कथासार
॥ अध्याय दहावा ॥
॥ वल्लभेश ब्राह्मणास जीवदान ॥
श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, “महाराज, श्रीपाद यती सूक्ष्मरूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले मग त्यांचे अर्थात दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले?”
सिद्ध म्हणाला, “श्रीगुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णु क्षीरसागरात वास करतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुलाही माहीत आहे. सृष्टिचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रीरूप झाले हे सर्वमान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही. म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांनी कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घे. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवाभक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्याची काळजी घेतात. याविषयीची एक कथा सांगतो म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता, ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल.
वल्लभेश नावाचा एक काश्यपगोत्री ब्राह्मण होता. तो सुशील व सदाचारी होता. व्यापारधंदा करायचा. तो श्रीपादांची भक्ती करायचा. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा. एकदा तो व्यापारासाठी निघाला. या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता. मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता. श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला. काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले. ‘आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत.’ असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले. त्याच क्षणी श्रीगुरू श्रीपाद धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले. श्रीगुरूंनी आपल्या त्रिशुळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला. तो म्हणाला, “मला मारू नका. मी निरपराधी आहे. या ब्राह्मणाला मी मारले नाही. माझे साधीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती. मी याला वाचवू शकलो नाही. मला क्षमा करा.”
सर्वसाक्षी श्रीगुरूंनी त्याचे अंतःकरण जाणले. त्याला क्षमा केली. त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले, “ही विभूती या ब्राह्मणावर टाक.” तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य! तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला. श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला, “तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले ?” तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकिकत सांगितली. तो म्हणाला, “शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता. या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने यांना मारले. तुला जिवंत केले. तो येथेच उभा होता, आता कोठे गेला काही कळलेच नाही. तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला.” ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरविणाऱ्या श्रीगुरू श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला. गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली. चार सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले.
असे आहे कुरवपूर क्षेत्राचे माहात्म्य. श्रीगुरू श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात. हे तू नीट मनात धर. भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकांत प्रकट होतात. पुढे त्यांनी ‘नृसिंहसरस्वती’ म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखविले.”
नामधारक म्हणाला, “सिद्धनाथ महाराज, श्रीगुरुंचे लीलाकर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता मला नृसिंहसरस्वती स्वामींचे चरित्र ऐकविण्याची कृपा करा.”
श्री गुरूचरित्र – अध्याय दहावा
॥ श्री गणेशाय नमः ॥
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक विनवी जाण ।
कुरवपुरीचे महिमान । केवी जाहले परियेसा ॥१॥
म्हणती श्रीपाद नाही गेले । आणि म्हणती अवतार झाले ।
विस्तार करोनिया सगळे । निरोपावे म्हणतसे ॥२॥
सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी ।
अनंतरूपे होती परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥३॥
पुढे कार्यकारणासी । अवतार झाले परियेसी ।
राहिले आपण गुप्तवेषी । तया कुरवक्षेत्रांत ॥४॥
पाहे पा भार्गवराम देखा । अद्यापवरी भूमिका ।
