Shri Gurucharitra | श्री गुरुचरित्र संपूर्ण माहिती

“भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात ।
ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥”

अशी महती असलेल्या ‘श्री गुरुचरित्र’ ग्रंथाची माहिती या लेखात पाहूया.

श्री गुरुचरित्र (Shri Gurucharitra) हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे.

दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे.

श्री शिवस्तुति वाचण्यासाठी Shree Shiv Stuti येथे क्लिक करा.

श्री गुरुचरित्र ग्रंथाविषयी माहिती

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘श्री गुरुचरित्र’ (Shri Gurucharitra) ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. जसा वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन सरस्वती गंगाधर स्वामींनी ओघवत्या भाषेत केले आहे.

श्री गुरुचरित्रातील ५३ अध्यायांची विभागणी खालील प्रमाणे केलेली आहे.

अध्याय १ ते २४ज्ञानकांड
अध्याय २५ ते ३७कर्मकांड
अध्याय ३८ ते ५३भक्तिकांड

श्री गुरुचरित्र ग्रंथातील विषय

सिद्धनामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की, गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली. याचाच अर्थ, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले.

योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभश्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात.

या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हेच खरे! आपलीच बरी-वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हेच तत्त्व या ग्रंथात पुन:पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे, असे आवर्जुन सांगितले आहे. याचे कारण असे की, हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास साहाय्य करते.

गुरुचरित्रग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक ‘दृष्टांत-कथा’ आहेत. लोक त्याला ‘चमत्कार-कथा’ समजतात; पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरूकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्वर दर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणाने आणि सर्वत्र दर्शनसुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेकांना दु:ख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासनाधर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाफ गुरूचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे, हेच खरे!

श्री कालभैरव स्तोत्र वाचण्यासाठी Shri Kalbhairav Stotra येथे क्लिक करा.

श्रीगुरुचरित्र पारायण माहिती आणि नियम

श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहेत.

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय छत्तिसावा

पारायण काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम

  • वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
  • वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे.
  • वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.
  • श्रीदत्तात्रायांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
  • सप्ताहकाळात ब्रम्हाचार्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
  • रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव आहे.
  • वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
  • सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
  • सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी नियम

  • श्रीगुरुचरित्र साप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा. साप्ताहाच्या सुरुवातीला, साप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी श्रीगुरुचरित्राची पूजा आणि श्रीगुरुची पंचपदी व आरती करावी.
  • श्री दत्तजयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचरित्राचा साप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता, जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगेरे करून आनंद करावा.
  • सप्ताहाच्या ७ दिवसाचा व्रतस्थपणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी करणे चांगले.
  • घरात जागा एकांत हवी तशी नसेल तर श्री दत्त मूर्ती असलेल्या मंदिरात साप्ताह करावा.
  • उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे.
  • शक्य असल्यास घरी किंवा देवघरात साप्ताह सुरु करावा.
  • अखंड दीप असावा. साप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा.(वाचन चालू असे पर्यंत)
  • समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राम्हण भोजन द्यावे.
  • सात दिवसापर्यंत सोवळ्या ओवळ्याचे नियम पाळावेत.
    • साप्ताह वाचण्यास बसल्यानंतर मध्येच आसन सोडून उठू नये.
    • दुसऱ्याकडे बोलू नये.
    • हविषान्न एक वेळ घ्यावे. संध्याकाळी फक्त दुध घ्यावे. हविषान्न म्हणजे दुध भात. खारट – तिखट – आंबट (दही, ताक  इत्यादी) खाऊ नये. साखरेचा वापर केल्यास चालेल गुळ वापरू नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप साखर घेता येते.
    • ब्रम्हचर्य पालन करावे.
    • भूमिशयन म्हणजेच पलंग किंवा खाटेवर निजू नये, गादी घेऊ नये, चटई किंवा पांढरे घोंगडे अथवा सतरंजी वर झोपावे, सप्ताहाच्या ७ वे दिवशी समाराधना करण्यास हरकत नाही, त्या दिवशी महानैवेद्य झालाच पाहिजे.
धर्मसिंधूंत सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ

साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वाटणे ई .धान्ये; पांढरा मुळा,सुरण ई. कंद; सैंधव व समुद्रोत्पन्न अशी लवणे; गायींची दही, दुध आणि तूप; फणस, आंबा, नारळ, हरीतकी, पिंपळी, जिरे, सुंठ, चिंच, केळे, रायआंवळे ही फळे व साखर ही सर्व अतैलपक्व हविष्ये जाणावी (गायींचे ताक व म्हशीचे तूप ही हविष्ये आहेत असेंही कोणी म्हणतात.) – धर्मसिंधु प्रथम परिच्छेद व्रतपरिभाषा.

