श्री गुरूचरित्र – अध्याय पन्नासावा

कथासार

॥ अध्याय पन्नासावा ॥

॥ यवन राजाच्या विस्फोटव्याधीचे निवारण ॥

श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध नामधारकास म्हणाला, “वत्सा, श्रीपादश्रीवल्लभांनी एका परिटास ‘तू पुढील जन्मात राजा होशील’ असे वरदान दिले होते. ती कथा तुला माहीतच आहे. पुढे तो यवन धर्मात जन्मून बेदरचा राजा झाला. राजऐश्वर्याचा उपभोग घेत असताना पूर्वसंस्कारांना अनुसरून तो ब्राह्मणांचा, हिंदूच्या देवदेवतांचा आदर ठेवायचा. यवन धर्मगुरूंनी त्याच्या मनात हिंदूंविषयी द्वेष निर्माण करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्याने कोणालाही जुमानले नाही.

पुढे या राजाच्या मांडीवर गळू झाले. ते उपचारांनीही बरे होईना. त्याने ज्ञानी ब्राह्मणांना उपाय विचारला. मग त्यांच्या सूचनेनुसार तो वेषांतर करून एकटाच पापविनाशी तीर्थास गेला. त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले. तेथे एक संन्यासी भेटला. राजाने त्याला गळू दाखवून उपाय विचारला. संन्यासी म्हणाला, “तू एखाद्या सत्पुरुषाचे दर्शन घे. त्याच्या कृपेने तुला बरे वाटेल. मी तुला एक कथा सांगतो म्हणजे तुझी खातरी पटेल. अवंती नगरीतील एक आचारभ्रष्ट ब्राह्मण नेहमी पिंगला नामक वैश्येकडे जात असे. ऋषभ नावाचा एक महायोगी त्या वेश्येच्या घरी भिक्षेसाठी आला असता ब्राह्मणाने व वेश्येने त्याची मनःपूर्वक सेवा केली. त्या दोषांना आशीर्वाद देऊन ऋषभ निघून गेला. या पुण्याईने तो ब्राह्मण बज्रबाहू राजाच्या सुमती नामक पत्नीच्या पोटी जन्मला. ती गरोदर असताना तिच्या सवतीने मत्सरग्रस्त होऊन तिच्यावर विषप्रयोग केला. त्यामुळे तिच्या सर्वांगावर भयंकर फोड उठले. त्यातच तिची प्रसूती झाली. विषामुळे बालकाच्या अंगावरही भयंकर फोड उठले होते. राजाने खूप उपचार केले. शेवटी त्यांचे हाल पाहवेनासे झाले तेव्हा राजाने त्या दोघांना घोर अरण्यात सोडून दिले. राणी आक्रोश करीत पुढे निघाली. तिची अवस्था पाहून गुराख्यांना दया आली. त्याच्या सांगण्यावरून ती पद्माकर नामक वैश्य राजाच्या नगरास गेली. राजाला भेटून आपल्या दुर्दैवाची कहाणी ऐकविली. त्याने तिच्या निवासाची, अन्नवस्त्रांची व औषधोपचारांची व्यवस्था केली.

काही दिवसांनी राजपुत्राचे निधन झाले. सुमती दुःखाने आक्रोश करू लागली. राजस्त्रियांनी व लोकांनी तिचे खूप सांत्वन केले पण शोकावेग कमी होईना. तेवढ्यात ऋषभ योग्याचे आगमन झाले. त्यानेही तिला समजावले. ती म्हणाली, “महाराज, व्याधीने मला गांजले, पतीने हाकलले, मी हीनदीन झाले आणि आज हा एकुलता पुत्रही गेला. माझ्या जगण्याचा अर्थच संपला. देवाने मला मरण द्यावे.” ऋषभाला तिची दया आली. त्याने अभिमंत्रीत भस्माने राजपुत्रास जिवंत केले. मग त्याच भस्माने त्या मायलेकरांना पूर्णतः व्याधिमुक्त केले. सुमतीने कृतज्ञतेने योग्याचे पाय धरले. तिला आणि राजपुत्राला कल्याणपर आशीर्वाद देऊन ऋषम निघून गेला.”

ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला, “तू गाणगापुरला जा. तेथील नृसिंहसरस्वतींचे दर्शन घे. तुझे कार्य होईल.” त्याप्रमाणे तो राजा गाणगापुरात आला. श्रीगुरूंची चौकशी करीत संगमावर गेला. त्याला पाहून श्रीगुरू म्हणाले, “काय रे परिटा? आजपर्यंत कोठे होतास?” ते ऐकताच राजाला पूर्वजन्माचे स्मरण झाले. ‘गुरुदेव!… आपण? इथे?’ असे म्हणून त्याने श्रीगुरुचरणांना आनंदाने मिठीच मारली. श्रीगुरूंनी त्याला येण्याचे कारण विचारले. त्याने गळू दाखविण्यासाठी वस्त्र दूर गेले तर काय आश्चर्य! ते केव्हाच जिरून गेले होते. राजाचा आनंद गगनात मावेना. त्याने श्रीगुरूंना मेण्यात बसविले आणि त्यांच्या पादुका हातात धरून मठाकडे निघाला. राजाने त्यांना आपला दळभार दाखविला आणि त्याच्या नगरास येण्याची विनंती केली. श्रीगुरुंनी त्याला पापविनाशी तीर्थावर भेटण्यास सांगितले आणि ते शिष्यांसह अदृश्य झाले. ते पापविनाशी तीर्थावर प्रकट झाले. तेथे सायंदेवाचा पुत्र नागनाथ त्यांना भेटावयास आला. त्याच्या आग्रहावरून श्रीगुरू त्याच्या गावी जाऊन पुनश्च पापविनाशी तीर्थावर परतले. यवन राजाने आपले सैन्य पुढे पाठवून दिले आणि श्रीगुरुंपाशी आला. त्यांना सन्मानाने आपल्या नगरास नेले. त्याने श्रीगुरुंकडे मुक्तिमार्गाचे ज्ञान मागितले. श्रीगुरू त्याला म्हणाले, “राजा, पुढे राज्याची सूत्रे मुलांकडे सोपवून तू श्रीशैल पर्वतावर ये. तेथे आपली पुन्हा भेट होईल.”

राजाचा निरोप घेऊन श्रीगुरु गौतमीतीरी आले. तिच्या काठची पुण्यक्षेत्रे पाहत ते गाणगापुरास आले. त्यांच्या दर्शनाने भक्तांना परमानंद झाला, काही दिवसांनी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावून घेतले व म्हणाले, “बिदरचा राजा माझा भक्त झाला आहे. आता यवनांचे येथील येणेजाणे वाढेल. त्याचा लोकांना आणि विप्रांना उपद्रव होईल. म्हणून मी प्रकट रूपाने श्रीशैल पर्वतावर जाणार आहे आणि गुप्तपणे तेथेच राहणार आहे. मी तेथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्मरूपाने निरंतर येथेच असणार आहे.” ते ऐकून शिष्यांच्या व भक्तांच्या डोळ्यांत पाणी आले.”