अवतार जाहले अनेका । त्याचेच एकी अनेक ॥५॥
सर्वा ठायी वास आपण । मूर्ति एक नारायण ।
त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिति आणि प्रलय ॥६॥
भक्तजना तारावयासी । अवतरतो ह्रषीकेशी ।
शाप देत दुर्वासऋषि । कारण असे तयांचे ॥७॥
त्रयमूर्तीचा अवतार । याचा कवणा न कळे पार ।
निधान तीर्थ कुरवपूर । वसे तेथे गुरुमूर्ति ॥८॥
जे जे चिंतावे भक्तजने । ते ते पावे गुरुदर्शने ।
श्रीगुरु वसावयाची स्थाने । कामधेनु असे जाणा ॥९॥
श्रीपादवल्लभस्थानमहिमा । वर्णावया अनुपमा ।
अपार असे सांगतो तुम्हा । दृष्टान्तेसी अवधारा ॥१०॥
तुज सांगावया कारण । गुरुभक्ति वृथा नव्हे जाण ।
सर्वथा न करी निर्वाण । पाहे वाट भक्तांची ॥११॥
भक्ति करावी दृढतर । गंभीरपणे असावे धीर ।
तरीच उतरिजे पैलपार । इहपरत्री सौख्य पावे ॥१२॥
याचि कारणे दृष्टान्ते तुज । सांगेन ऐक वर्तले सहज ।
काश्यपगोत्री होता द्विज । नाम तया वल्लभेश ॥१३॥
सुशील द्विज आचारवंत । उदीम करूनि उदर भरीत ।
प्रतिसंवत्सरी यात्रेस येत । तया श्रीपादक्षेत्रासी ॥१४॥
असता पुढे वर्तमानी । उदीमा निघाला तो धनी ।
नवस केला अतिगहनी । संतर्पावे ब्राह्मणासी ॥१५॥
उदीम आलिया फळासी । यात्रेसी येईन विशेषी ।
सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी । इच्छाभोजन देईन म्हणे ॥१६॥
निश्चय करोनि मानसी । निघाला द्विजवर उदीमासी ।
चरण ध्यातसे मानसी । सदा श्रीपादवल्लभाचे ॥१७॥
जे जे ठायी जाय देखा । अनंत संतोष पावे निका ।
शतगुणे लाभ झाला ऐका । परमानंदा प्रवर्तला ॥१८॥
लय लावूनि श्रीपादचरणी । यात्रेसि निघाला ते क्षणी ।
वेचावया ब्राह्मणसंतर्पणी । द्रव्य घेतले समागमे ॥१९॥
द्रव्य घेऊनि द्विजवर । निघता देखती तस्कर ।
कापट्यवेषे सत्वर । तेही सांगते निघाले ॥२०॥
दोन-तीन दिवसांवरी । तस्कर असती संगिकारी ।
एके दिवशी मार्गी रात्री । जात असता मार्गस्थ ॥२१॥
तस्कर म्हणती द्विजवरासी । आम्ही जाऊ कुरवपुरासी ।
श्रीपादवल्लभदर्शनासी । प्रतिवर्षी नेम असे ॥२२॥
ऐसे बोलती मार्गासी । तस्करी मारिले द्विजासी ।
शिर छेदूनिया परियेसी । द्रव्य घेतले सकळिक ॥२३॥
भक्तजनांचा कैवारी । श्रीपादराव कुरवपुरी ।
पातला त्वरित वेषधारी । जटामंडित भस्मांकित ॥२४॥
त्रिशूळ खट्वांग घेऊनि हाती । उभा ठेला तस्करांपुढती ।
वधिता झाला तयांप्रती । त्रिशूळेकरूनि तात्काळ ॥२५॥
समस्त तस्करा मारिता । एक तस्कर येऊनि विनविता ।
कृपाळुवा जगन्नाथा । निरपराधी आपण असे ॥२६॥
नेणे याते वधितील म्हणोनि । आलो आपण संगी होऊनि ।
तू सर्वोत्तमा जाणसी मनी । विश्वाची मनवासना ॥२७॥
ऐकोनि तस्कराची विनंती । श्रीपाद त्याते बोलाविती ।
हाती देऊनिया विभूति । विप्रावरी प्रोक्षी म्हणे ॥२८॥
मन लावूनि तया वेळा । मंत्रोनि लाविती विभूती गळा ।
सजीव जाहला तात्काळा । ऐक वत्सा ऐकचित्ते ॥२९॥
इतुके वर्तता परियेसी । उदय जाहला दिनकरासी ।
श्रीपाद जाहले गुप्तेसी । राहिला तस्कर द्विजाजवळी ॥३०॥
विप्र पुसतसे तस्करासी । म्हणे तू माते का धरिलेसी ।
कवणे वधिले तस्करासी । म्हणोनि पुसे तया वेळी ॥३१॥
तस्कर सांगे द्विजासी । आला होता एक तापसी ।
जाहले अभिनव परियेसी । वधिले तस्कर त्रिशूळे ॥३२॥
मज रक्षिले तुजनिमित्ते । धरोनि बैसविले स्वहस्ते ।
विभूति लावूनि मग तूते । सजीव केला तव देह ॥३३॥
उभा होता आता जवळी । अदृश्य जाहला तत्काळी ।
न कळे कवण मुनि बळी । तुझा प्राण रक्षिला ॥३४॥
होईल ईश्वर त्रिपुरारि । भस्मांगी होय जटाधारी ।
तुझी भक्ति निर्धारी । म्हणोनि आला ठाकोनिया ॥३५॥
ऐकोनि तस्कराचे वचन । विश्वासला तो ब्राह्मण ।
तस्कराजवळिल द्रव्य घेऊन । गेला यात्रेसी कुरवपुरा ॥३६॥
नानापरी पूजा करी । ब्राह्मणभोजन सहस्त्र चारी ।
अनंतभक्ती प्रीतिकरी । पूजा करी श्रीपादुकांची ॥३७॥
ऐसे अनंत भक्तजन । मिळूनि सेविती श्रीपादचरण ।
कुरवपूर प्रख्यात जाण । अपार महिमा ॥३८॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । संशय न धरी तू मानसी ।
श्रीपाद आहेती कुरवपुरासी । अदृश्यरूप होऊनिया ॥३९॥
पुढे अवतार असे होणे । गुप्त असती याचि गुणे ।
म्हणती अनंतरूप नारायण । परिपूर्ण सर्वा ठायी ॥४०॥
ऐसी श्रीपादवल्लभमूर्ति । लौकिकी प्रगटली ख्याति ।
झाला अवतार पुढती । नृसिंहसरस्वती विख्यात ॥४१॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगत कथेचा विस्तारू ।
ऐकता होय मनोहरू । सकळाभीष्टे साधती ॥४२॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भक्तसंकटहरणं नाम दशमऽध्यायः ॥१०॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ॥ ओवीसंख्या ॥४२॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