श्री गुरूचरित्र – अध्याय पंचेचाळीसावा

कथासार

॥ अध्याय पंचेचाळिसावा ॥

॥ नंदी ब्राह्मणाचे श्वेतकुष्ठ घालविले ॥

श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणाला, “नामधारका, नंदी नावाच्या एका ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ झाले होते. ते जाण्यासाठी त्याने तीन वर्षे तुळजापुरात राहून भवानीची आराधना केली. उपवासाचे कष्ट सोसले. भवानीने त्याला स्वप्नामध्ये चंदलापरमेश्वरी देवीच्या देवळात जाऊन आराधना करण्यास सांगितली. त्याने तेथे सात महिने पुरश्चरण केले. तिने त्याला स्वप्नात येऊन सांगितले, “तू गाणगापुरास जा. तेथे दत्तात्रेय मानवी रूपाने भक्तकार्यासाठी अवतरले आहेत. ते तुला व्याधिमुक्त करतील.” तेव्हा नंदी म्हणाला, “मी तुळजाभवानीला साकडे घातले. तिने मला तुझ्याकडे पाठविले. तुला शरण आलो तर तू मला एका मनुष्याकडे पाठवीत आहेस याला काय म्हणावे? कळले तुमचे देवपण माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला.” मग तो ‘मरण आले तरी चालेल पण बरे होईपर्यंत येथेच पुरश्चरण करायचे’ असा निर्वाणीचा निर्धार करून देवीद्वारी धरणे धरून बसला.

देवीने त्याला पुन्हा गाणगापुरास जाण्यास सांगितले. पण तो गेलाच नाही. तेव्हा देवीने पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन नंदी विप्राला येथून घालवून देण्यास सांगितले. तिच्या आज्ञेने पुजाऱ्यांनी नंदीला देवळात येण्यास मज्जाव केला. नंदी ब्राह्मणाचा नाइलाज झाला. त्याने उद्यापन केले आणि देवीचा निरोप घेऊन गाणगापुरास आला. लोकांनी त्याला मठाबाहेरच थांबविले. श्रीगुरू संगमावरून आल्यावर त्यांच्या आज्ञेने त्याला बोलावून घेतले. त्याला पाहताच श्रीगुरु म्हणाले, “काय रे, देवीला जे जमले नाही तेथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनच येथे आला आहेस ना?” ते ऐकताच नंदीला श्रीगुरूंच्या अंतःसाक्षित्वाची खूण पटली. त्याने पश्चात्तापाने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला, “स्वामी, या व्याधीने मी मातापित्याची, पत्नीची, समाजाची उपेक्षा सहन केली. देवीनेही माझे गाऱ्हाणे ऐकले नाही. मी निराशेने येथे आलो आहे. आता मला देहाचीही चाड नाही. तुम्ही मला व्याधिमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा. माझी सहनशक्ती संपली आहे. आता मी प्राणत्यागच करणार.”

त्याची आर्तता जाणून श्रीगुरूंना व उपस्थितांनाही वाईट वाटले. श्रीगुरूंनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलावले. त्याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले. श्रीगुरूंच्या आज्ञेने सोमनाथाने नंदीला संगमावर नेले. तेथे त्याच्याकडून संकल्प करवून घेतला. तेथे संगमतीर्थात स्नान करताच त्याच्या देहाचा वर्ण पालटला. अश्वत्थाला  प्रदक्षिणा घालताच कोडाचे समूळ निरसन झाले. सोमनाथाने त्याला नवीन वस्त्रे दिली. त्याची जीर्ण वस्त्रे जेथे टाकण्यात आली तेथील जमीन क्षारयुक्त झाली. नंदी ब्राह्मण आनंदाने श्रीगुरूंचा जयजयकार करू लागला.

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय विसावा

ते दोघे मठात आले तेव्हा नंदीचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठा आश्चर्य वाटले. श्रीगुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले. त्याला मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला. तो घाबरून म्हणाला, “महात्मन, हा डाग कसा राहिला?” श्रीगुरू म्हणाले, “येथे येताना तुझ्या मनात संशय होता म्हणूनच थोडेस कोड राहिले. पण चिंता करू नकोस. तू माझ्या स्तुतिपर कवित्व कर म्हणजे हा डागही जाईल.”