श्री गुरूचरित्र – अध्याय पन्नासावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।
पूर्वीं रंजक-कथानका । तूंतें आपण निरोपिलें ॥१॥

तयानें मागितला वर । राज्यपद धुरंधर ।
प्रसन्न झाले तयासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥२॥

उपजला तो म्लेंच्छ जातींत । वैदुरीनगरीं राज्य करीत ।
पुत्रपौत्रीं नांदत । महानंदें परियेसा ॥३॥

ऐसा राजा तो यवन । होता आपण संतोषोन ।
अश्व गज अपार धन । पायभारा मिति नाहीं ॥४॥

आपण तरी यातिहीन । पुण्यवासना अंतःकरण ।
दानधर्म करी जाण । समस्त यातीं एकभावें ॥५॥

विशेष भक्ति विप्रांवरी । ती असे पूर्वसंस्कारीं ।
असती देवालयें भूमीवरी । उपद्रव नेदी तयांसी ॥६॥

तया घरचे पुरोहित । तया रायातें शिकवीत ।
आपण होऊन म्लेंच्छ जात । देवद्विज निंदावें ॥७॥

तयांतें तुम्ही सेवितां देख । तेणें होय अपार पातक ।
यातिधर्म करणें सुख । अनंत पुण्य असे जाणा ॥८॥

मंदमति द्विजजाती । देखा पाषाणपूजा करिती ।
समस्तांतें देव म्हणती । काष्‍ठवृक्षपाषाणांसी ॥९॥

धेनूसी म्हणती देवता होय । पृथ्वी सोम अग्नि सूर्य ।
तीर्थयात्रा नदीतोय । समस्तां देव म्हणताती ॥१०॥

ऐसे विप्र मंदमती । निराकारा साकार म्हणती ।
तयांतें म्लेंच्छ जे भजती । ते पावती अधःपात ॥११॥

ऐसे यवनपुरोहित । रायापुढें सांगती हित ।
ऐकोनि राजा उत्तर देत । कोपें करोनि परियेसा ॥१२॥

राजा म्हणे पुरोहितांसी । निरोपिलें तुम्हीं आम्हांसी ।
अणुरेणुतृणकाष्‍ठेंसी । सर्वेश्वर पूर्ण असे ॥१३॥

समस्त सृष्‍टि ईश्वराची । स्थावर जंगम रचिली साची ।
सर्वत्र देव असे साची । तर्कभेद असंख्य ॥१४॥

समस्त जातींची उत्पत्ति । जाणावी तुम्ही पंचभूतीं ।
पृथ्वी आप तेज वायु निगुती । आकाशापासाव परियेसा ॥१५॥

समस्तांची वृद्धि एक । जाणती मृत्तिका कुलाल लोक ।
नानापरीचीं करिती अनेक । भांडीं भेद परोपरी ॥१६॥

नानापरीच्या धेनु असती । क्षीर असे एकचि रीतीं ।
सुवर्ण जाण तेचि रीतीं । परोपरीचे अलंकार ॥१७॥

तैसा देह भिन्न जाण । परमात्मा एकचि पूर्ण ।
जैसा नभीं मृगलांछन । नाना घटीं दिसतसे ॥१८॥

दीप असे एक घरीं । वाती लाविल्या सहस्त्र जरी ।
समस्त होती दीपावरी । भिन्न भाव कोठें असे ॥१९॥

एकचि सूत्र आणोनि । नानापरीचे ओविती मणि ।
सूत्र एकचि जाणोनि । न पाविजे भाव भिन्न ॥२०॥

तैशा जाति नानापरी । असताती वसुंधरीं ।
समस्तांसी एकचि हरी । भिन्न भाव करुं नये ॥२१॥

आणिक तुम्ही म्हणाल ऐसें । पूजिती पाषाण देव कैसे ।
सर्वां ठायीं पूर्ण भासे । विश्वात्मा आहेचि ॥२२॥

प्रतिमापूजा स्वल्पबुद्धि । म्हणोनि सांगती प्रसिद्धीं ।
आत्माराम पूजिती विधीं । त्यांचे मतीं ऐसें असे ॥२३॥

स्थिर नव्हे अंतःकरण । म्हणोनि करिती प्रतिमा खूण ।
नाम ठेवोनि नारायण । तया नामें पूजिताती ॥२४॥

तयातें तुम्ही निंदा करितां । तरी सर्वां ठायीं पूर्ण कां म्हणतां ।
प्रतिष्‍ठाव्या आपुले मता । द्वेष आम्हीं न करावा ॥२५॥

या कारणें ज्ञानवंतीं । करुं नये निंदास्तुति ।
असती नानापरी जाती । आपुले रहाटीं रहाटती ॥२६॥

ऐशापरी पुरोहितांसी । सांगे राजा विस्तारेंसी ।
करी पुण्य बहुवसीं । विश्वास देवद्विजांवरी ॥२७॥

राजा देखा येणेंपरी । होता तया वैदुरीनगरीं ।
पुढें त्याचे मांडीवरी । स्फोटक एक उद्भवला ॥२८॥

नानापरीचे वैद्य येती । तया स्फोटकासी लेप करिती ।
शमन न होय कवणे रीतीं । महादुःखें कष्‍टतसे ॥२९॥

ऐसें असतां वर्तमानीं । श्रीगुरु असतां गाणगाभुवनीं ।
विचार करिती आपुले मनीं । राजा येईल म्हणोनिया ॥३०॥

येथें येतां म्लेंच्छ लोक । होईल द्विजां उपबाधक ।
प्रगट झालों आतां ऐक । आम्हीं येथें असूं नये ॥३१॥

प्रगट जहाली महिमाख्याति । पहावया येती म्लेंच्छ जाति ।
आतां रहावें आम्हीं गुप्तीं । लौकिकार्थ परियेसा ॥३२॥

आला ईश्वरनाम संवत्सरु । सिंहेसी आला असे गुरु ।
गौतमी तीर्थ थोरु । यात्राप्रसंगें जावें आतां ॥३३॥

म्हणती समस्त शिष्यांसी । करा आयती वेगेंसी ।
येतो राजा बोलावावयासी । जावें त्वरित गंगेला ॥३४॥

ऐसें ऐकोनि शिष्यजन । विचार करिती आपआपण ।
जरी येईल राजा यवन । केवी होय म्हणताती ॥३५॥

ऐसा मनीं विचार करिती । काय होईल पहा म्हणती ।
असे नरसिंहसरस्वती । तोचि रक्षील आपणांतें ॥३६॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । असतां गाणगापुरीं ख्याति ।
राजा यवना झाली मति । पूर्वसंस्कारीं परियेसा ॥३७॥

स्फोटकाचे दुःखें राजा । अपार कष्‍टला सहजा ।
नानापरी औषधें वोजा । करितां न होय तया बरवें ॥३८॥

मग मनीं विचार करी । स्फोटकें व्यापिलें अपरंपारी ।
वैद्याचेनि नोहे दूरी । काय करावें म्हणतसे ॥३९॥