अग्निपुराणांत सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ

साळीचे तांदूळ, साठ दिवसांनी पिकणाऱ्या भाताचे तांदूळ, मूग, वाटणे, तिळ, दूध, सांवे, तृणधान्य व गहूं हे व्रताविषयी हितकारक आहेत. कोहळा, भोंपळा, वांगे, पोईशाक, घोसाळे ही वर्ज्य करावी. भिक्षा मागून मिळालेले अन्न, पीठ, कण्या, शाक, दही तूप, मधु, सांवे, साळीचे तांदूळ, तृणधान्य, यव, मुळा, तांदुळजा हे पदार्थ हविष्यव्रत, नक्त इत्यदि विषयी व अग्निकार्य इत्यदि विषयी हितकारक होत.

गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वीचा संकल्प

सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी घरातील देवांना व वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पारायण करण्याची परवानगी घेऊन परायणाला सुरुवात करावी. सात दिवस पोथीकडे अखंड दिवा तेवत ठेवावा. वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवा ठेवावा.

एक चौरंग, बसण्यासाठी पाट किंवा आसन, गुरुचरित्र पोथी, अक्षता, फुले, फुलांचा हार, तुळशीची पाने, (२) सुपारी, विडयाची २ पाने, तूप, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) पाच फळे, अबीर, गुलाल, बुक्का, अगरबत्ती, अगरबत्ती स्टॅंड, दिवा, कापूस, आरतीचे ताट. कापूरारती आणि धूपाटणे, चंदन, पूजेसाठी तांब्याची पळी, पंचपात्र आणि तांबे/पितळेचे दोन ताम्हण, पूजेसाठी पाणी, हात पुसण्यासाठी कापड. २ नाणी, २ अखंड दिप – एक देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा.

संकल्प प्रारंभ

आचमन:

एकदा पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन तीन वेळा आचमन करा
ॐ केशवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ नारायणाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ माधवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ गोविन्दाय नमः (हातातले पाणी ताम्हणात सोडावे.)

हात जोडून पुढचे मंत्र म्हणा-
ॐ विष्णवे नमः। ॐ मधुसूदनाय नमः। ॐ त्रिविक्रमाय नमः। ॐ वामनाय नमः।
ॐ श्रीधाराय नमः। ॐ हृषीकेशाय नमः। ॐ पद्मनाभाय नमः। ॐ दामोदराय नमः।
ॐ संकर्षणाय नमः। ॐ वासुदेवाय नमः। ॐ प्रद्युम्नाय नमः। ॐ आनिरुद्धाय नमः।
ॐ पुरुषोत्तमाय नमः। ॐ अधोक्षजाय नमः। ॐ नारसिंहाय नमः। ॐ अच्युताय नमः।
ॐ जनार्दनाय नमः। ॐ उपेन्द्राय नमः। ॐ हरये नमः। ॐ श्रीकृष्णाय नमः।

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय एकोणपन्नासावा
पुनः आचमन:

यानंतर पुन्हा एकदा पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन तीन वेळा आचमन करा
ॐ केशवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ नारायणाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ माधवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ गोविन्दाय नमः (हातातले पाणी ताम्हणात सोडावे.)

हात जोडून पुढचे मंत्र म्हणा –
ॐ विष्णवे नमः। ॐ मधुसूदनाय नमः। ॐ त्रिविक्रमाय नमः। ॐ वामनाय नमः।
ॐ श्रीधाराय नमः। ॐ हृषीकेशाय नमः। ॐ पद्मनाभाय नमः। ॐ दामोदराय नमः।
ॐ संकर्षणाय नमः। ॐ वासुदेवाय नमः। ॐ प्रद्युम्नाय नमः। ॐ आनिरुद्धाय नमः।
ॐ पुरुषोत्तमाय नमः। ॐ अधोक्षजाय नमः। ॐ नारसिंहाय नमः। ॐ अच्युताय नमः।
ॐ जनार्दनाय नमः। ॐ उपेन्द्राय नमः। ॐ हरये नमः। ॐ श्रीकृष्णाय नमः।

प्राणायाम:

खालील मंत्र म्हणताना अनुलोम-विलोम प्राणायाम करा. (अनुलोम विलोम हे एक विशिष्ट प्रकारचे नियंत्रित श्वासोच्छवासाचा प्राणायामाचा प्रकार आहे. यामध्ये श्वास घेताना एक नाकपुडी बंद ठेवतात थोडावेळ श्वास रोकून ठेऊन श्वास सोडताना दुसरी नाकपुडी बंद ठेवतात.)

