी । उत्तम सुवर्ण होतसे ॥६५॥

जातां मानससरोवरासी । हंसत्व येई वायसासी ।
तैसें तुझे दर्शनेंसी । पुनीत झालों स्वामिया ॥६६॥

श्लोक ॥ गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तस्था ।
पापं तापं च हरति दैन्यं च गुरुदर्शनम्‌ ॥१॥

टीका ॥ गंगा स्नानानें पापें नाशी । ताप निवारी देखा शशी ।
कल्पवृक्षछायेसी । कल्पिलें फळ पाविजे ॥६७॥

एकेकाचे एकेक गुणें । असतीं ऐसीं हीं लक्षणें ।
दर्शन होतां श्रीगुरुचरणें । तिन्ही फळें पाविजे ॥६८॥

पापें हरती तात्काळीं । तापचिंता जातीं सकळी ।
दैन्यकानन समूळ जाळी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥६९॥

चतुर्विध पुरुषार्थ । देता होय गुरुनाथ ।
ऐसा वोले वेदसिद्धान्त । तोचि आम्हीं देखिला ॥१७०॥

म्हणोनिया आनंदेंसी । गायन करी संतोषीं ।
अनेक रागें परियेसीं । कर्नाटक भाषें करोनि ॥७१॥

राग श्रीराग । कंडेनिंदु भक्तजनराभाग्यनिधियभूमंडलदोळगेनारसिंहसरस्वतीया ॥७२॥

कंडेनिंदुउंडेनिंदुवारिजादोळपादवाराजाकमळांदोळदंतध्यानिसी ॥७३॥

सुखसुवाजनारुगळा । भोरगेलान्नेकामिफळफळा ।
नित्यसकळाहूवा । धीनारसिंहसरस्वतीवरानना ॥७४॥

वाक्यकरुणानेनसुवा । जगदोळगदंडकमंडलुधराशी ।
सगुणानेनीशीसुजनरिगे । वगादुनीवासश्रीगुरुयतिवरान्न ॥७५॥

धारगेगाणगापुरडोलकेलाशीहरी । दासिसोनुनादयाकरुणादली ।
वरावीतुंगमुनाहोरावनुअनुबिना । नारसिंहसरस्वतीगुरुचरणवन्न ॥७६॥

राजगखंडीकंडीनेननमा । इंदुकडेनेनमा ।
मंडलादोळगेयती कुलराये । चंद्रमन्ना ॥७७॥

तत्त्वबोधायाउपनिषदतत्त्वचरित नाव्यक्तवादपरब्रह्ममूर्तियनायना ।
शेषशयनापरवेशकायना । लेशकृपयनीवनेवभवासौपालकाना ॥७८॥

गंधपरिमळादिशोभितानंदासरसाछंदालयोगेंद्रेगोपीवृंदवल्लभना ॥७९॥

करीयनीयानांपापगुरु । नवरसगुसायन्नीं ।
नरसिंहसरस्वत्यन्ना । नादपुरुषवादना ॥१८०॥

यापरी स्तोत्रें श्रीगुरुसी । स्तुति केली बहुवसीं ।
संतोषोनि महाहर्षीं । आश्वासिताती तये वेळीं ॥८१॥

प्रेमभावें समस्तांसी । बैसा म्हणती समीपेसी ।
जैसा लोभ मायेसी । या बाळकावरी परियेसा ॥८२॥

आज्ञा घेउनी सहज । गेला तुमचा पूर्वज ।
सकळ पुत्रांसहित द्विज । आला श्रीगुरुदर्शना ॥८३॥

भाद्रपद चतुर्दशीसी । शुक्लपक्ष परियेसीं ।
आला शिष्य भेटीसी । एकाभावेंकरोनिया ॥८४॥

येती शिष्य लोटांगणीं । एकाभावें तनुमनीं ।
येऊनि लागती चरणीं । सद्गदित कंठ झाला ॥८५॥

स्तोत्र करिती तिहीं काळीं । कर जोडोनि तये वेळीं ।
ओं नमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥८६॥

त्रैमूर्तींचा अवतारु । झालासी तूं जगद्गुरु ।
येरां दिसतोसी नरु । न कळे पार तुझा स्वामिया ॥८७॥