बोलावूनि विप्रांसी । पुसे काय उपाय यासी ।
विप्र म्हणती रायासी । सांगतों ऐका एकचित्तें ॥४०॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय एकतिसावा

पूर्वजन्मीं पापें करिती । व्याधिरुपें होऊन पीडिती ।
दानधर्में तीर्थी दैवतीं । व्याधि जाय परियेसा ॥४१॥

अथवा भल्या सत्पुरुषासी- । भजा आपण भावेंसी ।
तयाचे दृष्‍टिसुधारसीं । बरवें होईल परियेसा ॥४२॥

सत्पुरुषाचे कृपादृष्‍टीं । पापें जाती जन्म साठी ।
मग रोग कैचा पोटीं । स्फोटकादि त्वरित जाय ॥४३॥

ऐकोनिया विप्रवचन । राजा करीतसे नमन ।
मातें तुम्ही न म्हणा यवन । दास आपण विप्रांचा ॥४४॥

पूर्वजन्मी आपण । केली सेवा गुरुचरण ।
पापास्तव झालों जाण । यवनाचे कुळीं देखा ॥४५॥

एखादा पूर्ववृत्तान्त । मातें निरोपावा त्वरित ।
महानुभावदर्शन होत । कवणाचा रोग गेला असे ॥४६॥

रायाचें वचन ऐकोनि । विचार करिती विप्र मनीं ।
सांगूं नये या स्थानीं । एकान्तस्थळ पाहिजे ॥४७॥

तुम्ही राव म्लेंच्छजाती । समस्त तुम्हां निंदा करिती ।
आम्ही असों द्विजजाती । केवी करावें म्हणताती ॥४८॥

विप्रवचन ऐकोन । विनवीतसे तो यवन ।
चाड नाहीं जातीवीण । आपणास तुम्हीं उद्धरावें ॥४९॥

ऐसें रायाचें अंतःकरण । अनुतप्त झालें असे जाण ।
मग निरोपिती ब्राह्मण । तया रायातें परियेसा ॥५०॥

विप्र म्हणती रायासी । स्थान बरवें पापविनाशी ।
जावें तुम्हीं सहजेंसी । विनोदार्थ परियेसा ॥५१॥

तेथें असे स्थळ बरवें । एकान्तस्थान पहावें ।
स्नान करावें मनोभावें । एकचित्तें परियेसा ॥५२॥

ऐकोनिया विप्रवचन । संतोषला राजा आपण ।
निघाला त्वरित तेथोन । आला पापविनाश तीर्थासी ॥५३॥

समस्तांतें राहवूनि । एकला गेला तया स्थानीं ।
स्नान करितां तये क्षणीं । आला एक यति तेथें ॥५४॥

राजा देखोनि यतीसी । नमन करी भावेंसी ।
दावीतसे स्फोटकासी । म्हणे उपशमन केवी होय ॥५५॥

ऐकोनि तयाचें वचन । सांगता झाला विस्तारोन ।
महानुभावाच्या दर्शनें । तूंतें बरवें होय जाणा ॥५६॥

पूर्वीं याचें आख्यान । सांगेन ऐक विस्तारोन ।
एकचित्तें करोनि मन । ऐक म्हणती तये वेळीं ॥५७॥

अवंती म्हणिजे थोर नगरी । तेथें होता एक दुराचारी ।
जन्मोनिया विप्र उदरीं । अन्य रहाटीं रहातसे ॥५८॥

आपण असे मदोन्मत्त । समस्त स्त्रियांसवें रमत ।
स्नानसंध्या त्यजूनि निश्चित । अन्यमार्गें वागतसे ॥५९॥

ऐसें दुराचारीपणें । रहाटतसे तो ब्राह्मण ।
पिंगला म्हणिजे वेश्या जाण । तयेसवें वर्ततसे ॥६०॥

न करी कर्म संध्यास्नान । रात्रंदिवस वेश्यागमन ।
तिचे घरीं भक्षी अन्न । येणेंपरी दोष केले ॥६१॥

ऐसें असतां वर्तमानीं । ब्राह्मण होता वेश्यासदनीं ।
तेथें आला एक मुनि । वृषभनामा महायोगी ॥६२॥

तया देखोनि दोघें जण । करिती साष्‍टांग नमन ।
भक्तिभावें करोन । घेवोनि आलीं मंदिरांत ॥६३॥

बैसवोनिया पीठावरी । पूजा करिती षोडशोपचारीं ।
अर्घ्यपाद्य देवोनि पुढारी । गंधाक्षता लाविती ॥६४॥

नाना परिमळ पुष्प जाती । तया योगियासी समर्पिती ।
परिमळ द्रव्यें अनेक रीतीं । समर्पिलीं तया योगेश्वरा ॥६५॥

चरणतीर्थ घेऊन । पान करिती दोघेंजण ।
त्यांतें करविती भोजन । नानापरी पक्वान्नेंसी ॥६६॥

करवूनिया भोजन । केलें हस्तप्रक्षालन ।
बरवा पलंग आणोन । देती तया योगियासी ॥६७॥

तया मंचकीं निजवोन । तांबूल देती आणोन ।
करिती पादसंवाहन । भक्तिभावें दोघेंही ॥६८॥

निद्रिस्त झाला योगेश्वर । दोघें करिती नमस्कार ।
उभें राहोनि चारी प्रहर । सेवा केली भावेंसी ॥६९॥

उदय झाला दिनकरासी । संतोषला तो तापसी ।
निरोप घेऊनि संतोषीं । गेला आपुल्या स्थानाप्रती ॥७०॥

ऐसें विप्रें वेश्याघरीं । क्रमितां क्वचित्‌ दिवसांवरी ।
तारुण्य जाउनी शरीरीं । वार्धक्य पातलें तयासी ॥७१॥

पुढें तया विप्रासी । मरण आलें परियेसीं ।
पिंगला नाम वेश्येसी । दोघें पंचत्व पावलीं ॥७२॥

पूर्वकर्मानुबंधेंसी । जन्म झाला राजवंशीं ।
दशार्णवाधिपतिकुशीं । वज्रबाहूचे उदरांत ॥७३॥

तया वज्रबाहूपत्‍नी । नाम तिचें वसुमती ।
जन्मा आला तिचे पोटीं । तो विप्र परियेसा ॥७४॥

तया वज्रबाहूसी । ज्येष्‍ठ राणीच्या गर्भेसी ।
उद्‌भवला विप्र परियेसीं । राजा समारंभ करीतसे ॥७५॥

देखोनि तिचे सवतीसी । क्रोध आला बहु मानसीं ।
गर्भ झाला सपत्‍नीसी । म्हणोनि द्वेष मनीं धरी ॥७६॥

सर्पगरळ आणोनि । दिल्हें सवतीस नाना यत्‍नीं ।
गरळें भेदिलें अतिगहनीं । तया राजज्येष्‍ठ स्‍त्रियेसी ॥७७॥

दैवयोगें न ये मरण । सर्व शरीरीं झाले व्रण ।
चिंता करी अतिगहन । महाकष्‍ट भोगीतसे ॥७८॥

ऐशापरी राजयुवती । कष्‍टें झाली प्रसूति ।
उपजतां बाळका मातेप्रती । सर्वांग स्फोट वाहत ॥७९॥