प्रणवस्य परब्रह्म ऋषिः। परमात्मा देवता। दैवी गायत्री छंद:। प्राणायामे विनियोगः। ॐ भू: ॐ भुवः ॐ स्वः ॐ मह: ॐ जन: ॐ तपः ॐ सत्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धियो योन: प्रचोदयात् । ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव स्वरोम ।

देवता वंदन आणि ध्यान:

उजव्या हातात पाणी, फुल, अक्षता घ्या आणि लक्ष्मी, गणेश इत्यादी देवांची पूजा करण्याचा संकल्प करा-

ॐ श्रीमन्महागणपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। स्थान देवताभ्यो नमः। वास्तु देवताभ्यो नमः। श्रीपाद्श्रीवल्लभाय नमः । श्रीसद्‍गुरुनृसिंहसरस्वत्यै नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्रह्मणेभ्यो नमः। मातापितृभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः।। अविघ्नमस्तु ।।

सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।
धूम्रकेतुर्गणाध्यक्शो भालचंद्रो गजाननः । द्वादशैत्तनि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥
शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत्‍सर्वविघ्नोपशान्तये ।
सर्वमङ्‍लमाङ्‍गल्ये शिव सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते ।
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषांमङ्गलम् । येषां ह्रदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ॥
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्‍घ्रियुगं स्मरामि ॥
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिन्दीवरश्यामो ह्रदयस्थोजनार्दनः ॥
विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् । सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥
अभीप्सितार्थसिद्‍ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥

श्रीमद्‍भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्विपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण तीरे
शालिवाहन शके (मराठी वर्ष संख्या)
(मराठी वर्षाचे नाव) नाम संवत्सरे,
(जे आयन सुरू असेल ते) दक्षिणायने \ उत्तरायने,
(सुरू असलेला ऋतु) ऋतौ,
(मराठी महिना) मासे,
(पक्ष) कृष्ण पक्षे \ शुक्ल पक्षे,
(त्या दिवसाची तिथी) तिथौ,
(वार) वासरे,
(त्या वेळेच नक्षत्र) नक्षत्रे,
(योग) योगे,
(करण) करणे,
(चंद्र ज्या राशीत असेल ती राशी) स्थिते चन्द्रे,
(सूर्य ज्या राशीत असेल ती राशी) स्थिते सूर्ये,
(गुरु ज्या राशीत असेल ती राशी) स्थिते देवगुरौ, शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ
(ह्याची माहिती कॅलेंडर, कोणत्याही पंचांगात किंवा मोबाइल पंचांग ऐप मध्ये मिळू शकेल)

मम (आपले नाव आणि गोत्राचा उच्चार करून) आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदचतुष्पदसहितानां क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं समस्ताभ्युदयार्थं च श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थं सर्वारिष्ट शांतिपूर्वक- सकलमंगलावाप्त्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये । तदंगत्वेन पुस्तकरूपी श्रीगुरुदत्तात्रेयपूजनं च करिष्ये । तथा आसनादिकलशशंखघंटादीप- पूजनं च करिष्ये’ (नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करावा.)

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं उरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । श्रीमहागणपतये नमः ।
अथ ग्रन्थपूजा । पुस्तकरूपिण्यै सरस्वत्यै नमः गन्धपुष्पतुलसीदलहरिद्राकुंकुमाक्षतान् समर्पयामि ।
धूपदीपनैवेद्यं समर्पयामि ।

(असे म्हणून आसन, कलशपूजा, तसेच शंख-घंटा-दीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी)

81C XnEfbVL

श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे?

ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे.

सप्ताह पद्धती

१ ला दिवस१ ते ९ अध्याय
२ रा दिवस१० ते २१ अध्याय
३ रा दिवस२२ ते २९ अध्याय
४ था दिवस३० ते ३५ अध्याय
५ वा दिवस३६ ते ३८ अध्याय
६ वा दिवस३९ ते ४३ अध्याय
७ वा दिवस४४ ते ५३ अध्याय

गुरुचरित्र पारायण ३ दिवसात कसे करावे?

श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी २४ पूर्ण, दुसर्‍या दिवशी ३७ पूर्ण व तिसर्‍या दिवशी ५३ पूर्ण असा क्रम ठेवावा. एका दिवसात समग्र श्री गुरु चरित्र वाचणारे ही साधक आहेत. पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये.

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय बारावा

३ दिवस पद्धती

१ ला दिवस१ ते २४ अध्याय
२ रा दिवस२५ ते ३७ अध्याय
३ रा दिवस३८ ते ५३ अध्याय

गुरुचरित्र फायदे (फलश्रुती)

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती 

अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
अध्याय ३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
अध्याय ५:- शारीरिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
अध्याय ८:-  बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
अध्याय ११:- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
अध्याय ४८:-  गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
अध्याय ५२ :- श्रद्धेला  चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

‘अंत:करण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र । सौख्य होम इहपरम।

आपले श्री गुरुचरित्र पारायण निर्विघ्नपणे पार पडो आणि आपणांस इच्छित फलप्राप्ती होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Shri Gurucharitra Adhyaya 1 to 53 || संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय १ ते ५३ | Guru Dattatrey
श्री गुरूचरित्र

माहिती स्रोत –

श्री गुरूचरित्र – अध्याय पहिला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link