सिद्ध म्हणे नामकरणी । काय सांगू तये दिनीं ।
कैशी कृपा अंतःकरणीं । तया श्रीगुरु यतीचे ॥८८॥

आपुले पुत्रकलत्रेंसी । जैसा लोभ परियेसीं ।
तैसा तुमचे पूर्वजासी । प्रेमभावें पुसताती ॥८९॥

गृहवार्ता सुरसी । क्षेम पुत्रकलत्रेंसी ।
द्विज सांगे मनोहर्षी । सविस्तारीं परियेसा ॥१९०॥

पुत्रकलत्रेंसंहित नमोन । सांगे क्षेम समाधान ।
होते पुत्र चौघेजण । चरणावरी घातले ॥९१॥

ज्येष्‍ठसुत नागनाथ । तयावरी कृपा बहुत ।
कृपानिधि गुरुनाथ । माथां हस्त ठेविती ॥९२॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । तुझ्या ज्येष्‍ठसुतासी ।
आयुष्य पूर्ण असे त्यासी । संतति बहु याची वाढेल ॥९३॥

हाच भक्त आम्हांसी । असेल श्रियायुक्तेसी ।
तुवां आतां म्लेंच्छासी । सेवा न करावी म्हणितलें ॥९४॥

आणिक तूंतें असे नारी । पुत्र होती तीस चारी ।
नांदतील श्रेयस्करी । तुवां सुखें असावें ॥९५॥

जया दिवसीं म्लेंच्छासी । तुवां जावोनि वंदिसी ।
हानि असे जीवासी । म्हणोनि सांगती तये वेळीं ॥९६॥

तुझा असे वडिल सुत । तोचि आमुचा निज भक्त ।
त्याची कीर्ति वाढेल बहुत । म्हणती श्रीगुरु तये वेळीं ॥९७॥

मग म्हणती द्विजासी । जावें त्वरित संगमासी ।
स्नान करोनि त्वरितेंसी । यावें म्हणती तये वेळीं ॥९८॥

ग्रामलोक तया दिवसीं । पूजा करितां अनंतासी ।
येऊनिया श्रीगुरुसी । पूजा करितो परियेसा ॥९९॥

पुत्रमित्रकलत्रेंसी । गेले स्नाना संगमासी ।
विधिपूर्वक अश्वत्थासी । पूजूनि आले मठातें ॥२००॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । आजि व्रतचतुर्दशी ।
पूजा करीं अनंतासी । समस्त द्विज मिळोनि ॥१॥

ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु ।
आमुचा अनंत तूंचि गुरु । व्रतसेवा तुमचे चरण ॥२॥

तये वेळीं श्रीगुरु । सांगतां झाला विस्तारु ।
कौंडिण्यमहाऋषीश्वरु । केलें व्रत प्रख्यात ॥३॥

ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु ।
कैसें व्रत आचरावें साचारु । पूर्वीं कोणी केलें असे ॥४॥

ऐसें व्रत प्रख्यात । व्रत दैवत अनंत ।
जेणें होय माझें हित । कथामृत निरोपिजे ॥५॥

येणें पुण्य काय घडे । काय लाभतसे रोकडें ।
ऐसें मनींचें साकडें । फेडावें माझें स्वामिया ॥६॥

ऐसें विनवीतसे द्विजवरु । संतोषोनि गुरु दातारु ।
सांगते झाले व्रताचारु । सिद्ध म्हणे नामधारका ॥७॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधरु । सांगे गुरुचरित्रविस्तारु ।
ऐकतां भवसागरु । पैल पार पाववी श्रीगुरु ॥८॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीयात्रा समस्त करीत ।
श्रोते ऐकती आनंदित । तेणें सफल जन्म होय ॥९॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सांगतसे नामधारक विख्यात ।
जेणें होय मोक्ष प्राप्त । द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥२१०॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीक्षेत्रमहिमावर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥४२॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥     ॥ ओवीसंख्या ॥२१०॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा
श्री गुरुचरित्र सप्ताह वाचन - अध्याय ४२ | Gurucharitra Adhyay 42 । Saptah Vachan
श्री गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा

श्री गुरूचरित्र – अध्याय त्रेचाळीसावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link