विषें व्यापिलें सर्वांगासी । म्हणोनि आक्रंदती दिवानिशीं ।
दुःख करी राजा क्लेशीं । म्हणे काय करुं आतां ॥८०॥

देशोदेशींच्या वैद्यांसी । बोलाविती चिकित्सेसी ।
वेंचिती द्रव्य अपारेंसी । कांहीं केलिया बरवें नोहे ॥८१॥

तया माता बाळकासी । व्रण झाले बहुवसीं ।
निद्रा नाहीं रात्रीसी । सर्वांगीं कृमि पडले असती ॥८२॥

त्यांतें देखोनि रायासी । दुःख झालें बहुवसीं ।
निद्रा नाहीं दिवानिशीं । त्याचे कष्‍ट देखोनिया ॥८३॥

व्यथें करोनि मातासुत । अन्न उदक न वचे क्वचित ।
शरीरीं सर्व क्लेश होत । क्षीण झालें येणेंपरी ॥८४॥

राजा येऊनि एके दिवसीं । पाहे आपुले स्त्री-सुतासी ।
देखोनिया महाक्लेशी । दुःख करीतसे परियेसा ॥८५॥

म्हणें आतां काय करुं । केवी करणें प्रतिकारु ।
नाना औषधें उपचारु । करितां स्वस्थ नव्हेचि ॥८६॥

स्त्री-पुत्रांची ऐशी गति । जिवंत शवें झाली असती ।
यांच्या रोगासी होय शांति । केवी पाहूं म्हणतसे ॥८७॥

आतां यातें पहावयासी । कंटाळा येतो आम्हांसी ।
बरवें नव्हे सत्य यांसी । काय करणें म्हणतसे ॥८८॥

यांतें देखतां आम्हांसी । श्रम होती देहासी ।
नेवोनिया अरण्यासी । त्यांतें त्यजूं म्हणतसे ॥८९॥

जे जे असती पापीजन । त्यांतें जीवन अथवा मरण ।
भोगिल्यावांचोनि न सुटे जाण । आपुलें आपण भोगिजे ॥९०॥

विचार करोनि मानसीं । बोलाविलें कोळियासी ।
सांगतसे विस्तारेंसी । ऐका श्रोते एकचित्तें ॥९१॥

राजा म्हणे सूतासी । माझे बोल परियेसीं ।
नेऊनि आपुले स्त्री -पुत्रांसी । अरण्यांत ठेवावें ॥९२॥

मनुष्यांचा संचार । जेथें नसेल निर्धार ।
तेथें ठेवीं वेगवक्र । म्हणे राजा सूतासी ॥९३॥

येणेंपरी सूतासी । राजा सांगे विस्तारेंसी ।
रथा दिधला संजोगेंसी । घेऊनि गेला झडकरी ॥९४॥

तिचे दासदासी सकळ । दुःख करिती महाप्रबळ ।
माता पिता बंधु सकळ । समस्त प्रलाप करिताती ॥९५॥

दुःख करिती नर नारी । हा हा पापी दुराचारी ।
स्त्री-सुतांसी कैसेपरी । केवी यांतें मारवितो ॥९६॥

रथावरी बैसवोनि । घेवोनि गेला महारानीं ।
जेथें नसती मनुष्य कोणी । तेथें ठेविलीं परियेसा ॥९७॥

सूत आला परतोनि । सांगे रायासी विस्तारोनि ।
महाअरण्य दुर्गम वनीं । तेथें ठेविली म्हणतसे ॥९८॥

ऐकोनि राजा संतोषला । दुसरे स्त्रियेसी वृत्तान्त सांगितला ।
दोघांसी आनंद जाहला । वनीं राहिलीं मातासुत ॥९९॥

मातापुत्र दोघेंजण । पीडताती दुःखेंकरुन ।
कष्‍टती अन्नउदकावीण । महाघोर वनांत ॥१००॥

राजपत्‍नी सुकुमार । तिये शरीरीं व्रण थोर ।
चालूं न शके पृथ्वीवर । महाकंटक भूमीवरी ॥१॥

कडिये घेवोनि बाळकासी । जाय ती मंदगमनेंसी ।
आठवी आपुले कर्मांसी । म्हणे आतां काय करुं ॥२॥

तया वनीं मृगजाति । व्याघ्र सिंहादिक असती ।
सर्प थोर अपरिमिती । हिंडताती वनांत ॥३॥

मातें जरी व्याघ्र मारी । पापापासून होईन दुरी ।
पुरे आतां जन्म संसारीं । वांचोनि काय व्यर्थ जिणें ॥४॥

म्हणोनि जाय पुढें रडत । क्षणोक्षणीं असे पडत ।
पुत्रासहित चिंता करीत । जात असे वनमाजी ॥५॥

उदकाविणें तृषाक्रांत । देह व्रणें असे पीडित ।
व्याघ्रसर्पादि देखत । भयें चकित होतसे ॥६॥

देखे वेताळ ब्रह्मराक्षस । वनगज भालुका बहुवस ।
केश मोकळे पायांस । कांटे धोंडे लागताती ॥७॥

ऐसे महाअरण्यांत। राजश्री असे हिंडत ।
पुढें जातां देखिलें वनांत । गुरें चरती वाणियांचीं ॥८॥

तयांपासीं जावोनि । पुसतसे करुणावचनीं ।
गोरक्षकांतें विनवोनि । मागे उदक कुमारासी ॥९॥

गोरक्षक म्हणती तियेसी । जावें तुवां मंदिरासी ।
तेथें उदक बहुवसी । अन्न तूंतें मिळेल ॥११०॥

म्हणोनि मार्ग दाखविती । हळूहळू जाय म्हणती ।
राजपत्‍नी मार्ग क्रमिती । गेली तया ग्रामांत ॥११॥

तया ग्रामीं नरनारी । दिसताती अपरंपारी ।
ऐकोन आली मनोहरी । पुसे तयां स्त्रियांसी ॥१२॥

म्हणे कवण येथें राजा । संतोषी दिसे समस्त प्रजा ।
ऐकोनि सांगती वैश्यराजा । महाधनिक पुण्यात्मा ॥१३॥

त्याचें नांव पद्माकर । पुण्यवंत असे थोर ।
तूंतें रक्षील साचार । म्हणोनि सांगती तियेसी ॥१४॥

इतुकिया अवसरीं । तया वैश्याचे घरीं ।
दासी होत्या मनोहरी । त्याही आल्या तियेजवळी ॥१५॥

येवोनि पुसती वृत्तान्त । घेवोनि गेल्या मंदिरांत ।
आपल्या स्वामीसी सांगत । आद्यंतेंसीं विस्तारें ॥१६॥

तीस देखोनिया वैश्यनाथ । कृपा करी अत्यंत ।
नेऊनिया मंदिरांत । दिल्हें एक गृह तिसी ॥१७॥

पुसोनिया वृत्तान्त । वाणी होय कृपावंत ।
दिल्हें अन्नवस्त्र बहुत । नित्य तिसी रक्षीतसे ॥१८॥

ऐशी तया वैश्याघरीं । होती रायाची अंतुरी ।
वर्धतसे पीडा भारी । व्रण न वचे परियेसा ॥१९॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय तेविसावा

येणेंपरी राजसती । तया वैश्याचे घरीं होती ।
वाढले व्रण तयांसी बहुती । प्राणांतक होतसे ॥१२०॥

वर्ततां ऐसें एके दिवसीं । मरण आलें कुमारकासी ।
प्रलाप करी बहुवसी । राजपत्‍नी तये वेळीं ॥२१॥

मूर्च्छा येऊनि तये क्षणीं । राजपत्‍नी पडे धरणीं ।
आपुलें कर्म आठवोनि । महाशोक करीतसे ॥२२॥

त्या वाणियाच्या स्त्रिया देखा । संबोखिताति ती बाळिका ।
कवणेंपरी तिचे दुःखा । शमन नोहे परियेसा ॥२३॥

नानापरी दुःख करी । आठवीतसे पूर्वापारी ।
म्हणे ताता माझ्या सौरी । कोठें गेलासी बाळका ॥२४॥

राजकुमारा पूर्णचंद्रा । माझ्या आनंदसमुद्रा ।
मातें धरिसी मौनमुद्रा । तूंतें काय बरवें असे ॥२५॥

मातापिता बंधुजन । सोडोनि आल्यें सकळ जाण ।
तुझा भरंवसा होता पूर्ण । मातें रक्षिसी म्हणोनिया ॥२६॥

मातें अनाथ करोनि । तूं जातोसि सोडोनि ।
मज रक्षिता नसे कोणी । प्राण त्यजीन म्हणतसे ॥२७॥

येणेंपरी राजनारी । दीर्घस्वरें रुदन करी ।
देखोनिया नरनारी । दुःख करिती परियेसा ॥२८॥

समस्तही दुःखाहुनी । पुत्रशोक केवळ वाहि ।
मातापितरांतें दाहोनि । भस्म करी परियेंसा ॥२९॥

येणेंपरी दुःख करितां । ऋषभ योगी आला त्वरिता ।
पूर्वजन्मींच्या उपकारार्था । पातला तेथें महाज्ञानी ॥१३०॥

योगियातें देखोनि । वंदिता झाला तो वाणी ।
अर्घ्यपाद्य देवोनि । उत्तम स्थानीं बैसविला ॥३१॥

योगी तया अवसरीं । पुसे कवण दीर्घस्वरीं ।
शोक करितसे अपारीं । कवण असे म्हणतसे ॥३२॥

सविस्तर वैश्यनाथ । सांगता जाहला वृत्तान्त ।
योगीश्वर कृपावंत । आला तिये जवळीक ॥३३॥

म्हणे योगी तियेसी । मूढपणें दुःख करिसी ।
कवण जन्मला भूमीसी । कवण मेला सांग मज ॥३४॥

देह म्हणिजे विनाशी जाण । जैसा गंगेंत दिसे फेण ।
व्यक्ताव्यक्त सवेंचि होय जाण । जलबुद्‌बुदापरी देखा ॥३५॥

पृथ्वी तेज वायु आप । आकाश मिळोनि सर्वव्याप ।
पंच गोठली शरीररुप । दिसत असे परियेसा ॥३६॥

पंच भूतें पांचांठायीं । निघोन जातां शून्य पाहीं ।
दुःख करितां अवकाश नाहीं । वृथा कां तूं दुःख करिसी ॥३७॥

गुणापासाव उत्पत्ति । निज कर्में होय निरुती ।
काळ नाचवी दृष्‍टिविकृतीं । वासना तयापरी जाणा ॥३८॥

मायेपासोनि माया उपजे । होय गुणें सत्त्वरजें ।
तमोगुणें तेथें सहजें । देहलक्षण येणेंपरी ॥३९॥

या तीन गुणांपासाव । उपजताती मनुष्यभाव ।
सत्त्वगुणें असती देव । रजोगुण मनुष्याचा ॥१४०॥

तामस तोचि राक्षस । जैसा गुण असे त्यास ।
तैसा जन्मे पिंडाभास । कधीं स्थिर नव्हेचि ॥४१॥

या संसारवर्तमानीं । उपजती नर कर्मानुगुणीं ।
जैसें अर्जित असे पूर्वपुण्यीं । सुखदुःखें घडती देखा ॥४२॥

कल्पकोटिवर्षांवरी । जिवंत असती सुर जरी ।
तेही न राहती स्थिरी । मनुष्यांचा काय पाड ॥४३॥

या कारणें ज्ञानीजनें । उपजतां संतोष न करणें ।
मेलिया दुःख न करणें । स्थिर नव्हे देह जाणा ॥४४॥

गर्भ संभवें जिये काळीं । विनाश म्हणोनि जाणती सकळी ।
कोणी मरती यौवनकाळीं । क्वचिद्वार्धक्यपाणीं जाणा ॥४५॥

जैसें कर्म पूर्वार्जित । तेणेंपरी असे घडत । मायामोहें म्हणत । सुत नरदेही हे ॥४६॥

जैसें लिखित ललाटेसी । ब्रह्मदेवें लिहिलें परियेसीं ।
कालकर्म उल्लंघावयासी । शक्ति न होय कवणा जाणा ॥४७॥

ऐसें अनित्य देहासी । कां वो माते दुःख करिसी ।
तुझी पूर्वपरंपरा कैसी । सांगा आम्हां म्हणतसे ॥४८॥

तूं जन्मांतरीं जाणा । कवणा होतीस अंगना ।
किंवा झालीस जननी कोणा । भगिनी कोणाची सांग पां ॥४९॥

ऐसें जाणोनि मानसी । वायां कां हो दुःख करिसी ।
जरी बरवें तूं इच्छिसी । शरण जाईं शंकरा ॥१५०

ऐसें ऐकोनि राजयुवती । करी ऋषभयोगिया विनंति ।
आपणासी झाली ऐसी गति । राज्यभ्रष्‍ट होऊनि आल्यें ॥५१॥

मातापिता बंधुजन । सोडोनि आलें मी रान ।
पुत्र होता माझा प्राण । भरंवसा मज तयाचा ॥५२॥

तया जहाली ऐशी गति । आपण वांचोनि काय प्रीति ।
मरण व्हावें मज निश्चिती । म्हणोनि चरणीं लागली ॥५३॥

ऐसें निर्वाण देखोनि । कृपा उपजली योगियामनी ।
पूर्व उपकार स्मरोनि । प्रसन्न झाला तये वेळीं ॥५४॥

भस्म काढोनि तये वेळीं । लाविलें प्रेताचे कपाळीं ।
घालितां त्याचे मुखकमळीं । प्राण आला परियेसा ॥५५॥

बाळ बैसला उठोनि । सर्वांग झालें सुवर्णवर्णी ।
मातेचे व्रणही तेच क्षणीं । जाते झाले तात्काळ ॥५६॥

राजपत्‍नी पुत्रासहित । करी योगियासी दंडवत ।
ऋषभयोगी कृपावंत । आणीक भस्म प्रोक्षीतसे ॥५७॥

तात्काळ तया दोघांसी । शरीर होय सुवर्णसंकाशी ।
शोभायमान दिसे कैसी । दिव्य काया उभयतांची ॥५८॥

प्रसन्न झाला योगेश्वर । तये वेळीं दिधला वर ।
तुम्हां न होय जराजर्जर । तारुण्यरुप चिरंजीवी ॥५९॥

तुझा सुत भद्रायुषी । कीर्ति वरील बहुवशी ।
राज्य करील परियेसीं । पित्याहूनि अधिक जाणा ॥१६०॥

ऐसा वर देऊनि । योगी गेला तेथोनि ।
ऐक राजा एकमनीं । सत्पुरुषाचें महिमान ॥६१॥

सत्पुरुषाची सेवा करितां । तुझा स्फोटक जाईल त्वरिता ।
तुवां न करावी कांहीं चिंता । दृढ धरीं भाव एक ॥६२॥

ऐसें यतीचें वचन ऐकोनि । राजा नमन करी तये क्षणीं ।
विनवीतसे कर जोडोनि । कोठें असे सत्पुरुष ॥६३॥

मातें निरोपावें आतां । जाईन आपण तेथें तत्त्वतां ।
मजला त्यांचें दर्शन होतां । होईल बरवें म्हणतसे ॥६४॥

ऐकोनि राजाचें वचन । सांगतसे मुनि आपण ।
भीमातीरीं गाणागाभुवन । असे तेथें परमपुरुष ॥६५॥

तयापासीं तुवां जावें । दर्शनमात्रें होईल बरवें ।
ऐकोनि राजा एकभावें । निघता झाला तये वेळीं ॥६६॥

एकभावें राजा आपण । घ्यावया श्रीगुरुदर्शन ।
प्रयाणावरी करी प्रयाण । आला गाणगापुरासी ॥६७॥

ग्रामीं पुसे सकळिकांसी । कोण येथें एक तापसी ।
रुप धरिलें संन्यासी । कोठें आहे म्हणतसे ॥६८॥

भयभीत झाले सकळिक । म्हणती आतां नव्हे निक ।
श्रीगुरुसी पुसतों ऐक । काय करील न कळे म्हणती ॥६९॥

कोणी न बोलती तयासी । राजा कोपला बहुवसी ।
म्हणे आलों भेटीसी । दावा आपणा म्हणतसे ॥१७०॥

मग म्हणती समस्त लोक । श्रीगुरु अनुष्‍ठानस्थान असे निक ।
अमरजासंगमीं माध्यान्हिक । करोनि येती ग्रामातें ॥७१॥

ऐसें ऐकोनि म्लेंच्छ देखा । समस्तां वर्जूनि आपण एका ।
बैसोनिया आंदोलिकां । गेला तया स्थानासी ॥७२॥

दुरोनि देखतां श्रीगुरुसी । चरणीं चाले म्लेंच्छ परियेसीं ।
जवळी गेला पहावयासी । नमन करुनि उभा राहे ॥७३॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कां रे रजका कोठें अससी ।
बहुत दिवशीं भेटलासी । आमचा दास होवोनिया ॥७४॥

ऐसें वचन ऐकोनि । म्लेंच्छ झाला महाज्ञानी ।
पूर्वजन्म स्मरला मनीं । करी साष्‍टांग दंडवत ॥७५॥

पादुकांवरी लोळे आपण । सद्‌गदित अंतःकरण ।
अंगीं रोमांच उठोन । आनंदबाष्पें रुदन करी ॥७६॥

पूर्वजन्मीं आठवोन देखा । रुदन करी अति दुःखा ।
कर जोडून विनवी ऐका । नाना परी स्तोत्र करी ॥७७॥

राजा म्हणे श्रीगुरुसी । कां उपेक्षिले आम्हांसी ।
झालों आपण परदेशी । चरणावेगळें केलें मज ॥७८॥

अंधकारसागरांत । कां घातलें मज येथ ।
मी होऊनि मदोन्मत्त । विसरलों चरण तुझे ॥७९॥

संसारसागरमायाजाळीं । बुडालों आपण दुर्मति केवळीं ।
सेवा न करीं चरणकमळीं । दिवांध झालों आपण ॥१८०॥

होतासि तूं जवळी निधान । न ओळखें आपण मतिहीन ।
तमांधकारीं वेष्‍टोन । तुझे चरण विसरलों ॥८१॥

तूं भक्तजनां नुपेक्षिसी । निर्धार होता माझे मानसीं ।
अज्ञानसागरीं आम्हांसी । कां घातलें स्वामिया ॥८२॥

उद्धरावें आतां मज । आलों आपण हेंचि काज ।
सेवोनि तुझे चरणरज । असेन आतां राज्य पुरे ॥८३॥

ऐसें नानापरी देखा । स्तुति करी राजा ऐका ।
श्रीगुरु म्हणती भक्त निका । तुझी वासना पुरेल ॥८४॥

राजा म्हणे श्रीगुरुसी । झाला स्फोटक आपणासी ।
व्यथा होतसे प्रयासी । कृपादृष्‍टीं पहावें ॥८५॥

ऐसें वचन ऐकोन । श्रीगुरु करिती हास्यवदन ।
स्फोटक नाहीं म्हणोन । पुसताती यवनासी ॥८६॥

राजा पाहे स्फोटकासी । न दिसे स्फोटक अंगासी ।
विस्मय करीतसे मानसीं । पुनरपि चरणीं माथा ठेवी ॥८७॥

राजा म्हणे स्वामियासी । तुझें प्रसन्नत्व आम्हांसी ।
राज्य पावलों संतोषीं । अष्‍टैश्चर्य माझें अवलोकावें ॥८९॥

भक्तवत्सल ब्रीद तुझें । वासना अर्थ पुरवीं माझे ।
इंद्रियसंसार उतरीं ओझें । लीन होईन तुझे चरणीं ॥१९०॥

श्रीगुरु म्हणती तयासी । आम्ही तापसी संन्यासी ।
येऊं नये तुझे नगरासी । महापातकें होती तेथें ॥९१॥

नगरीं नित्य धेनुहत्या । यवनजाति तुम्ही सत्या ।
जीवहिंसा मद्यपी कृत्या । वर्जावें आतां निर्धारें ॥९२॥

सर्व अंगिकार करोनि । राजा लागे दोन्ही चरणीं ।
म्हणे मी दास पुरातनीं । पूर्वापारीं दृष्‍टि देणें ॥९३॥

पूर्वी माझें जन्म रजक । स्वामीवचनें राज्य विशेख ।
पावोनि देखिलें नाना सुख । उणें एक म्लेंच्छजाति ॥९४॥

दर्शन होतां तुझे चरण । संतुष्‍ट झालें अंतःकरण ।
पुत्रपौत्र दृष्‍टीं पाहोन । मग मी राहीन तुझे सेवे ॥९५॥

ऐसें नानापरी देखा । राजा विनवी विशेखा ।
पाया पडे क्षणक्षणिका । अतिकाकुळती येतसे ॥९६॥

READ  श्री गुरूचरित्र – अध्याय पंचेचाळीसावा

श्रीगुरु मनीं विचार करिती । पुढें होणार ऐसी गति ।
कलियुगीं असे दुर्जन जाति । गौप्य असतां पुढें बरवें ॥९७॥

सहज जावें सिंहस्थासी । महातीर्थ गौतमीसी ।
जावें हें भरंवसी । आतां आम्हीं गुप्त व्हावें ॥९८॥

ऐसें मनीं विचारुनि । श्रीगुरु निघाले संगमाहूनि ।
राजा आपुले सुखासनीं । बैसवी प्रीती करोनिया ॥९९॥

पादुका घेतल्या आपुले करीं । सांगातें येतसे पादचारीं ।
श्रीगुरु म्हणती आरोहण करीं । लोक निंदा तुज करिती ॥२००॥

राष्‍ट्राधिपति तुज म्हणती । जन्म तुझा म्लेंच्छजाती ।
ब्राह्मणसेवें तुज हांसती । जाति दूषण करितील ॥१॥

राजा म्हणे स्वामी ऐका । कैचा राजा मी रजका ।
तुझे दृष्‍टीं असे निका । लोह सुवर्ण होतसे ॥२॥

समस्तांसी राजा आपण सत्य । मी रजक तुझा भक्त ।
पूर्ण झाले मनोरथ । तुझें झालें दर्शन मज ॥३॥

इतुकिया अवसरीं । समस्त दळ मिळालें भारी ।
मदोन्मत्त अतिकुंजरी । वारु नाना वर्णाचे ॥४॥

उभा राहोनि राजा देखा । समस्त दाखवी सैन्यका ।
संतोष मनीं अति हरिखा । आपुलें ऐश्वर्य दाखवितसे ॥५॥

श्रीगुरु निरोपिती यवनासी । आरोहण करीं वारुवेसी ।
दूर जाणें असे नगरासी । निरोप आमुचा नको मोडूं ॥६॥

श्रीगुरुवचन ऐकोन । समस्त शिष्यांतें आरोहण ।
देता झाला तो यवन । आपण वाजीं आरुढला ॥७॥

आनंद बहु यवनाचे मनीं । हर्षनिर्भर न माये गगनीं ।
श्रीगुरुभेटी झाली म्हणोनि । अति उल्हास करीतसे ॥८॥

श्रीगुरुमूर्ति बोलाविती यवनासी । म्हणती झालों अतिसंतोषी ।
तूं भक्त केवळ गुणराशी । संतुष्‍ट झालों आपण आजी ॥९॥

आम्ही संन्यासी तापसी । नित्य करावें अनुष्‍ठानासी ।
तुम्हांसमागमें मार्गासी । न घडे वेळीं संध्यादिक ॥२१०॥

यासी उपाय सांगेन । अंगिकार करावा जाण ।
पुढें जाऊं आम्ही त्वरेनें । स्थिर यावें तुम्हीं मागें ॥११॥

पापविनाशी तीर्थासी । भेटी होईल तुम्हांसी ।
ऐसें म्हणोनि रायासी । अदृश्य झाले गुरुमूर्ति ॥१२॥

समस्त शिष्यांसहित । श्रीगुरु गुप्त झाले त्वरित ।
मनोवेगें मार्ग क्रमित । गेले वैदूरपुरासी ॥१३॥

पापविनाशी तीर्थासी । श्रीगुरु पातले त्वरितेंसी ।
राहिले तेथें अनुष्‍ठानासी । समस्त येती भेटावया ॥१४॥

साखरे सायंदेवाचा सुत । भेटीस आला नागनाथ ।
नानापरी पूजा करीत । समाराधना आरंभिली ॥१५॥

श्रीगुरु नेऊनि आपुले घरा । पूजा केली षोडशोपचारा ।
आरती करोनि एक सहस्त्रा । समाराधना करी बहुत ॥१६॥

इतुकें होतां झाली निशी । श्रीगुरु म्हणती नागनाथासी ।
सांगोनि आलों म्लेंच्छासी । पापविनाशीं भेटूं म्हणोनि ॥१७॥

जाऊं आतां तया स्थानासी । राहतां यवन येईल परियेसीं ।
उपद्रव होईल ब्राह्मणांसी । विप्रघरा म्लेंच्छ येती ॥१८॥

ऐसें सांगोनि आपण । गेले पापविनाशीं जाण ।
शुभासनीं बैसोन । अनुष्‍ठान करीत होते ॥१९॥

इतुकिया अवसरीं । राजा इकडे काय करी ।
गुरुनाथ न दिसती दळभारीं । मनीं चिंता बहु वर्तली ॥२२०॥

म्हणे कटकटा काय झालें । गुरुनाथें मज उपेक्षिलें ।
काय सेवे अंतर पडलें । तेणें गेले निघोनिया ॥२१॥

मागुती मनीं विचारी । पुढें जातों म्हणोनि येरी ।
पापविनाशी तीर्थातीरीं । भेटी देतों म्हणितलें ॥२२॥

न कळे महिमान श्रीगुरुचें । कोण जाणें मनोगत त्यांचें ।
दैव बरवें होतें आमुचें । म्हणोनि चरणांचें दर्शन झालें ॥२३॥

राजस्फोटक होता मज । आलों होतों याचि काज ।
कृपानिधि श्रीगुरुराज । भेटी झाली पुण्य माझें ॥२४॥

पुढें गेले निश्चित । म्हणोनि मनीं विचार करित ।
दिव्य अश्वावरी आरुढोनि त्वरित । निघाला राजा परियेसा ॥२५॥

चतुश्चत्वारिंशत्‌ क्रोश देखा । राजा पातला दिवसें एका ।
पापविनाशी तीर्थीं देखा । अवलोकितसे श्रीगुरुसी ॥२६॥

विस्मय करी अति मानसीं । येऊनि लागला चरणांसीं ।
विनवीतसे भक्तींसी । गृहाप्रति यावें म्हणतसे ॥२७॥

नगर सर्व श्रृगांरिलें । प्रवाळ-मोतियां तोरण केलें ।
गुडिया मखर उभारविलें । समारंभ थोर नगरांत ॥२८॥

बैसवोनिया पालखींत । आपण चरणचालीं येत ।
नवरत्‍न असे ओवाळित । नगर लोक आरत्या आणिती ॥२९॥

ऐशा समारंभें राजा देखा । घेऊनि गेला गुरुनायका ।
विस्मय झाला सकळ लोकां । महदाश्चर्य म्हणताती ॥२३०॥

लोक म्हणती म्लेंच्छजाती । पहा हो विप्रपूजा करिती ।
राजा अनाचारी म्हणती । जातिधर्म सांडिला आजी ॥३१॥

ज्याचें पाहूं नये मुख । त्याची सेवा करी देख ।
राजा नष्‍ट म्हणोनि सकळिक । म्लेंच्छजाती बोलती ॥३२॥

विप्रकुळ समस्त देख । संतोष करिती अतिकौतुक ।
राजा झाला विप्रसेवक । आतां बरवें राज्यासी ॥३३॥

