श्री गुरूचरित्र – अध्याय नववा

कथासार

॥ अध्याय नववा ॥

॥ परिटास वरदान ॥

श्रीगणेशाय नमः ।। नामधारक सिद्धाला म्हणाला, “महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखविल्या?” सिद्धयोगी म्हणाला, “तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत. लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करीत असत. त्या ग्रामात एक परीट राहत असे. तो भाविक होता. श्रीगुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा.

एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आता असताना श्रीपाद त्याला म्हणाले, “मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू कष्टाची कामे करतोस त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही.” ती आपुलकी पाहून परिटाला खूप बरे वाटले. संसारचिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला. मठांगण झाडणे, सडासंमार्जन करणे आदी कामे तो आवडीने करीत असे.

वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौकाविहारासाठी आला होता. राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या. गप्पागोष्टी करीत होत्या. शृंगारलेली नौका, नदीतीरावरील वैभवसंपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवकवर्ग, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुखसोहळा पाहून परीट अक्षरश: भारावून गेला. मठांगण झाडताना तो विचार करू लागला, “हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी सुख प्राप्त झालं ? आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत. आपले जिणे व्यर्थ होय.” तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्रीगुरू म्हणाले, “परिटा, मनात काय चिंतन चालले आहे?” तो म्हणाला, “स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला त्याचा हेवा वाटला. आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटली. पण असा विचार मी का करू? तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे.”

त्यावर श्रीगुरू म्हणाले, “परिटा, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीस त्यामुळे तुझ्या मनात सुखोपभोगांची इच्छा निर्माण होणे साहजिक आहे. त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत. अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल.” परीट म्हणाला, “पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका.” श्रीगुरू म्हणाले, “तू माझा निस्सीम भक्त आहेस, मी तुला कसे अंतर देईन? तुझ्या वृद्धापकाळी ‘नृसिंहसरस्वती’ रूपाने मी तुझी भेट घेईन. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग.” परीट म्हणाला, “त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन.” तेव्हा ‘तथास्तु’ म्हणून श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला. घरी गेल्यावर परीट मरण पावला. कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे.

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा

परिटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला, “नामधारका, श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे माहात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्रीगुरु आश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने तेथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्रीगुरुंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते.”

श्री गुरूचरित्र – अध्याय नववा

॥ श्री गणेशाय नमः ॥

ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक करी नमन ।
विनवीत कर जोडून । भक्तिभावे करोनिया ॥१॥

श्रीपाद कुरवपुरी असता । पुढे वर्तली कैसी कथा ।
विस्तारूनि सांग आता । कृपामुर्ति दातारा ॥२॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढे कथा अपूर्व देखा ।
तया ग्रामी रजक एका । सेवक झाला श्रीगुरूचा ॥३॥

भक्तवत्सल श्रीगुरुराव । जाणोनि शिष्याचा भाव ।
विस्तार करोनि भक्तीस्तव । निरोपित गुरुचरित्र ॥४॥

नित्य श्रीपाद गंगेसी येती । विधिपूर्वक स्नान करिती ।
लोकवेव्हार संपादिती । त्रयमूर्ति आपण ॥५॥

ज्याचे दर्शन गंगास्नान । त्यासी कायसे आचरण ।
लोकानुग्रहाकारण । स्नान करीत परियेसा ॥६॥

वर्तता ऐसे एके दिवशी । श्रीपाद यति येती स्नानासी ।
गंगा वहात असे दशदिशी । मध्ये असती आपण ॥७॥

तया गंगातटाकांत । रजक असे वस्त्रे धूत ।
नित्य येऊनि असे नमित । श्रीपादगुरुमूर्तीसी ॥८॥

नित्य त्रिकाळ येवोनिया । दंडप्रमाण करोनिया ।
नमन करी अतिविनया । मनोवाक्कायकर्मे ॥९॥

