पसायदान ही प्रार्थना अनेकांना मुखोद्गत असेल. पसायदान (Pasaydan) हे संत ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागितलेले प्रार्थनारूपी मागणे आहे. ज्ञानेश्वरी या संत ज्ञानेश्वर यांच्या ग्रंथाचा शेवट (अध्याय १८ वा – ओवी १७९४ ते १८०२) पसायदान या प्रार्थनेने होतो.
बहुतेक धर्मग्रंथांमध्ये फलश्रुती ही ग्रंथाच्या सुरुवातीला किंवा शेवटी दिलेली असते. म्हणजे त्या धर्मग्रंथाचे वाचन किंवा श्रवण केल्याने काय फलप्राप्ती, लाभ होतात ते लिहिलेले असते. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये अशी कोणतीही फलश्रुती न सांगता ग्रंथाचे समापन हे विश्वात्मक देवाकडे पसायदानरूपी (Pasaydan) कृपाप्रसाद मागून करतात.
जसा एखाद्या ग्रंथातील विचार त्याचा सारांश वाचून समजतो तसाच ज्ञानेश्वरीतील विचार सारांशरूपाने पसायदानात मांडलेला आहे. ही प्रार्थना सर्व आणि सार्वकालीन मानवांसाठी केलेली आहे. कोणत्याही विशिष्ट देवतेचे नाव न घेता, कोणत्याही विशिष्ट पंथाचा उल्लेख न करता ज्ञानेश्वर महाराज चराचरात व्यापलेल्या ईश्वराकडे मागणे मागतात. ईश्वर हा “विश्वात्मक” आहे, ही ज्ञानेश्वर महाराजांची ईश्वरासंबंधीची कल्पना पसायदान (Pasaydan) या प्रार्थनेतून स्पष्ट होते. पसायदान काळ, धर्म, पंथ या सर्वांच्या पलीकडे आहे, हे या प्रार्थनेचे वैशिष्ट्य आहे.
Pasaydan | पसायदान
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥१॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥२॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥३॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥४॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥६॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥७॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । हो आवें जी ॥८॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥९॥
(PDF) Download Pasaydan | डाउनलोड पसायदान
श्री शिवस्तुति वाचण्यासाठी Shree Shiv Stuti येथे क्लिक करा.
श्री मनाचे श्लोक वाचण्यासाठी Shree Manache Shlok येथे क्लिक करा.
जंववरी रे तंववरी अभंग वाचण्यासाठी Javavari Re Tavavari येथे क्लिक करा.
पांडुरंग हरी !