नंदी ब्राह्मणाने हात जोडले व म्हणाला, “गुरुदेव, मला लिहितावाचता येत नाही, मी तुमची स्तुती कशी करू?” तेव्हा श्रीगुरूंनी थोडीशी विभूती स्वहस्ते त्याच्या जिभेवर ठेवली. तर काय आश्चर्य त्याच्या ठायी ज्ञानोदय झाला. त्याला दिव्य प्रतिभाशक्ती प्राप्त झाली. तो मुक्तकंठाने श्रीगुरूंची स्तुती करू लागला. त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्दवैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या कवनामध्ये नंदीने श्रीगुरूंचे माहात्म्य, त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले. ते कवन ऐकून सर्व जण आनंदाने डोलू लागले. श्रीगुरुंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला ‘कवीश्वर’ ही पदवी बहाल केली. हे कवित्व केल्याने त्याच्या मांडीवरचे उरलेले कुष्टही नाहीसे झाले, मग तो गाणगापुरास राहूनच श्रीगुरूंची सेवा करू लागला.”

श्री गुरूचरित्र – अध्याय पंचेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा निरोपिलीसी ।
नंदीनामा कवि ऐसी । दुसरा आणिक आला म्हणोनि ॥१॥

कवणेंपरी झाला शिष्य । तें सांगावें जी आम्हांस ।
विस्तार करुनि आदिअंतास । कृपा करुनि दातारा ॥२॥

सिद्ध म्हणे नामधारका । सांगों तुतें कथा ऐका ।
आश्चर्य झालें कवतुका । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥३॥

गाणगापुरीं असतां गुरु । ख्याती झाली अपरांपरु ।
लोक येती थोरथोरु । भक्त बहुत जाहले ॥४॥

नंदीनामा कवि होता । कवित्व केलें अपरिमिता ।
समस्त लोक शिकती अमृता । प्रकाश झाला चहूं राष्‍ट्रीं ॥५॥

ऐसें असतां एके दिवसीं देखा । श्रीगुरुसी नेलें भक्तें एका ।
आपुले घरीं शोभनदायका । म्हणोनि नेलें आपुले ग्रामा ॥६॥

हिपरगी म्हणिजे ग्रामासी । नेलें आमुचे श्रीगुरुसी ।
पूजा केली तेथें बहुवसी । समारंभ थोर जाहला ॥७॥

तया ग्रामीं शिवालय एक । नाम ‘कल्लेश्वर’ लिंग ऐक ।
जागृत स्थान प्रख्यात निक । तेथें एक द्विजवर सेवा करी ॥८॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा

तया नाम ‘नरहरी’ । लिंगसेवा बहु करी ।
आपण असे कवीश्वरी । नित्य करी पांच कवित्वें ॥९॥

कल्लेश्वरावांचूनि । आणिक नाणी कदा वचनीं ।
एकचित्तें एकमनीं । शिवसेवा करीतसे ॥१०॥

समस्त लोक त्यासी म्हणती । तुझे कवित्वाची असे ख्याति ।
श्रीगुरुसी कवित्वावरी प्रीति । गुरुस्मरण करीं तूं कांहीं ॥११॥

त्यांसी म्हणे तो नर । कल्लेश्वरासी विकिलें जिव्हार ।
अन्यत्र देव अपार । नरस्तुति मी न करीं ॥१२॥

ऐसें बोलोनियां आपण । गेला देवपूजेकारण ।
पूजा करितां तत्क्षण । निद्रा आली तया द्विजा ॥१३॥

नित्य पूजा करुनि आपण । कवित्व करी पार्वतीरमणा ।
ते दिवसीं अपरिमाण । निद्रा आली तया देखा ॥१४॥

निद्रा केली देवळांत । देखता जाहला स्वप्नांत ।
लिंगावरी श्रीगुरु बैसत । आपण पूजा करीतसे ॥१५॥

लिंग न दिसे श्रीगुरु असे । आपणासी पुसती हर्षें ।
नरावरी तुझी भक्ति नसे । कां गा आमुतें पूजितोसि ॥१६॥

षोडशोपचारेंसीं आपण । पूजा करी स्थिर मनीं ।
ऐसें देखोनियां स्वप्न । जागृत झाला तो द्विज ॥१७॥

विस्मय करी आपुले मनीं । म्हणे नरसिंहसरस्वती शिवमुनि ।
आला असे अवतरोनि । आपण निंदा त्याची केली ॥१८॥

हाचि होय सद्गुरु । त्रयमूर्तींचा अवतारु ।
भेट घ्यावी आतां निर्धारु । म्हणूनि आला श्रीगुरुपाशीं ॥१९॥

आला विप्र लोटांगणेंसीं । येऊनि लागला चरणासी ।
कृपा करीं गा अज्ञानासी । नेणों तुझें स्वरुप आपण ॥२०॥

प्रपंचमाया वेष्टोनि । नोळखें आपण अज्ञानी ।
तूंचि साक्षात् शिवमुनि । निर्धार जाहला आजि मज ॥२१॥