वर्तता ऐसे एके दिवशी । आला रजक नमस्कारासी ।
श्रीपाद म्हणती तयासी । एकचित्ते परियेसा ॥१०॥

श्रीपाद म्हणती रजकासी । का नित्य कष्टतोसी ।
तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी । सुखे राज्य करी आता ॥११॥

ऐकता गुरूचे वचन । गाठी बांधी पल्लवी शकुन ।
विनवीतसे कर जोडून । सत्यसंकल्प गुरुमूर्ति ॥१२॥

रजक सांडी संसारचिंता । सेवक जाहला एकचित्ता ।
दुरोनि करी दंडवता । मठा गेलिया येणेचि परी ॥१३॥

ऐसे बहुत दिवसांवरी । रजक तो सेवा करी ।
आंगण झाडी प्रोक्षी वारी । नित्य नेमे येणे विधी ॥१४॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय सत्तेचाळीसावा

असता एके दिवशी देखा । वसंतऋतु वैशाखा ।
क्रीडा करीत नदीतटाका । आला राजा म्लेछ एक ॥१५॥

स्त्रियांसहित राजा आपण । अलंकृत आभरण ।
क्रीडा करीत स्त्रिया आपण । गंगेमधून येतसे ॥१६॥

सर्व दळ येत दोनी थडी । अमित असती हस्ती घोडी ।
मिरविताती रत्‍नकोडी । अलंकृत सेवकजन ॥१७॥

ऐसा गंगेच्या प्रवाहात । राजा आला खेळत ।
अनेक वाद्यनाद गर्जत । कृष्णावेणि थडियेसी ॥१८॥

रजक होता नमस्कारित । शब्द झाला तो दुश्चित ।
असे गंगेत अवलोकित । समारंभ राजयाचा ॥१९॥

विस्मय करी बहु मानसी । जन्मोनिया संसारासी ।
जरी न देखिजे सौख्यासी । पशुसमान देह आपुला ॥२०॥

धन्य राजयाचे जिणे । ऐसे सौख्य भोगणे ।
स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे । कैसा भक्त ईश्वराच ॥२१॥

कैसे याचे आर्जव फळले । कवण्या देवा आराधिले ।
कैसे श्रीगुरु असती भेटले । मग पावला ऐसी दशा ॥२२॥

ऐसे मनी चिंतित । करीतसे दंडवत ।
श्रीपादराय कृपावंत । वळखिली वासना तयाची ॥२३॥

भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । जाणोनि अंतरी त्याची स्थिति ।
बोलावूनिया पुसती । काय चिंतिसी मनांत ॥२४॥

रजक म्हणे स्वामीसी । देखिले दृष्टी रायासी ।
संतोष झाला मानसी । केवळ दास श्रीगुरूचा ॥२५॥

पूर्वी आराधोनि देवासी । पावला आता या पदासी ।
म्हणोनि चिंतितो मानसि । कृपासिंधु दातारा ॥२६॥

ऐसे अविद्यासंबंधेसी । नाना वासना इंद्रियांसी ।
चाड नाही या भोगासी । चरणी तुझे मज सौख्य ॥२७॥

श्रीपाद म्हणती रजकासी । जन्मादारभ्य कष्टलासी ।
वांछा असे भोगावयासी । राज्यभोग तमोवृत्ति ॥२८॥

निववी इंद्रिये सकळ । नातरी मोक्ष नव्हे निर्मळ ।
बाधा करिती पुढे केवळ । जन्मांतरी परियेसी ॥२९॥

तुष्टवावया इंद्रियांसी । तुवा जावे म्लेछवंशासी ।
आवडी जाहली तुझे मानसी । राज्य भोगी जाय त्वरित ॥३०॥

ऐकोनि स्वांमीचे वचन । विनवी रजक कर जोडून ।
कृपासागरू तू गुरुराज पूर्ण । उपेक्षू नको म्हणतसे ॥३१॥

अंतरतील तुझे चरण । द्यावे माते पुनर्दर्शन ।
तुझा अनुग्रह असे कारण । ज्ञान द्यावे दातारा ॥३२॥