ऐसा राव असतां । महाराष्‍ट्रधर्मीं वर्ततां ।
आपुला द्वेष तत्त्वतां । न करील जाण पां ॥३४॥

ऐसा राजा असतां बरवें । ज्ञानवंत असे स्वभावें ।
ब्रह्मद्वेषी नव्हे पहावें । पुण्यश्लोक म्हणती ऐसा ॥३५॥

नगरलोक पहावया येती । नमस्कारिती अतिप्रीतीं ।
राजे चरणचालीं येती । लोक म्हणती आश्चर्य ॥३६॥

एक म्हणती हा होय देव । म्हणोनि भजतो म्लेंच्छराव ।
या कलियुगीं अभिनव । देखिलें म्हणताती सकळिक ॥३७॥

सवें वाजंत्र्यांचे गजर । बंदीजन वाखाणिती अपार ।
राजा हर्षें निर्भर । घेऊनि जातो गुरुसी ॥३८॥

नानापरीचीं दिव्य वस्त्रें । वांटीतसे राजा पवित्रें ।
द्रव्य ओवाळुनि टाकी पात्रें । भिक्षुक तुष्‍टले बहुत देखा ॥३९॥

ऐशा समारंभें देखा । घेऊनि गेला राजा ऐका ।
महाद्वारीं पातलें सुखा । पायघडया अंथरती ॥२४०॥

नानापरीचीं दिव्यांबरें । मार्गीं अंथरती अपारें ।
वाजती भेरी वाजंत्रें । राजगृहा पातले ॥४१॥

मरासिंहासनस्थानीं । श्रृंगार केला अतिगहनीं ।
जगद्‌गुरुतें नेऊनि । सिंहासनीं बैसविलें ॥४२॥

राजमंदिरींच्या नारी । आरत्या घेऊनिया करीं ।
ओवाळिती हर्षनिर्भरीं । अनन्यभावें करोनियां ॥४३॥

समस्त लोक बाहेर ठेवोन । श्रीगुरु होते एकले आपण ।
सवें शिष्य चवघेजण । जवळी होते परियेसा ॥४४॥

अंतःपुरींचे कुलस्त्रियांसी । पुत्रपौत्रीं सहोदरासी ।
भेटविलें राजें परियेसीं । साष्‍टांगीं नमन करिती ते ॥४५॥

राजा विनवी स्वामियासी । पुण्यें देखिलें चरणांसी ।
न्याहाळावें कृपादृष्‍टीसी । म्हणोनि चरणीं लागला ॥४६॥

संतोषले श्रीगुरुमूर्ति । तयांसी आशीर्वाद देती ।
राजयातें बोलाविती । पुसताती गृहवार्ता ॥४७॥

श्रीगुरु म्हणती तयासी । संतुष्‍ट झालास कीं मानसीं ।
अजूनि व्हावें कांहीं भावेंसी । विस्तारोनि सांग म्हणती ॥४८॥

राजा विनवी स्वामियांसी । अंतर पडतें चरणासी ।
राज्य केलें बहुवसीं । आतां द्यावी चरणसेवा ॥४९॥

ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । आमुची भेटी श्रीपार्वतीं ।
तुझे पुत्र राज्य करिती । तुवां यावें भेटीसी ॥२५०॥

ऐसा निरोप देऊनि । श्रीगुरु निघाले तेथोनि ।
राजा विनवी चरण धरोनि । ज्ञान मजला असावें ॥५१॥

कृपासिंधु गुरुनाथ । ज्ञान होईल ऐसें म्हणत ।
आपण निघाले त्वरित । गेले गौतमी- तीरासी ॥५२॥

स्नान करोनि गौतमीसी । आले गाणगापुरासी ।
आनंद झाला समस्तांसी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥५३॥

संतुष्‍ट झाले समस्त लोक । पहावया येती कौतुक ।
वंदिताती सकळिक । आरती करिती मनोभावें ॥५४॥

समस्त शिष्यांतें बोलाविती । श्रीगुरु त्यांसी निरोपिती ।
प्रगट झाली बहु ख्याति । आतां रहावें गुप्तरुपें ॥५५॥

यात्रारुपें श्रीपर्वतासी । निघावें आतां परियेसीं ।
प्रगट बोले हेचि स्वभावेंसी । गुप्तरुपें राहूं तेथें ॥५६॥

स्थान आपुलें गाणगापुरीं । येथूनि न वचे निर्धारीं ।
लौकिकमतें अवधारीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥५७॥

प्रगट करोनिया यात्रेसी । वास निरंतर गाणगाभुवनासी ।
भक्तजन तारावयासी । राहूं येथें निर्धार ॥५८॥

कठिण दिवस युगधर्म । म्लेंच्छराजा क्रूरकर्म ।
प्रगटरुपें असतां धर्म । समस्त म्लेंच्छ येती ॥५९॥

राजा आला म्हणोनि । समस्त यवन ऐकोनि ।
सकळ येती मनकामनी । म्हणोनि गुप्त असावें ॥२६०॥

ऐसें म्हणोनि शिष्यांतें । सांगितलें श्रीगुरुनाथें ।
सिद्ध सांगे नामधारकातें । चरित्र ऐसें श्रीगुरुचें ॥६१॥

पुढें येतील दुर्दिन । कारण राज्य यवन ।
समस्त येती करावया भजन । म्हणोनि गुप्त राहिले ॥६२॥

लौकिकार्थ दाखवावयासी । निघाले आपण श्रीशैल्यासी ।
कथा असे विशेषी । सिद्ध म्हणे नामधारका ॥६३॥

गंगाधराचा सुत । सरस्वती असे विनवीत ।
प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ । देखिलें असे गाणगापुरीं ॥६४॥

सद्भावें भजती भक्तजन । त्यांची कामना होईल पूर्ण ।
संदेह न धरीं अनुमान । त्वरित सिद्धि असे जाणा ॥६५॥

न लागतां कष्‍ट सायास । कामना पुरती गाणगापुरास ।
भक्तिभावें विशेष । कल्पवृक्ष तेथें असे ॥६६॥

जें जें कल्पिलें फळ । त्वरित पावती सकळ ।
धनधान्यादि विपुळ । पुत्रपौत्रादि शीघ्र होती ॥६७॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । हें गुरुचरित्र दिनीं निशीं ।
मनोभावें वाचनेंसी । सकळ कामना पुरतील ॥६८॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्ध नामधारका सांगत ।
यवनाचा उद्धार येथ । तुम्हांकारणें सांगितला ॥२६९॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सार्वभौमस्फोटकशमने ऐश्वर्यावलोकने वैदुरीप्रवेशो नाम पंचाशत्तमोऽध्यायः ॥५०॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥       ॥ ओवीसंख्या ॥२६९॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु॥

(PDF) Download श्री गुरूचरित्र – अध्याय पन्नासावा
श्री गुरुचरित्र सप्ताह वाचन - अध्याय ५० | Gurucharitra Adhyay 50 । Saptah Vachan
श्री गुरूचरित्र – अध्याय पन्नासावा

श्री गुरूचरित्र – अध्याय एकावन्नावा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link