कल्लेश्वर कर्पूरगौरु । तूंचि होसी जगद्गुरु ।
माझें मन झालें स्थिरु । तुझे चरणीं विनटलों ॥२२॥

तूंचि विश्वाचा आधारु । शरणागता वज्रपंजरु ।
चरणकमळ वास भ्रमर । ठाकोनि आलों अमृत घ्यावया ॥२३॥

जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु ।
घरा आलिया कामधेनु । दैन्य काय आम्हांसी ॥२४॥

पूर्वीं समस्त ऋषि देखा । तप करिती सहस्त्र वर्षें निका ।
तूं न पवसी एकएका । अनेक कष्‍ट करिताति ॥२५॥

न करितां तपानुष्ठान । आम्हां भेटलासि तूं निधान ।
झाली आमुची मनकामना । कल्लेश्वर लिंग प्रसन्न झालें ॥२६॥

तूंचि संत्य कल्लेश्वरु । ऐसा माझे मनीं निर्धारु ।
कृपा करीं गा जगद्गुरु । म्हणोनि चरणीं लागला ॥२७॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय बारावा

श्रीगुरु म्हणती तयासी । नित्य आमुची निंदा करिसी ।
आजि कैसें तुझे मानसीं । आलासी भक्ति उपजोनि ॥२८॥

विप्र म्हणे स्वामियासी । अज्ञान अंधकार आम्हांसी ।
कैसे भेटाल परियेसीं । ज्योतिर्मय न होतां ॥२९॥

म्यां कल्लेश्वराची पूजा केली । तेणें पुण्यें आम्हां भेटी लाधली ।
आजि आम्ही पूजेसी गेलों ते काळीं । लिंगस्थानीं तुम्हांसि देखिलें ॥३०॥

स्वप्नावस्थेंत देखिलें आपण । प्रत्यक्ष भेटले तुझे चरण ।
स्थिर जाहलें अंतःकरण । मिळवावें शिष्यवर्गांत ॥३१॥

ऐसें विनवोनि द्विजवर । स्तोत्र करीतसे अपार ।
स्वप्नीं पूजा षोडशोपचार । तैसें कवित्व केलें देखा ॥३२॥

मानसपूजेचें विधान । पूजा व्यक्त केली त्याणें ।
श्रीगुरु म्हणती तत्क्षण । आम्ही स्वप्नरुप लोकांसी ॥३३॥

प्रत्यक्ष आम्ही असतां देखा । स्वप्नावस्थीं कवित्व ऐका ।
येणें भक्तें केलें निका । स्वप्नीं भेदूनि समस्त ॥३४॥

ऐसें म्हणोनि शिष्यांसी । वस्त्रें देती त्या कवीसी ।
लागला तो श्रीगुरुचरणासी । म्हणे आपण शिष्य होईन ॥३५॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कल्लेश्वर श्रेष्‍ठ आम्हांसी ।
पूजा करीं गा नित्य त्यासी । आम्ही तेथें सदा वसों ॥३६॥

विप्र म्हणे स्वामियासी । प्रत्यक्ष सांडोनि चरणासी ।
काय पूजा कल्लेश्वरासी । तेथेंही तुम्हांसी म्यां देखिलें ॥३७॥

तूंचि स्वामी कल्लेश्वरु । त्रयमूर्तीचा अवतारु ।
हाचि माझा सत्य निर्धारु । न सोडीं आतां तुझे चरण ॥३८॥

ऐसें विनवोनि स्वामियासी । आला सवें गाणगापुरासी ।
कवित्वें केलीं बहुवसी । सेवा करीत राहिला ॥३९॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । कवीश्वर दोघे श्रीगुरुपाशीं ।
आले येणें रीतीसीं । भक्ति करिती बहुवस ॥४०॥

म्हणे सरस्वती-गंगाधरु । ज्यासी प्रसन्न होय श्रीगुरु ।
त्याचे घरीं कल्पतरु । चिंतिलें फळ पाविजे ॥४१॥

कथा कवीश्वराची ऐसी । सिद्ध सांगे नामधारकासी ।
पुढील कथा विस्तारेंसीं । सांगेल सिद्ध नामधारका ॥४२॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे नरहरिकवीश्वर-वरप्राप्ति नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥४५॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥          ॥ ओंवीसंख्या ४२ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय पंचेचाळीसावा
श्री गुरुचरित्र सप्ताह वाचन - अध्याय ४५ | Gurucharitra Adhyay 45 । Saptah Vachan

श्री गुरूचरित्र – अध्याय सेहेचाळीसावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link