श्रीगुरु म्हणती तयासी । वैदुरानगरी जन्म घेसी ।
भेटी देऊ अंतकाळासी । कारण असे येणे आम्हा ॥३३॥

भेटी होतांचि आम्हांसी । ज्ञान होल तुझे मानसी ।
न करी चिंता भरवसी । आम्हा येणे घडेल ॥३४॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय चाळीसावा

आणिक कार्यकारणासी । अवतार घेऊ परियेसी ।
वेष धरोनि संन्यासी । नाम नृसिंहसरस्वती ॥३५॥

ऐसे तया संबोधूनि । निरोप देती जाय म्हणोनि ।
रजक लागला तये चरणी । नमस्कारीत तये वेळी ॥३६॥

देखोनि श्रीगुरु कृपामूर्ति । रजकासी जवळी पाचारिती ।
इह भोगिसी की पुढती । राज्यभोग सांग मज ॥३७॥

रजक विनवीत श्रीपादासी । झालो आपण वृद्धवयेसी ।
भोग भोगीन बाळाभ्यासी । यौवनगोड राज्यभोग ॥३८॥

ऐकोनि रजकाचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण ।
त्वरित जाई रे म्हणोन । जन्मांतरी भोगी म्हणती ॥३९॥

निरोप देता तया वेळी । त्यजिला प्राण तत्काळी ।
जन्माता झाला म्लेछकुळी । वैदुरानगरी विख्यात ॥४०॥

ऐसी रजकाची कथा । पुढे सांगून विस्तारता ।
सिद्ध म्हणे नामधारका आता । चरित्र पुढती अवधारी ॥४१॥

ऐसे झालीया अवसरी । श्रीपादराय कुरवपुरी ।
असता महिमा अपरंपारी । प्रख्यात असे परियेसा ॥४२॥

महिमा सकळ सांगता । विस्तार होईल बहु कथा ।
पुढील अवतार असे ख्याता । सांगेन ऐक नामधारका ॥४३॥

महत्त्व वर्णावया श्रीगुरूचे । शक्ति कैची या वाचे ।
नवल हे अमृतदृष्टीचे । स्थानमहिमा ऐसा ॥४४॥

श्रीगुरु राहती जे स्थानी । अपार महिमा त्या भुवनी ।
विचित्र जयाची करणी । दृष्टान्ते तुज सांगेन ॥४५॥

स्थानमहिमाप्रकार । सांगेन ऐक एकाग्र ।
प्रख्यात असे कुरवपूर । मनकामना पुरती तेथे ॥४६॥

ऐसे कित्येक दिवसांवरी । श्रीपाद होते कुरवपुरी ।
कारण असे पुढे अवतारी । म्हणोनि अदृश्य होते तेथे ॥४७॥

आश्विन वद्य द्वादशी । नक्षत्र मृगराज परियेसी ।
श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥४८॥

लौकिकी दिसती अदृश्य जाण । कुरवपुरी असती आपण ।
श्रीपादराव निर्धार जाण । त्रयमूर्तिचा अवतार ॥४९॥

अदृश्य होवोनि तया स्थानी । श्रीपाद राहिले निर्गुणी ।
दृष्टान्त सांगेन विस्तारोनि । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥५०॥

जे जन असती भक्त केवळ । त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ ।
कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ । असे प्रख्यात भूमंडळी ॥५१॥

सिद्ध सांगे नामधारकासी । तेचि कथा विस्तारेसी ।
सांगतसे सकळिकांसी । गंगाधराचा आत्मज ॥५२॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रजकवरप्रदानं नाम नवमोऽध्यायः ॥९॥

॥ ओवीसंख्या ॥५२॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय नववा
Gurucharitra Adhyay 9 (गुरुचरित्र अध्याय ९) with Marathi Subtitles
श्री गुरूचरित्र – अध्याय नववा

श्री गुरूचरित्र – अध्याय दहावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment